‘गणितातील नोबेल’ मानला जाणारा आबेल पुरस्कार स्वीडनशेजारच्या नॉर्वेतून दिला जातो आणि त्याचे नावही मिळतेजुळते हे खरेच; पण नॉर्वेचे ७५ लाख क्रोनर (सुमारे पावणेसहा कोटी रुपये) ही रक्कमही नोबेलच्या तोडीची! सुरू झाल्यापासूनच्या गेल्या २० वर्षांत केवळ श्रीनिवास वरधन या एकाच भारतीय गणितज्ञाला मिळालेला हा मानाचा पुरस्कार यंदा लुइस काफारेली यांना जाहीर झाला आहे. काफारेली (वय ७४) आणि त्यांची गणितज्ञ पत्नी आयरीन गाम्बा (६४) हे दोघेही मूळचे अर्जेटिनातले, अमेरिकेत शिक्षणासाठी आलेले आणि दोघेही ऑस्टिने या शहरातील टेक्सास विद्यापीठात कार्यरत. पण गणितातली दोघांची अभ्यासक्षेत्रे निरनिराळी, त्यापैकी लुइस यांचे अभ्यासक्षेत्र ‘पार्शल डिफरन्शिअल इक्वेशन’शी- म्हणजे ‘आंशिक अवकल समीकरणां’शी संबंधित. त्यात ‘नॉनलीनिअर’- अरेषीय आंशिक अवकल समीकरणांमध्ये नवे प्रश्न उभे करण्याकडे- आणि ते सोडवण्याकडे- काफारेली यांचा कल आहे.
अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर, निसर्गात किंवा प्रत्यक्षात होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांमधील ‘गणित’ ओळखणे, हे त्यांचे काम. म्हणजे काय? तर फुगा भिंतीवर दाबल्यास तो पसरणार. पण भिंत सपाट असली पाहिजे.. जर भिंतीवर एखादी खुंटी असेल तर? तर भिंत-फुगा यांमधील ‘सीमा’ बदलेल, त्यानुसार ‘बल’देखील बदलेल. किंवा, ‘बर्फ वितळणे’ या क्रियेत खालचा भाग वगळता सर्व बाजूंनी सारखेच तापमान आहे, तरीही वितळताना बर्फाचा आकार सर्व बाजूंनी सारखाच न राहण्यामागे कोणकोणती विविध बले कार्यरत असू शकतात? किंवा, पाण्याचा / द्रवाचा प्रवाह संथ आणि एकप्रतलीय असूनही त्याची गती का बदलते? अशा प्रश्नांचे समीकरणांत ‘भाषांतर’ करण्यात काफारेली यांना रस आहे. समीकरण मांडायचे, ते तर्कशुद्ध उत्तरापर्यंत न्यायचे आणि मग चल पदे बदलून दुसऱ्या अवघड समीकरणाकडे जायचे ही अनेक गणितज्ञांची पद्धत, पण तिच्यातून अनेकदा रोजचे जगणे सुधारण्यासही मदत होऊ शकते. काफारेली यांना ‘फुग्याचे (त्यातील हवेचे) विषम प्रतल वा क्षेत्रामध्ये पसरणे’ हा प्रश्न सोडविण्यात काही प्रमाणात यश आल्याने, त्या समीकरणांचा वापर अडनिडय़ा आकाराच्या खोलीचे तापमान सर्व कोपऱ्यांपर्यंत सारखे ठेवण्याकामी होऊ शकतो. मात्र ‘द्रवाचा प्रवाह’ हा प्रश्न आधीच्या दोन गणितज्ञांप्रमाणेच काफारेली यांनाही सोडवता आलेला नाही. जे ‘आपोआप’, ‘सहज’, ‘योगायोगाने’ घडल्यासारखे वाटते, ते तसे खरोखरच आहे का, हा विज्ञानाचा मूळ प्रश्न. त्यासाठी आधार असतो तर्क आणि प्रयोगाचा, तर गणित हे तर्काचे विज्ञान मांडते आणि विविध तर्क ताडून पाहणे हीच गणिताची प्रयोगसामुग्री असते. आबेल पुरस्कार अशा गणितज्ञांवर मान्यतेची मोहोर उमटवतो. २०१०च्या आबेल चर्चासत्रात ‘नॉन-लोकल डिफ्यूजन्स, ड्रिफ्ट्स अॅण्ड गेम्स’ अरेषीय आंशिक अवकल समीकरणांवरचा निबंध काफारेली यांनी सादर केला होता. त्यानंतर १२ वर्षांनी मिळालेला पुरस्कार, ही त्या अभ्यासनिबंधालाही मिळालेली दाद असल्याचे आबेल पारितोषिक समितीच्या निवेदनातून स्पष्ट होते.