सध्याच्या प्रतिकूल स्थितीतही वर्ध्यातील महिलाश्रम विद्यार्थ्यांची गर्दी टिकवून असला, त री तेथील जुने गांधीवादी विरुद्ध नवे गांधीवादी हा संघर्ष लपून राहत नाही…
महिलाश्रम ही वर्ध्यातील महत्त्वाची संस्था. गांधी, विनोबांच्या पाऊलखुणा जपणारी. बालवाडी ते अध्यापिका महाविद्यालय अशा शैक्षणिक संस्था संचालित करणारी. या संकुलात प्रवेश केला की डावीकडे एक प्रार्थना मंदिर दिसते. त्यावर भल्या मोठ्या अक्षरात कोरलेले आहे. ‘गांधी, विनोबा निवास’. गांधी वर्धेला आले. सेवाग्राम आश्रमाची उभारणी सुरू झाली. सुरुवातीला मगनवाडी व नंतर महिलाश्रमातल्या या इमारतीत ते राहिले. त्यांचे येथील वास्तव्य उणेपुरे साडेपाच महिन्यांचे. या आश्रमाच्या निर्मितीची कथाही मोठी रंजक. गांधींच्या संस्थात्मक विचारांचा वारसा सांगणारी.
जमनालाल बजाज यांचे मुंबईतील एक स्नेही सूरजमल रुईया यांची एक कन्या अवघ्या १०व्या वर्षी विधवा झाली. शांताबाई रानीवाला. तेव्हा पुनर्विवाह शक्यच नव्हता. म्हणून शांताबाईला साबरमतीला पाठवले गेले. तिथे गांधीविचार आत्मसात केल्यावर त्या मुंबईला परतल्या. मग बजाजांनी पुढाकार घेत त्यांना एक संस्था स्थापन करून दिली. मारवाडी महिला मंडळ. ध्येय होते विधवांना शिक्षण देण्याचे. बजाजांच्या वर्धेच्या पेढीवर गंगाबिसेन बजाज काम करत. त्यांची कन्या रमाबेन. त्यांचे लग्न झाले रुईयांनी दत्तक घेतलेल्या रामदासशी. शांताबाई व रमाबेन यांनी मंडळाचे काम सुरू केले १९२४ ला. गांधी वर्धेत आल्यावर हे मंडळ येथे स्थानांतरित झाले व त्याचे नाव झाले ‘महिला सेवा मंडळ’- लघुरूप ‘महिलाश्रम’.
स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी शेकडो कार्यकर्ते वध्र्यात येत. अनेकजण कुटुंबही सोबत आणत. त्यातील महिला व मुलींची सोय या आश्रमात होत असे. येथे ११वी मॅट्रिकपर्यंतची शाळा सुरू झाली. त्यात देशभरातील विधवा व कार्यकर्त्यांच्या मुली शिकत. विधवेने शिक्षण घेतले तरी पुढे काय? नोकरी कोण देणार म्हणून मग अध्यापिका विद्यालय सुरू झाले. यात केवळ विधवाच नाही तर सर्वांना प्रवेश होता. विचार गांधींचा पण शिक्षणपद्धती मात्र सरकारची असे या आश्रमाचे धोरण. याचा फायदा मध्यप्रांतातील स्त्रीवर्गाला झाला. राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पत्नी सुमनताई, मधुकरराव चौधरींच्या भगिनी वासंती. अशी कितीतरी मोठी नावे या संस्थेशी जोडली गेली. तेव्हा मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री असलेले काशीनाथ त्रिवेदी यांनी प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल काकोडकरांच्या आईंना येथे पाठवले. शिक्षण झाल्यावर त्यांनी धारला शाळा सुरू केली व पहिले विद्यार्थी खुद्द अनिलरावच.
हा आश्रम १९४२ च्या आंदोलनात सर्वार्थाने सहभागी झाला. रमाबेन, शांताबाई. येथील शिक्षिका व डॉ. अभय बंगांच्या आई सुमन, भवानीप्रसाद मिश्रा हे सारे कारागृहात गेले. चार वर्षे आश्रम बंद होता. १९४६ला पुन्हा सुरू झाला. शांताबाईच्या निधनानंतर १९६१ ला या संस्थेची धुरा रमाबेनकडे आली. तब्बल ५५ वर्षे त्या आश्रमाच्या प्रमुख होत्या. येथील शिक्षणविषयक उपक्रमांना गती मिळाली ती त्यांच्या कार्यकाळात. वध्र्याच्या पंचक्रोशीत ‘मामीजी’ नावाने लोकप्रिय असलेल्या रमाबेनने गांधींच्या विचाराशी कसलीही तडजोड न करता शाळा व महाविद्यालये कशी चालवावीत याचा आदर्श वस्तुपाठच घालून दिला. आश्रमात रोज सूतकताई होत असे. हस्तकलेचे शिक्षण दिले जाई. संगीताचे सूर कानी पडत. यात चार हजार विद्यार्थिनी सहभागी व्हायच्या. सर्वांना खादीची सक्ती. ती स्वत:च कातायची.
याच वर्धेत बजाजांनी स्थापन केलेल्या शिक्षा मंडळाच्या महाविद्यालयातील एका विद्याथ्र्याने आश्रमातील एका विद्यार्थिनीची छेड काढली. यामुळे व्यथित झालेल्या रमाबेननी रक्षाबंधनाचा सामूहिक कार्यक्रम सुरू केला. याला वर्धेतील सर्व विद्यार्थी हजर असत. आताही तो सुरू आहे पण इतर संस्था सहभागी होत नाहीत. त्याला कारणही तसेच. महिलाश्रमातील नव्या पदाधिकार्यांचा बदललेला दृष्टिकोन. रमाबेन आयुष्यभर याच आश्रमात राहिल्या व ऑटोरिक्षाने सर्वत्र फिरल्या. एकदा शेखर बजाज आले होते. त्यांनी खटारा झालेली रिक्षा बदलून दिली. रमाबेन यांना न सांगता.
रामरतन नहार या शाळेतले एक शिक्षक. निवृत्तीनंतर ते येथेच प्रशासकीय अधिकारी झाले. रमाबेनचे विश्वासू. त्यांचे वय झाल्यामुळे तेच सर्व व्यवहार बघत. आता ते वध्र्यातच एका सदनिकेत राहतात. ३० मार्च २०१६ ला मामीजी गेल्यावर त्यांचे सुपुत्र पवन रुईया आश्रमाचे मंत्री झाले. त्यांनी संस्थेचा कायापालट जरूर केला. जुन्या पडक्या इमारती नव्याने बांधल्या. शाळा व महाविद्यालये अगदी चकाचक केली, मात्र यातून गांधीविचार हळूहळू नष्ट होत गेला. आश्रमाची मोठी जागा विकण्यात आली. त्यावर व्यापारी संकुल उभे राहिले. या व्यवहाराबाबत काही आक्षेप नाही. यामुळे संस्थेच्या तिजोरीत भर पडली, पण विचार मागे पडला त्याचे काय असा प्रश्न नहार उद्विग्नपणे विचारतात.
‘रमाबेन गेल्यावर संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमात मला बोलावले जायचे. मी त्यांच्या आठवणी सांगायचो. त्यावर आक्षेप घेण्यात आला. शेवटी मलाच संस्थेतून काढण्यात आले. आता इथे सूतकताई होत नाही. चरखा चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही. फक्त खादीचा गणवेश तेवढा उरलाय. संस्थेचे पदाधिकारीच खादी वापरत नाहीत.’ काळानुसार बदलले तर काय फरक पडतो असे विचारल्यावर ते एकदम उसळतात. ‘काळानुसार खादीची निर्मितीही बदललीच की! इतर कपड्यांना लाजवेल अशी खादी तयार होते मग ती वापरायला काय हरकत आहे?’ असा त्यांचा प्रतिप्रश्न असतो. आता श्रमदान बंद झाले आहे.
‘आधी वध्र्यातल्या कोणत्याही कार्यक्रमात आश्रमाचा सहभाग असे. पवनारला विश्व महिला संमेलन झाले होते. इंदिरा गांधी आल्या होत्या. त्यात सहभागी तीन हजार महिलांची व्यवस्था आश्रमाने केली होती. आता हे सारेच थांबले. इतर संस्था व महिलाश्रम यांच्यात काही नातेच उरले नाही. रमाबेन म्हणत, ही संस्था पालक, विद्यार्थ्यांची आहे. आता तसे वातावरण नाही. संस्थेत नातेवाईकांचा भरणा आहे. गांधी म्हणायचे- संस्था व संपत्तीकडे मालक नाही तर विश्वस्त म्हणून बघायला हवे.
हरीलाल व त्यांच्यात वाद झाला तो याच कारणावरून. त्यांनी वकिलीच्या शिक्षणाची संधी मुलाऐवजी इतरांना दिली. आता संस्था एकाच परिवाराच्या मालकीची होत असेल तर कसे सहन करायचे?’ गांधी गेल्यावर त्यांचे सुपुत्र मणिलाल यांनी आफ्रिकेतील आश्रमाची जबाबदारी सांभाळली. यात चूक काय? यावर नहार हसतात, ‘संस्था चालवण्याआधी गांधीपुत्रांनी केलेला संघर्ष, कारावास आजच्या पदाधिकार्यां-पैकी एकाच्या तरी वाट्याला आला आहे का,’ असा प्रतिप्रश्न ते विचारतात. ‘कुणाचा तरी नातेवाईक आहे म्हणून संस्थेत घेणे व सर्व गांधीवाद्यांना बाजूला सारणे हे योग्य नाही असे मला वाटते.’
संस्थेचे अध्यक्ष पवन रुईया मात्र सारे आरोप फेटाळून लावतात. काळानुसार संस्थेतील इमारतींचा कायापालट करणे गरजेचे होते. आईने ज्या सेवाभावी वृत्तीने ही संस्था उभी केली तीच वृत्ती आताच्या कार्यकारिणीतील सर्वांमध्ये आहे. संस्था टिकवायच्या असतील तर पैसा उभा करावा लागतो. त्याच हेतूने सर्व व्यवहार केले. सर्वांची संमती घेऊन. काळानुरूप संस्थेत बदल व्हायला हवा. नव्या दमाचे लोक यायला हवेत. यात काही चूक आहे, असे मला तरी वाटत नाही इतक्या स्पष्ट शब्दांत ते त्यांची बाजू मांडतात. या आश्रमातील शिक्षक, प्राचार्य विद्यार्थिनींच्या बदलत्या मनोवृत्तीवर बोट ठेवतात. आजकाल सूत कातण्यात कुणाला रस उरलेला नाही. त्यासाठी लागणारा चरखा प्रत्येक मुलीने खरेदी करावा अशी संस्थेची अट आहे. तो महाग झाल्याने कुणी तेवढा खर्च करायला तयार नाही. त्यामुळे चरख्याची सक्ती मागे घ्यावी लागली.
संस्थेचे कर्मचारी अध्यक्ष पवन रुईयांनी बरेच बदल केले असले तरी गांधीविचार मात्र कायम असल्याचा दावा करतात. समायोजनामुळे जे शिक्षक इतर संस्थांतून इथे आले आहेत त्यांना गांधीविचाराविषयी फारसे ठाऊक नाही. एक शिक्षणसंस्था म्हणून ते याकडे बघतात. यातून थोडाफार वाद उद्भवतो असे ते सांगतात. सर्वांशी बोलल्यावर एकच गोष्ट जाणवते- जुन्या विचाराला चिकटून असलेले, कुठलाही बदल स्वीकारायला तयार नसलेले गांधीवादी विरुद्ध नवे गांधीवादी असा हा संघर्ष ठळकपणे दिसतो. सध्याच्या प्रतिकूल स्थितीतही हा आश्रम, त्यातल्या शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांची गर्दी टिकवून आहेत ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.
devendra.gawande@expressindia.com
