Vyaktivedh Tabassum movie silver screen artist Bachpan ke din bhula ysh 95 | Loksatta

व्यक्तिवेध : तबस्सुम

रूपेरी पडद्यावर ७५ वर्षांपूर्वीपासून, चित्रवाणीच्या छोटय़ा पडद्यावर १९७२ पासून आणि ‘यूटय़ूब चॅनेल’द्वारे २०१६ पासून सुरू झालेले तबस्सुम यांच्या जीवनाचे रस्ते कधीही न रडता, १८ नोव्हेंबर रोजी संपले.

व्यक्तिवेध : तबस्सुम
१९७२ पासून ‘यूटय़ूब चॅनेल’द्वारे २०१६ पासून सुरू झालेले तबस्सुम यांच्या जीवनाचे रस्ते कधीही न रडता, १८ नोव्हेंबर रोजी संपले.

‘लंबे है जीवन के रस्ते, आओ चलें हम गाते हसते’ ही दीदार (१९५१) चित्रपटातल्या ‘बचपन के दिन भुला न देना’ या गाण्यातली, स्वत:वर चित्रित झालेली ओळ तबस्सुम अक्षरश: जगल्या! रूपेरी पडद्यावर ७५ वर्षांपूर्वीपासून, चित्रवाणीच्या छोटय़ा पडद्यावर १९७२ पासून आणि ‘यूटय़ूब चॅनेल’द्वारे २०१६ पासून सुरू झालेले तबस्सुम यांच्या जीवनाचे रस्ते कधीही न रडता, १८ नोव्हेंबर रोजी संपले.

    १९४७ पासून, वडील अयोध्यानाथ सचदेव आणि आई असगरी बेगम यांच्या ‘डाव्या चळवळीतल्या’ ओळखींमुळे चार वर्षांची बेबी तबस्सुम चित्रपटांत आली. १९५१ पासून लोकप्रियही झाली आणि सुरैया, नर्गिस, मधुबाला अशा अभिनेत्रींचे रूपेरी पडद्यावरील बालरूप बेबी तबस्सुम यांनी साकारले. १९६० पासून नायिका म्हणून जम बसवण्याचा प्रयत्न त्या करत होत्या पण तेव्हापासून ते १९७१ पर्यंत- तब्बल ४० चित्रपटांतल्या छोटय़ा वा मोठय़ा भूमिका स्वीकारूनही नायिका म्हणून त्या छाप पाडू शकल्या नाहीत. १९७२ सालचा आठ ऑक्टोबर (रविवार) मात्र तबस्सुम हे नाव घरोघरी लोकप्रिय करणारा ठरला.. याच दिवसापासून, ‘फूल खिले है गुलशन गुलशन’ हा पुढे दर शुक्रवारी  रात्री लागणारा कार्यक्रम सुरू झाला आणि तो १९९३ पर्यंत चालला. ही तब्बल २१ वर्षे तबस्सुम या हिंदी चित्रपटसृष्टीचा महाकोश खुला करत राहिल्या. उमादेवी (टुनटुन) वा नादिरा, जीवन किंवा प्राण, अजित, सत्येन कप्पू, इफ्तिकार  यांसारख्या  नायिका/नायक होताहोता बाजूला पडलेल्या- पण ‘साइड अ‍ॅक्टर’ म्हणूनच खुललेल्या अनेकानेक कलावंतांना, ‘आपने अलग अलग किरदार निभाए हैं..’ म्हणत मान देणाऱ्या तबस्सुम स्वत: आदल्या दशकभरात काय काय निभावून नेत होत्या, हे सहज नजरेआड होऊन एव्हाना त्या ‘फूल खिले है गुलशन गुलशन’ च्या एकमेवाद्वितीय नायिकाच बनल्या! मध्यंतरी या कार्यक्रमाला स्टुडिओच्या बाहेर नेण्याचे, ‘गीत का जन्म’ नावाच्या उपक्रमाद्वारे गाणे प्रत्यक्ष चित्रित होत असताना दाखवण्याचे प्रयत्न झाले खरे, पण दूरदर्शनच्या ‘दर्शकां’ना मात्र स्टुडिओतल्या त्या बैठय़ा कार्यक्रमात जान आणणाऱ्या तबस्सुम आणि समोर जी कुणी फिल्मी व्यक्ती असेल ती.. हेच पसंत होते.

‘जान आणणे’ हा शब्दप्रयोग मराठीत फार वापरला जातो. ‘जान’ हा शब्द उर्दू/ हिंदी. मराठीत जीव, चैतन्य, उल्हास. ‘जान’चे हे सारे  मराठी अर्थ तबस्सुम यांच्यामुळे टीव्हीच्या एवढय़ाच्या चौकटीत सामावायचे. आज त्या कार्यक्रमाचे अनेक भाग पाहाताना तबस्सुम यांचा उत्साह फिल्मी जरूर वाटेल; पण तसा आव आणण्याचा भागदेखील त्या मनापासून, आनंदानं निभावताहेत हे कबूल करावे लागते. कलाकारांना अनेकदा अवघड प्रश्नही त्यांनी विचारले. मुलाखतकाराचा अभ्यास कमी असेल, आस्थाही कमी असेल तर मुलाखत देणारा स्वत:ची जाहिरात करतो.. हे कधी तबस्सुम यांनी होऊ दिले नाही. अभ्यास आणि आस्थेचे ते क्षण नेमके टिपून पुढे  यूटय़ूब-वाहिनी सुरू झाली. ‘तबस्सुम हिट परेड’ या  वाद्यवृंदाच्या  निवेदनामधल्या विनोदांत भर घालून निघालेले ‘तबस्सुम के जोक्स’ हे पुस्तक आणि ‘तबस्सुम टॉकीज’ ही यूटय़ूब वाहिनी मागे सोडून तबस्सुम यांनी दुनियेला अलविदा केला.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 00:02 IST
Next Story
बुकबातमी : पुण्याचा ‘लिटफेस्ट’ तरुणांसाठी खास?