scorecardresearch

व्यक्तिवेध: केशवराव धोंडगे

इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ राज्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या तेव्हा राज्य सरकारने त्यांना साडी-चोळी आणि नथ भेट दिली होती.

व्यक्तिवेध: केशवराव धोंडगे

इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ राज्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या तेव्हा राज्य सरकारने त्यांना साडी-चोळी आणि नथ भेट दिली होती. या घटनेनंतर विधिमंडळात केशवराव धोंडगे यांनी प्रश्न विचारला, ‘साडी- चोळी दिली हे चांगलेच, पण नथ देताना त्यांच्या नाकाला भोक आहे का, हे सरकारला माहीत होते का?’ – प्रश्नातून हशा पिकला, पण पुढे विधिमंडळात ‘छिद्र’ की ‘भोक’ अशी चर्चा झाली. १९९०पर्यंत सरकारच्या कारभारावर नेमकेपणाने बोट ठेवणारे केशवराव धोंडगे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर विश्वास असलेला आणि खुल्या चर्चेला प्रोत्साहन देणारा नेता हरपला आहे. केशवरावांचे (ऊर्फ भाई) जाणे पुरोगामी महाराष्ट्रासाठी वेदनादायी आहे.

पुरोगामित्व मिरविणे आणि ते व्यक्तिगत आयुष्यात रुजवणे यातील फरक कार्यकर्त्यांना स्वत:च्या वर्तनातून दाखवणारे नेत म्हणजे केशवराव धोंडगे. शंकरराव चव्हाण यांच्याशी फारसे सख्य नसलेले आमदार म्हणून धोंडगे ओळखले जात. त्यांची शरद पवार यांच्याशी कायम जवळीक राहिली. पण ही जवळीक केवळ पक्षीय नव्हती. भूमिकांच्या पातळीवर वंचित समूहास राजकीय विचारमंच मिळावा यासाठी काम करणारा नेता अशी धोंडगे यांची ओळख महाराष्ट्राच्या इतिहासात कायम राहील.

धोंडगे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जात. कापूस एकाधिकार योजनेला साहाय्य करावे या मागणीसाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांना भेटायला गेले होते. ‘शहाणपणाचे बोला, पैसे घेऊन दलाली करण्यासाठी आला आहात का,’ असे विचारत मोरारजी देसाई यांनी शिष्टमंडळाच्या हेतूबाबत संशय व्यक्त केला. तेव्हा भाई धोंडगे म्हणाले होते- ‘भीक नाही हक्क मागतो आहोत, बळीराजाचे प्रतिनिधी म्हणून आलो आहोत. तुमचा फोटो लावून विजयी झालो नाही. तेव्हा पंतप्रधानपदाला शोभेल असेच बोला.’

त्यांच्या बोलण्यातून आणि लेखणीतून व्यक्त होणारी धमक विनोबा भावेंनी अनुभवली. विनोबांनी आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ ठरविल्यानंतर केशवराव धोंडगे यांनी त्यांना दोन पत्रे लिहिली होती. त्यात ‘लोकशाही व न्यायदेवतेच्या रक्षणासाठी जेव्हा निर्भयपणे कटू सत्य बोलणे आवश्यक होते, तेव्हा मौनात होतात. आपल्या सात्त्विक लेखणीच्या अक्षरांनी लोकशाहीचे वस्त्रहरण बंद करण्यासाठी आपण धावून याल वाटले होते. पण अप्रत्यक्षरीत्या दुर्योधन, दु:शासनालाच सा केले,’ असे त्यात म्हटले होते. हे पत्र लिहिताना ते नाशिकच्या तुरुंगात स्थानबद्ध होते.

१९५७ ते १९९९ अशा ११ सलग निवडणुका त्यांनी लढविल्या. १९८० च्या लोकसभेचा अपवाद वगळता १९९० पर्यंत त्यांनी राजकीय पटलावरील कारकीर्द गाजवली. धोंडगे आवर्जून गुराखी साहित्य संमेलन घेत. गारुडी, सापवाले, मरिआईवाले, पोतराज, घिसाडी, पारधी अशा वंचित जातींना विचारसामथ्र्य देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 01:27 IST

संबंधित बातम्या