भाजपने बंगाल सर केल्याने झालमुडी विक्रेता विक्रम साहू खुशीत होता. खुद्द मोदीजी आपल्या दुकानात येऊन गेले. त्याची देशभर चर्चा झाली. विजयाचा आनंद साजरा करताना सर्वांनी झालमुडी खाल्ली. याचाच अर्थ या यशात आपलाही वाटा आहे असे म्हणत त्याने दुकान उघडले. साफसफाई करून गल्ल्यावर बसताच अचानक तृणमूलचे पन्नासेक कार्यकर्ते आले.
खाऊन झाल्यावर दोन तास उलटले तरी ते दुकानासमोरून हटेनात व पैसेही देईनात. त्यामुळे नेहमीचे ग्राहक पाठ फिरवू लागल्यावर विक्रम अस्वस्थ झाला. रात्री दुकान बंद करेपर्यंत कार्यकर्ते उभेच. दुसर्या दिवशीही तसेच. तेच कार्यकर्ते. त्यांचे खाणे व पैसे न देणे. त्यामुळे विक्रमचा गल्ला शून्यावर आला. ही नक्कीच तृणमूलची चाल. याला तोंड कसे द्यावे या विचाराने विक्रम हैराण झाला. अखेर त्याला सुचले. भाजपची मदत मागायची. दुकानाला टाळे लावून तो पक्षाच्या मुख्यालयात गेला.
तिथे प्रचंड गर्दी. त्याने एकदोघांना सांगून बघितले. मीच तो झालमुडीवाला. पण त्याच्या बोलण्याकडे कुणी लक्षच दिले नाही. गर्दीतून वाट काढत कसाबसा तो आत गेला. महत् प्रयासाने त्याने एका नवनिर्वाचित आमदाराला गाठले. तृणमूलकडून होणारा त्रास सांगितला. सत्ता स्थापन होऊ दे. मला मंत्री होऊ दे मग तुझ्या त्रासाचे बघू असे म्हणत त्यांनी पाठ फिरवली. तेवढ्यात त्याला कुणीतरी सल्ला दिला. संघटनमंत्र्यांकडे जा. धावपळ करून त्यांना गाठले. मोदीजी येऊन गेल्यावर विक्री वाढली.
लोक सेल्फी घेऊ लागले पण सत्ताबदल होताच तृणमूलचा त्रास सुरू झाला. आता मदत करा. ऐकून घेतल्यावर मंत्र्यांनी कुणाला तरी फोन लावला. उद्यापासून दुकान उघड. आपले कार्यकर्ते तुझे रक्षण करतील. त्यानुसार विक्रमने दुकान उघडले. ते बघताच पाळत ठेवून असलेले तेच पन्नास कार्यकर्ते गोळा झाले. पुन्हा झालमुडीवर ताव मारणे सुरू झाले. पैशाचा पत्ता नाही.
भाजपवाले मदतीला येतील या आशेवर विक्रमचे आठ दिवस गेले. परिस्थिती जैसे थे. अखेर त्याने काही दिवस दुकानच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे घरी उपासमार होऊ लागली. विक्रमने पुन्हा मदतीसाठी धावाधाव सुरू केली. तेवढ्यात कुणीतरी त्याला सल्ला दिला. इकडेतिकडे दाद मागण्यापेक्षा थेट दिल्लीला जा. भाजपच्या मुख्यालयातील नेत्यांना भेट. तुझ्या झालमुडीमुळे किमान अर्धा टक्के जास्तीची मते भाजपच्या पारड्यात पडली. तेव्हा दुकानाचे गार्हाणे सांगण्याऐवजी थेट आमदारकी माग. हे ऐकून मूळचा बिहारी असलेल्या विक्रम साहूचे डोळे चमकले. तयारी करून तो थेट दिल्लीला गेला.
पक्ष मुख्यालयातला सुरक्षा रक्षक त्याला आतच सोडेना! झालमुडीचा संदर्भ देऊन खूप गयावया केल्यावर कसाबसा त्याला प्रवेश मिळाला. प्रशस्त कार्यालयात खूप चौकशी केल्यावर शेवटी तो बंगाल प्रभारींच्या कक्षात एकदाचा शिरला. मीच तो झालमुडीवाला असे म्हणताच त्यांनी काहीच ठाऊक नसल्यागत प्रश्नार्थक नजरेने बघितले. मोबाइलमध्ये असलेल्या चित्रफिती दाखवल्यावर त्यांची खात्री पटली. मग विक्रम उत्साहात सांगू लागला. माझ्यामुळे तुमचा फायदा झाला. आता मला आमदार करा. मी नववी उत्तीर्ण आहे.
राजकारण करण्यासाठी हीच पात्रता योग्य आहे. बिहारी असल्यामुळे राजकारण माझ्या रक्तात आहेच. तशीही गंगा बिहारमधूनच बंगालमध्ये वाहत येते. हे ऐकताच प्रभारींचे डोळे चमकले. क्षणभरच. मग ते म्हणाले. तू अजून बच्चा आहेस. परत जा. व्यवसाय कर. तुझ्या सुरक्षेचे बघू. निराश होत तो कोलकात्याला परतला. अचानक त्याला कल्पना सुचली. दुसर्याच दिवशी त्याने दुकानाचे नाव बदलून ‘जुमलामुडी’ ठेवले. हे बघून तृणमूलचे कार्यकर्ते सुखावले व रोज येऊन, पैसे देऊन झालमुडी खाऊ लागले. हळूहळू विक्रमचे दुकान पूर्ण शहरात प्रसिद्धीला पावले.
