‘अलीकडे पुस्तकं वाचतंच कोण?’, ‘एवढा वेळच नाही कोणाकडे!’, ‘अटेन्शन स्पॅन किती कमी झालाय हल्ली’, ‘आताची पिढी केवळ रील्स स्क्रोल करते…’ हे जे नाक्यावर सहज म्हटलं जातं, त्याचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं प्रतिबिंब गेल्या पंधरवड्यात दिसलं. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने आपली पुस्तकांविषयीची पानंच बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. वरवर पाहता हा कामगार कपातीमुळे ‘घ्यावा लागलेला’ निर्णय भासत असला, तरीही यातून वाचनसंस्कृतीविषयीचा बदलत चाललेला दृष्टिकोन यातून अधोरेखित होतो.

‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने गेल्या १५० वर्षांत एका कुटुंबाच्या मालकीचं स्थानिक वर्तमानपत्र ते जागतिक स्तरावरचं एक महत्त्वाचं वृत्तपत्र असा मोठा पल्ला गाठला. लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ म्हणून ही संस्था खंबीरपणे उभी राहिली. २०१३ साली जेफ बेझोस यांनी हे वृत्तपत्र ताब्यात घेतलं. मात्र गेल्या काही वर्षांत वृत्तपत्राच्या धोरणांविषयी वाचकवर्गात नाराजी व्यक्त होऊ लागली होती.

एकापाठोपाठ एक विभाग बंद केले जाऊ लागले होते किंवा त्यांचं महत्त्व तरी कमी केलं गेलं होतं. वृत्तपत्राने गेल्या पंधरवड्यात ३० टक्के कर्मचारी कपात केली. त्यामुळे पुस्तकांच्या पानांबरोबरच क्रीडा आणि स्थानिक घडामोडींसारखे अन्यही काही विभाग बंद करण्यात आले आहेत.

‘बुक वर्ल्ड’ हा विभाग वाचक, लेखक आणि प्रकाशकांत लोकप्रिय होता. या विभागाने अनेक खंद्या समीक्षकांना व्यासपीठ मिळवून दिलं. रॉन चार्ल्स आणि बेक्का रुदफेल्डसारख्या राष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या आणि विविध पुरस्कारांनी सन्मानित समीक्षकांचा त्यात समावेश होता.

‘वृत्तपत्राला नवं रूप देण्याच्या प्रयत्नांचा एक परिणाम म्हणून अन्य काही सहकार्यांबरोबरच मीदेखील माझी नोकरी गमावली आहे. कादंबर्यांचं रसग्रहण आणि समीक्षण करणार्या कर्मचार्यांशिवाय एक मुख्य राष्ट्रीय वृत्तपत्र कसं चालू शकेल, हे माझ्या आकलनापलीकडचं आहे. आता वृत्तपत्राच्या व्यवस्थापनालाच हे आव्हान पेलावं लागणार आहे,’ अशा शब्दांत चार्ल्स यांनी या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली.

अमेरिकेतल्या वृत्तपत्र वर्तुळातही याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. देशातल्या अन्य कोणत्याही वृत्तपत्राकडे एवढे उत्तम समीक्षक नव्हते, तरीही ‘बुक वर्ल्ड’ बंद करण्याचा निर्णय का घेतला गेला, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. या पानाच्या वाचक आणि लेखकांनी आयोजित केलेल्या निरोपाच्या कार्यक्रमात अनेकांनी ज्याविषयी एरवी कुठेही वाचण्याची संधी मिळाली नसती, अशा कित्येक पुस्तकांशी ‘बुक वर्ल्ड’मुळे ओळख झाल्याचे अनुभव कथन केले.

गेल्या काही वर्षांत अनेक वृत्तपत्रांतून पुस्तक परीक्षण वा साहित्यविश्वाविषयीचं वार्तांकन हळूहळू कमी केलं जाऊ लागलं आहे. यामागे बहुतेकदा कोणाला वाचनात स्वारस्य राहिलेलं नाही, त्यामुळे जागा वाया घालवण्यात अर्थ नाही, असा दृष्टिकोन दिसतो. ‘पोस्ट’नेही ‘उपयुक्त आशया’वर भर देण्यासाठी ही पुस्तकाची पानं बंद केल्याची सबब दिली आहे.

भारतातली स्थितीही फार वेगळी नाही, पण एकीकडे वृत्तपत्रांतून पुस्तकांची पानं नाहीशी होऊ लागली असताना साहित्य महोत्सवांची संख्या आणि त्यांना होणारी गर्दी मात्र वाढू लागली आहे. या विरोधाभासातही एक कारणपरंपरा दिसते. रील्स आणि शॉर्ट्स पाहून वा दाखवून क्षणार्धात आनंदही मिळतो आणि ‘लाइक्स- कमेंट्स’मधून यशाचा आभासही निर्माण होतो. परिणामी वाचन आणि लेखनासाठी प्रदीर्घ काळ गुंतवण्यातील स्वारस्य कमी होऊ लागलं आहे. साहित्य महोत्सवांत पुस्तक, लेखक, प्रकाशकांपलीकडे प्रदर्शनं आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमही असतात. तिथे रील्स, शॉर्ट्ससाठी पुरेसा आशय मिळतो, साहजिकच त्यासाठी गर्दी वाढते.

‘बुक वर्ल्ड’ बंद होणं ही केवळ ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या वाचक, समीक्षकांपुरतीच सीमित घटना नाही. एकंदर समाजातच बर्याच काळापासून वाचनाविषयी हळूहळू वाढत चाललेल्या उदासीनतेचं ते ठसठशीत दृश्य रूप आहे.