‘दास बूट’ हा जर्मन चित्रपट १९८२ मध्ये तेव्हाच्या पश्चिम जर्मनीत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवून अमेरिकेत आला, १९८३ च्या ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी नामांकनांमध्ये त्याचे दिग्दर्शक आणि पटकथाकार म्हणून वूल्फगँग पीटरसन यांचे नाव दोनदा आलेच- शिवाय आणखी चार नामांकने या चित्रपटाला मिळाली. ऑस्कर हुकले, पण ब्रिटनचा बाफ्टा पुरस्कार, जपानमध्ये सर्वोच्च समजला जाणारा चित्रपट पुरस्कार असा दिग्विजयच त्याने गाजवला. या यशाचा काहीएक ताण येऊ न देता पुढेही चांगले काम करत राहणारे दिग्दर्शक, म्हणून वूल्फगँग पीटरसन यांच्या मृत्यूनंतरही त्यांची नोंद राहील. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग होता, दुर्धर. मृत्यू गाठणारच होता, ती वेळ गेल्या शुक्रवारी (१२ ऑगस्ट) आली आणि बातमी यथावकाश सांगितली गेली. कुणाच्याही मृत्यूनंतर सहसा कमीत कमी शब्दांत मृत व्यक्तीचे नेमके गुणवर्णन करण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. तसा काही अद्याप पीटरसन यांच्याबाबत झालेला नाही. कदाचित तसा करताही येणार नाही. कारण शिक्क्यांपासून जन्मभर दूर राहिलेला चित्रपटकार, हीच तर त्यांची ओळख होती! आज पन्नाशीत असलेल्या शहरी भारतीयांनाही अमेरिकी थरारपट म्हणून आठवणारे ‘एअरफोर्स वन’ (१९९३) आणि ‘इन द लाइन ऑफ फायर’ (१९९७) हे चित्रपट पीटरसन यांनीच दिग्दर्शित केले. त्यांचाच १९९५ सालचा ‘आउटब्रेक’ हा चित्रपट एका विचित्र आजाराच्या महासाथीचा धोका नायक कसा टाळतो, अशा कथेवर आधारलेला होता. दोन वर्षांपूर्वी करोनाच्या महासाथीमुळे मार्च २०१९ च्या तिसऱ्या आठवडय़ात एकही नवा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित झाला नाही, तेव्हा ‘न्यू यॉर्क टाइम्स’चा एरवी ताज्या चित्रपटांसाठी राखीव असलेला रकाना या ‘आउटब्रेक’ची आठवण काढून साजरा झाला होता! इंग्रजीत त्यांनी पदार्पण केले ते जर्मनीच्या एकीकरणापूर्वीच, म्हणजे एका अर्थाने, जागतिकीकरणाचे वारे जगभर वाहू लागण्यापूर्वीच. १९८४ साली त्यांनी ‘नेव्हर एिन्डग स्टोरी’ हा चित्रपट इंग्रजीत बनवला. जर्मन लेखक मायकल एन्डे यांनी मुळात किशोर-कादंबरिका म्हणून लिहिलेल्या पुस्तकाच्या पहिल्या भागावर तो आधारित होता. एका मुलासमोर ‘निथग’ नावाचे राक्षसी पात्र पुस्तकातून प्रत्यक्षात अवतरते आणि मग पुढे काय होते, याची ती नवलकथा. ‘दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीच्या पाणबुडय़ांमध्येच सुमारे ३० हजार जण प्राणांस मुकले’ अशा माहिती-फलकानिशी सुरू होणाऱ्या ‘द बोट’ अर्थात ‘दास बूट’ची जातकुळी अगदी भिन्न असल्यामुळे, पीटरसन यांच्याकडून समीक्षकांना फार अपेक्षा होत्या. त्यांनी ‘गंभीर’ चित्रपट दिले नसल्याची कुरकुर ‘नेव्हर एिन्डग स्टोरी’च्या खर्चाचा (तेव्हाचा विक्रमी) आकडा ऐकताना किंवा ‘एअरफोर्स वन’, ‘आउटब्रेक’ यांनी पहिल्याच शनिवार-रविवारी जमलेल्या गल्ल्याचा हिशेब सांगताना होत असे. मात्र वूल्फगँग पीटरसन यांनी ही टीका कधी मनावर घेतली नाही. ‘‘मी गोष्ट सांगण्यासाठी चित्रपट करतो. मला तेच करायचे आहे’’ असे ते म्हणत. ही ‘गोष्ट सांगण्याची’ ओढ वूल्फगँग यांना लागली लहान वयातच.. ते आठ वर्षांचे असताना, म्हणजे १९४९ मध्ये जर्मन सिनेमा क्षेत्र जोशात असताना. वयाच्या अकराव्या वर्षी ‘मी दिग्दर्शक होणार’ असे त्यांनी ठरवून टाकले होते आणि १४ व्या वर्षी वडिलांकडून चलचित्र-कॅमेराही मिळवला होता. नाटय़कलेचे रीतसर शिक्षण घेऊन वयाच्या पंचविशीत ते बर्लिनच्या चित्रपट-चित्रवाणी प्रशिक्षण संस्थेत शिकले आणि चाळिशीत पहिला यशस्वी चित्रपट दिला, यादरम्यान अनेक कथाप्रधान टीव्ही मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh wolfgang petersen german film award ysh
First published on: 20-08-2022 at 00:02 IST