भाई उद्धवराव पाटील, गणपतराव देशमुख, केशवराव धोंडगे या रांगेत शेतकरी कामगार पक्षातील भाई नावाने ज्यांची ओळख महाराष्ट्रभर होती ते अहमदपूरचे माजी आमदार आणि राज्यमंत्री किशनराव देशमुख हे मराठवाडय़ातील पुरोगामी चळवळीतील महत्त्वपूर्ण नाव. त्यांचे नुकतेच निधन झाले पण त्यांनी नांदेड आणि लातूर जिल्ह्यत विचारांचा वारसा जपण्यासाठी खासे प्रयत्न केले.

अहदमपूर तालुक्यातील नांदुरा(खु.) गावात १९३३ साली जन्मलेले वाढलेले  किशनराव हे कायद्याचे जाणकार होते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेणारे किशनराव हे महाराष्ट्र विवेक वहिनीचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी काम केले. शिक्षण क्षेत्रात चांगले बदल व्हावेत असे काम करणाऱ्यांची पिढी मराठवाडय़ात होती. त्याचे नेतृत्व करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संस्थाचालक संघाचे संस्थापक अध्यक्ष, विचार विकास मंडळ संचलित महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूरचे संस्थापक सरचिटणीस, लोकायत शिक्षण संस्था अहमदपूरचे अध्यक्ष, उदगीरच्या किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे  सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम केलेले होते.  विद्यार्थी अवस्थेपासून पुरोगामी अभ्यास गट करून विद्यार्थ्यांच्या संघटना उभ्या केल्या. रजाकरांचा अन्याय मोडून काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण मानले जातात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचा सहभाग होता. शेतीमालास किफायतशीर भाव मिळावा व एकाधिकार खरेदीद्वारे सरकारने  खरेदी करावी यासाठी वेळोवेळी केलेल्या आंदोलनात त्यांना अनेकदा अटक झाली. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या लढय़ात सहभागी होऊन सीमा भागातील ८६५ गावांचा महाराष्ट्रात समावेश व्हावा यासाठी दिल्ली व राज्यात, तसेच जिल्हा कचेऱ्यांवर मोर्चा काढण्यात ते आघाडीवर होते.

UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप
Hatkanangale
हातकणंगलेत सत्यजित पाटील सरूडकर यांच्या हाती मशाल
alibag meenakshi patil marathi news, meenakshi patil death marathi news
माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांचे निधन
Vasantrao Mulik
हातकणंगलेतून मराठा समाजाचे नेते वसंतराव मुळीक यांनी निवडणूक लढवावी; प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मागणी

मराठवाडा विद्यपीठ नामांतराचा ठराव कार्यकारिणीमध्ये मांडण्यात त्यांची आघाडी होती. वसंतराव नाईक कृषी विद्यपीठ परभणी येथे कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी काम केले. दोन वेळा मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कुलगुरू निवड समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले.  महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जन्मशताब्दी शासकीय पातळीवर साजरी करणे व त्यांचे संपूर्ण वाय प्रकाशित व्हावे यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न  महत्वपूर्ण मानले जातात. कर्नाटक—आंध्र प्रदेश— तामिळनाडू व केरळ राज्याच्या महसूल पद्धती आणि राज्याचा महसूल याचा त्यांचा अभ्यासही मोठा होता. १९७८ ते १९८० या कालावधीत ते पुलोदच्या मंत्रीमंडळात महसूल व नियोजन खात्याचे राज्यमंत्री होते. कार्ल मार्क्‍स ते नेहरू असा अभ्यासाचा पट ते पुढील पिढीपर्यंत नेणारा नेता अशी त्यांची ओळख होती. केशवराव धोंडगे, गणपतराव देशमुख एवढा प्रभाव नसेल, पण तो विचार जपणारा नेता अशी त्यांची ओळख मराठवाडय़ासह महाराष्ट्राला विसरता येणार नाही.