पश्चिम बंगालमधील सरकारने केलेली पाच रुपयांत मासळीभाताची घोषणा ऐकून उद्विग्न झालेल्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने वळकटी व लोखंडी पेटी उचलली. आता थेट दिल्ली गाठायची. पक्षाच्या मुख्यालयात जाऊन जाब विचारायचा असे ठरवत ते रेल्वेत बसले. कोलकाता ते दिल्ली प्रवासात त्यांना गेले सहा महिने बंगालमध्ये तळ ठोकून विजयासाठी घेतलेले कष्ट आठवले- केवळ धर्मभावना जागृत केल्यामुळे हा विजय मिळाला. आता मांसाहाराच्या माध्यमातून पुन्हा अधर्माकडे वाटचाल? छे छे! हे शक्यच नाही. सहन होत नाही- असे ते संपूर्ण प्रवासादरम्यान पुटपुटत राहिले.

दिल्लीत पोहोचल्यावर त्यांनी थेट धोरण समितीतील ज्येष्ठांना गाठून मनातली खदखद बोलून दाखवली. ती शांतपणे ऐकून घेतल्यावर एक ज्येष्ठ म्हणाले. ‘अरे, इतके नाराज व्हायचे काही कारण नाही. परिवाराचा एक घटक म्हणून पक्षाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आपली. राज्य चालवण्याची त्यांची. मांसाहाराला प्रोत्साहन देणे हे आपल्या धोरणात बसत नाही हे मान्यच, पण कधी कधी सत्तेसाठी धोरण बाजूला ठेवावे लागते. सामान्यांच्या भावनांचा विचार करावा लागतो. तिथल्या जनतेला आता कुठे आपण धर्माचरणाच्या पातळीवर आणले. आता त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी मोडायच्या असतील तर थोडा वेळ लागेल ना! निवडणुकीच्या प्रचारात त्या दीदीने ‘हे सत्तेत आले तर ‘मांसमच्छी’ बंद करतील’ अशी भीती दाखवली होती. ती खोटी हे दर्शवण्यासाठी मूळ धोरणाला बगल द्यावी लागली. याचा अर्थ ते बासनात गुंडाळले असा होत नाही.

मंदिर, समान नागरी कायदा हे दीर्घकाळ बाजूला ठेवलेले मुद्दे नंतर मार्गी लागलेच ना! अजूनही अखंड भारताचे स्वप्न अधुरे आहे. एकदा संपूर्ण देश ताब्यात आला, विरोधक नष्ट झाले, प्रश्न विचारणारे संपले की हळूच धर्मवादींना धर्मवेडे करण्याच्या कामाला लागू. काही वर्षांपूर्वी ईशान्येकडील राज्ये जिंकतानासुद्धा मांसाहाराचा मुद्दा बाजूला ठेवावा लागला होता. तिथे तर बीफचा प्रश्न होता. तरीही राज्ये ताब्यात घेण्यासाठी त्यावर ‘चुप्पी साधावी’ लागली. बीफसमोर मासोळी तर क्षुल्लकच ना! यावर तुला कुणी डिवचलेच तर सरळ पुराणकथांचा आधार घे. पृथ्वीला वाचवण्यासाठी विष्णूनेसुद्धा मत्स्यावतार धारण केला होता. त्यातून ‘मत्स्यपुराण’ घडले. त्यामुळे आता धर्माला आणखी पुढे नेण्यासाठी काहीकाळ मासोळीचा आधार घेतला तर त्यात वावगे काय, असा प्रतिप्रश्न डिवचणार्‍यांना विचार व निरुत्तर कर.

आणखी एक गोष्ट. अशा उदरभरणाच्या योजना दीर्घकाळ टिकत नाहीत. जयललितांनी ‘अम्मा कँटीन’ सुरू केलं. नंतर ‘अण्णा इडली’ आली. काँग्रेसने कर्नाटकात ‘इंदिरा थाली’ सुरू केली. महाराष्ट्रात ‘शिवभोजन थाळी’ सुरू झाली. पुढे काय झाले या योजनांचे? एकेक करत बंदच पडल्या ना! त्यामुळे किमान तू तरी मासोळीवरून उगाच ‘शिवाशिव’ करू नको. काही दिवसांत लोक ही योजनाच विसरून जातील. सामान्यांना धर्माच्या एका सूत्रात बांधून राजकीय विजय मिळवणे तसे सोपे. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे कठीण. त्यासाठी चहूकडे धार्मिक वातावरण तयार करावे लागते. देवदेवतांची भीती दाखवावी लागते. हे दीर्घकाळ चालणारे काम आहे. सर्वंकष सत्ता मिळाल्यावरच ते शक्य आहे. त्यासाठी तू आतापासून कामाला लाग’ हे ऐकल्यावर कार्यकर्ता थोडा शांत झाला व म्हणाला. ‘म्हणजे मी जिवंत असेपर्यंत तरी हे धोरण देशात लागू होणे शक्य नाही.’ यावर ज्येष्ठ हसत म्हणाले. ‘अरे तेव्हा तू जिवंत नसलास तरी तुझ्या कार्याची नोंद इतिहासात घेतली जाईलच की, जशी विष्णूची घेतली गेली तशी!’