आडनाव ‘फ्रेंच’, पण कुटुंब मूळचे आयरिश, स्वत: जन्माने ब्रिटिश आणि ओळख ‘भारतप्रेमी’ किंवा ‘भारताचे अभ्यासक’ अशी! पॅट्रिक फ्रेंच यांच्याबद्दलचे हे तपशील केवळ वैचित्र्य दाखवणारे नसून नाव/गाव/देश याचा संबंध अभ्यासाशी नसतो, याचीही खात्री त्यांचे लिखाण वाचणाऱ्यांना पटत असे. यापुढेही ती खात्री पटेल, पण आता पॅट्रिक फ्रेंच नसतील. अवघ्या ५६ व्या वर्षी, कर्करोगाशी चार वर्षांच्या झुंजीनंतर १६ मार्च रोजी लंडनमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘इंडिया : अ पोट्र्रेट’, त्याआधीचे ‘लिबर्टी ऑर डेथ- इंडियाज जर्नी टु इंडिपेन्डन्स’ ही पुस्तकेच नव्हे, तर अनेक नियतकालिकांमधले त्यांचे लेखही त्यांच्या भारतप्रेमाची साक्ष देतात. अभ्यासकाला – त्यातही फ्रेंच यांच्यासारख्या ‘अव्वल दर्जाचा चरित्रकार’ म्हणून नावाजले गेलेल्यांना असे अमुकप्रेमी, तमुकप्रेमी ठरवणे चुकीचेच; पण ‘शालेय वयात पहिल्यांदा संजय गांधींबद्दल वाचून भारताबद्दल सजग कुतूहल वाटले’ आणि ‘१९ व्या वर्षी पहिल्यांदा भारत पाहिला’ असे सांगणाऱ्या फ्रेंच यांना भारतच का भावला असावा? याचे तर्काधारित उत्तर त्यांच्या ‘लिबरल’पणात शोधावे लागते. प्रश्न विचारण्यास न कचरणे हे उदारमतवादाचे मूळ, तर कुतूहल ही त्या मुळांची भूमी. ‘शाळेपासूनच प्रस्थापित व्यवस्थांबद्दल साशंक असायचा तो.. म्हणूनही कदाचित (त्याने २०१३ साली ब्रिटिश ‘नाइटहूड’स्वीकारण्यास नकार दिला) असेल’ असे सांगणारे त्यांचे शाळूसोबती विल्यम डाल्रिम्पल यांच्यासह सध्या इंग्रजीत लिहिणारे रामचंद्र गुहा आदी इतिहास-अभ्यासक यांच्यापर्यंत अनेकांच्या पुस्तकांमध्ये ‘मूळ हस्तलिखित वाचून मौलिक सूचना केल्याबद्दल’ पॅट्रिक फ्रेंच यांचा उल्लेख आढळतो, तोही या कुतूहलामुळेच. त्या कुतूहलास मानवी अस्तित्व आणि वर्तनाबद्दलच्या नवतत्त्वज्ञानाची जोड होती काय, असाही प्रश्न पॅट्रिक फ्रेंच यांचे चरित्र लिहू पाहणाऱ्यांना जरूर पडावा. गांधी, जिना, नेहरू, चर्चिल यांची मानवी बाजू तपासणे हा फ्रेंच यांच्या ‘लिबर्टी ऑर डेथ’चा उद्देश होता, त्याबद्दल ‘ते नंतर नायक ठरले, पण नायक नसताना त्यांना व्यक्तिगत, कौटुंबिक तणावही असतील, त्यातून ते – आणि त्यांचे निर्णय- कसे घडत गेले’ हा प्रश्न पडल्याचे फ्रेंच यांनी म्हटले आहे. कुतूहलाची, प्रश्नांची ही धार अन्य पुस्तकांतही दिसते, पण ‘व्ही. एस. नायपॉल यांचे अधिकृत चरित्र’ म्हणून प्रकाशित झालेल्या ‘द वर्ल्ड इज व्हॉट इट इज’मध्येही ती कायम राहाते.
वसाहतवादी शोषणाच्या हेतूने तिबेट पादाक्रांत करणारे सर फ्रान्सिस यंगहजबंड यांच्या चरित्रासाठी फ्रेंच स्वत: तिबेट थटकले, मग त्या भटकंतीतून ‘तिबेट, तिबेट : अ पर्सनल हिस्टरी ऑफ अ लॉस्ट लॅण्ड’ हे पुस्तक झाले, ते केवळ प्रवासवर्णन नसल्याची दाद थेट दलाई लामांनी दिली, तरीही भारत काही फ्रेंच यांना ‘तिबेटप्रेमी’ मानणार नाही! पॅट्रिक यांच्या सहचरी मेरु गोखले (‘पेन्ग्विन’ प्रकाशनाच्या संपादक, पण आई नमिता गोखले यांच्याप्रमाणे महाराष्ट्राबाहेर वाढलेल्या), यांनी सहजीवनाबद्दल लिहिल्यास पॅट्रिक यांच्या ‘भारतप्रेमा’ची व्यक्तिगत बाजू उमगेल. तोवर पॅट्रिक फ्रेंच यांच्या विपुल लिखाणातले बारकावे हेरून त्यातील नीरक्षीर निवडणे एवढेच इतरेजनांहाती आहे.