स्पेनच्या फुटबॉलला गेल्या दोन दशकांत शावी हर्नांदेझ, आंद्रेस इनिएस्ता, सर्गिओ बुस्केट्स, झाबी अलोन्सो आणि सेस्क फाब्रेगास यांसारख्या जागतिक दर्जाच्या मध्यरक्षकांनी (मिडफिल्डर) नवे शिखर गाठून दिले. त्यांच्या ‘टिकी-टाका’ या वैशिष्ट्यपूर्ण शैलीच्या जोरावर स्पेनने २०१० मध्ये प्रथमच विश्वचषक जिंकून इतिहास रचला. त्यानंतर पुन्हा १६ वर्षांनी विश्वविजेतेपद मिळवणार्‍या यशात ‘रॉड्री’ नामक असामान्य मध्यरक्षकाचा आणि कर्णधाराचा मोलाचा वाटा होता. गोल किंवा गोलसाहाय्य न करताही सामन्यावर प्रभाव पाडता येतो, याचे रॉड्री मूर्तिमंत उदाहरण!

२२ जून १९९६ रोजी माद्रिद येथे जन्मलेल्या रॉड्रिगो हर्नांदेझ कास्कांते अर्थात रॉड्रीची फुटबॉल कारकीर्द ॲटलेटिको माद्रिदच्या युवा अकादमीत सुरू झाली. मात्र, शारीरिकदृष्ट्या बळकट नसल्याचे कारण देत त्याला अकादमीतून वगळण्यात आले. त्याने व्हिलारेयाल या स्पॅनिश क्लबच्या युवा संघात प्रवेश घेऊन मेहनत, शिस्त तसेच खेळाबाबतची जिज्ञासा यांच्या बळावर ॲटलेटिको माद्रिदमध्ये पुन्हा प्रवेश मिळवला. स्पेनमधील सर्वोच्च ‘ला लिगा’ स्पर्धेत त्याची क्षमता सिद्ध झाल्यावर २०१९ मध्ये इंग्लिश क्लब मँचेस्टर सिटीने त्याला विक्रमी किमतीत करारबद्ध केले.

बचावात्मक मध्यरक्षकाला (डिफेन्सिव्ह मिडफिल्डर) फुटबॉल विश्वात मैदानावरील प्रशिक्षकच मानले जाते. मँचेस्टरमध्ये पेप गार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली रॉड्रीचा खेळ अधिक परिपक्व झाला. अचूक पासिंग, चेंडूवरील उत्कृष्ट नियंत्रण, प्रतिस्पध्र्यांचे डाव आधीच ओळखण्याची क्षमता आणि दडपणाखालीही संयम राखून योग्य निर्णय घेण्याचे कौशल्य ही त्याच्या खेळाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.  

त्याला मोठ्या आव्हानांनाही सामोरे जावे लागले. २०२४ मध्ये त्याला गुडघ्याची गंभीर दुखापत (एसीएल) झाल्याने दीर्घकाळ मैदानाबाहेर राहावे लागले. पुनर्वसनातील कठोर परिश्रम आणि खंबीर मानसिकतेच्या जोरावर त्याने पुनरागमन केले. दुखापतीनंतर तो पूर्वीचा दर्जा राखू शकेल का, अशी शंका अनेकांनी व्यक्त केली. मात्र, रॉड्रीने आपल्या खेळातूनच त्या सर्व शंकांचे निरसन केले.

यंदाच्या विश्वचषकात रॉड्री स्पेनच्या संघाचा कणा ठरला. बचाव भक्कम राखतानाच आक्रमणाची प्रभावी सुरुवात करण्याची जबाबदारी त्याने समर्थपणे पार पाडली. विशेषत: उपांत्य फेरीत फ्रान्स आणि अंतिम फेरीत अर्जेंटिना यांसारख्या बलाढ्य प्रतिस्पध्र्यांना रोखण्यात खेळाचा वेग नियंत्रित करण्याची रॉड्रीची क्षमता निर्णायक ठरली. त्यामुळेच संपूर्ण स्पर्धेत एकही गोल किंवा गोलसाहाय्य न करता तो सर्वोत्तम खेळाडू (गोल्डन बॉल) पुरस्काराचा मानकरी ठरला.

रॉड्रीने दोन वर्षांपूर्वीच हंगामातील सर्वोत्तम खेळाडूला दिला जाणारा प्रतिष्ठेचा बॅलन डी ओर पुरस्कार पटकावला होता. या वैयक्तिक सन्मानासह त्याने सांघिक पातळीवर युरो, नेशन्स लीग, प्रीमियर लीग (चार वेळा), चॅम्पियन्स लीग आणि आता विश्वचषक अशी सर्वच मोठी जेतेपदे मिळवली आहेत. रॉड्रीपेक्षा अनेक खेळाडू अधिक वेगवान, अधिक बळकट किंवा अधिक कौशल्यवान आहेत, पण खेळाचे आकलन, अचूक निर्णयक्षमता, सातत्य आणि संघासाठी स्वत:ला झोकून देण्याची वृत्ती या गुणांमुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो.