‘गांधीवादी कार्यकर्ते महेन्द्रभाई मेघाणी कालवश’ अशी बातमी गुजराती प्रसारमाध्यमांत वा काही अन्य भाषिक दैनिकांत गुरुवारी आली. पण महेन्द्र मेघाणी यांची ओळख तेवढीच नव्हती. पत्रकार, स्तंभलेखक, अनुवादक, संपादक आणि ‘संक्षेपकार’ अशी कारकीर्द त्यांनी केली. वयाच्या १०१ व्या वर्षी, ३ ऑगस्टच्या बुधवारी त्यांचे निधन झाले, त्याआधी गेल्या २० जून रोजी त्यांनी १०० वा वाढदिवस साजरा केला होता. पुस्तके भरपूर लिहूनही त्यांना पुरस्कार मिळाले नाहीत, स्वत: स्थापन केलेले आणि संपादकपदी स्वत:च असलेले ‘मिलाप’ हे मासिकही २८ वर्षे चालले, म्हणजे तसे अल्पजीवीच ठरले. पण या लौकिक यशाच्या पलीकडले दीर्घजीवी सातत्य महेन्द्रभाईंनी जपले होते. हे सातत्य कसले? ते नेमके समजण्यासाठी आधी महेन्द्र मेघाणी यांच्या दीर्घ आयुष्यातील काही टप्प्यांकडे पाहावे लागेल. वडील जवेरचंद मेघाणी हे ‘राष्ट्रीय कवी’ आणि गांधीजींचे सहकारी. महेन्द्र हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव. पण पित्याच्याच विचारांवर चालणे नवतरुण महेन्द्रभाईंना अमान्यच होते. बेचाळीसच्या चळवळीत उच्चशिक्षण सोडून देणारे महेन्द्रभाई डॉ. आंबेडकरांमुळे प्रभावित झाले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडांनी आंबेडकरांना ज्या कोलंबिया विद्यापीठात डॉक्टरेटसाठी जाण्यास अर्थसा केले, त्याच अमेरिकी विद्यापीठात आपण शिकायचे, हे त्यांनी ठरवून टाकले! मुंबईच्या ‘जन्मभूमी’ या गुजराती दैनिकाचे ‘पत्रकार’ म्हणून परवाना घेऊन बोटीने ते अमेरिकेस पोहोचले, कोलंबिया विद्यापीठापर्यंत गेले, पण भारतातच शिक्षण सोडलेले असल्याने त्यांना प्रवेश मिळेना. अखेर, पत्रकारितेच्या अंशकालीन वर्गात ते शिकलेच. हे शिक्षण सुरू असताना त्यांनी अमेरिकेबद्दल लिहिलेले लेख, हे त्या खंडप्राय देशाचा ठाव घेणारे गुजरातीतले पहिले लिखाण! ‘अमेरिकानी अटारिएथी’ (अमेरिकेच्या उंबरठय़ावरून) या नावाने ते पुस्तकरूप झाले. याच काळात व्हिक्टर ूगोच्या ‘नाइन्टी थ्री’ या कादंबरीचे भाषांतरही त्यांनी केले, ते ‘ज्वाळा’ नावाने प्रकाशित झाले. या काळातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची न्यूयॉर्कमध्ये स्थापना. तो महेन्द्रभाईंनी साक्षात् अनुभवला, त्याचे वार्ताकनही गुजरातीत केले. या ‘युनो’च्या (‘यूएन’चे तेव्हाचे लघुरूप) झेंडय़ाच्या आकाशी-निळय़ा रंगामुळे ते इतके प्रभावित झाले की, पांढऱ्या गांधीटोपीऐवजी, विश्वनागरिकत्वाची खूण पटवणाऱ्या त्या झेंडय़ाच्या आकाशी रंगाची गांधीटोपी ते वापरू लागले. मुंबईस परतल्यावर काही काळ पत्रकारिता करून, २६ जानेवारी १९५० रोजी त्यांनी ‘मिलाप’ हे गुजराती ‘डायजेस्ट’ प्रकारातले मासिक सुरू केले. अन्यत्र प्रकाशित झालेले वा प्रकाशनाच्या वाटेवर असलेले लिखाण निवडून, त्याचा गुच्छ सादर करणारे हे मासिक (मराठीत ‘नवनीत’ व ‘अमृत’ ही मासिके या प्रकारातील होती). ‘मिलाप’चे संपादन करताना, लेखाचाच काय पण कवितांचाही ‘संक्षेप’ महेन्द्रभाई करीत. त्याबद्दल लेखकांचा फार राग असे त्यांच्यावर, पण त्यामुळेच त्यांना ‘संक्षेपकार’ हे बिरुद चिकटले. आणीबाणीदरम्यान ‘मिलाप’ची आर्थिक स्थिती बिघडून १९७८ मध्ये ते बंद झाले; पण १९६८ पासून भावनगरमध्ये ‘लोकमिलाप’ ही संस्था त्यांनी स्थापली होती. ‘लोकमिलाप’च्या  ग्रंथदालनात गुजराती पुस्तकविक्री होत असे, पण प्रकाशन व्यवसाय मात्र त्यांना बंद करावा लागला! महेन्द्रभाईंचे वाचन सतत आणि अफाट होते. ‘पुस्तके आणि मतदान’ ही लोकशाहीची अवजारे, असे ते मानत. गुजरात दंगलीस विरोधही त्यांनी एका जळजळीत इंग्रजी लेखाचे गुजराती भाषांतर करूनच नोंदवला. त्यांच्या निधनाने, वाचनाचे आणि ‘विवेकबुद्धीचे सातत्य’ जपणारा गुजराती साहित्यसेवक आपण गमावला आहे.