उत्तम फलंदाज कसा असावा? … उत्तम फिरकी गोलंदाज कसा असावा? … उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा? .. उत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू कसा असावा?…  फलंदाजीत आक्रमण आणि बचाव यांच्यातील मेळ कसा साधावा? … फिरकी आणि मध्यमगती अशी करामत यशस्वीरीत्या एकाच गोलंदाजाला साधू शकते?… स्वच्छंदी, अभिमानी, बहुगुणी, आनंददायी कॅरेबियन किंवा वेस्ट इंडियन क्रिकेटचे मूर्तिमंत प्रतीक कोण? या अनेक प्रश्नांची उत्तरे अनेक येतील.

पण त्यांत अग्रस्थानी असेल एकच नाव – सर गारफील्ड ‘गॅरी’ सोबर्स! सुरुवातीच्या काही प्रश्नांची उत्तरे आधुनिक काळात इतर नावांतूनही मिळू शकतील – बेदी, गावस्कर, रिचर्ड्स, कपिलदेव, बोथम, इम्रान, मियाँदाद, सचिन, वॉर्न, लारा, मुरलीधरन, कॅलिस, कोहली वगैरे. परंतु गतशतकाच्या बहुतांश उत्तरार्धात या प्रश्नांना एकच सुरक्षित आणि सोयिस्कर उत्तर असायचे… गॅरी सोबर्स! क्रिकेटमधील महानतम फलंदाज म्हणून ज्यांना आजही गौरवले जाते, ते ऑस्ट्रेलियाचे फलंदाज-कर्णधार सर डॉन ब्रॅडमन यांनी सोबर्स यांचे वर्णन ‘फाइव्ह-इन-वन’ क्रिकेटर असे केले होते. सोबर्स यांची ३६५ धावांची खेळी कित्येक दशके विक्रमी ठरली होती. त्यांच्या आधी आणि नंतर कोणत्याही फलंदाजाला कित्येक वर्षे तशी खेळी साधली नव्हती. पण सोबर्स यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात इतकी झळाळती नव्हती. अवघ्या १७व्या वर्षी त्यांचा वेस्ट इंडिजच्या संघात समावेश झाला, त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि काही प्रमाणात दक्षिण आफ्रिका यांच्या मातबरीसमोर अस्तित्व दाखवण्यास वेस्ट इंडिजने सुरुवातच केली होती.

आल्फ वॅलेंटाइन हे विख्यात फिरकी गोलंदाज आजारी होते, म्हणून पोरसवदा सोबर्सला १९५४ मध्ये संधी मिळाली, एक फिरकी गोलंदाज म्हणून. त्या सामन्यात ते नवव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरले. त्यांची फलंदाजी पाहून त्यावेळचे कर्णधार जेफ्री स्टोलमेयेर यांना आपली ‘चूक’ लक्षात आली. त्यानंतर सोबर्स कधीही इतक्या खालच्या क्रमांकावर खेळले नाहीत. 

कारकीर्दीची सुरुवात डावखुरे फिरकी गोलंदाज म्हणून झाली. पण सोबर्स त्या बरोबरीने उत्तम मध्यमगती गोलंदाजी करू शकत. डाव्या मनगटाचा वापर करून त्या काळी दुर्मीळ अशा ‘चायनामन’ प्रकारावरही त्यांचे प्रभुत्व होते. ते  १७व्या वेस्ट इंडिजच्या संघात आले, तेव्हा वेस्ट इंडिजचे आणखी एक विख्यात फलंदाज एव्हर्टन वीक्स यांनी त्यांचे वर्णन ‘भेदरलेला युवक’ असे केले होते. ‘तो ड्रेसिंगरूममध्ये आमच्यात बसायला कचरायचा. त्याला काहीही करून मैदानावर जायचं असायचं. फक्त क्रिकेट खेळायला’! 

सोबर्स यांच्या काही वर्षे आधीपासून वेस्ट इंडिजने इंग्लंड-ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने जिंकायला सुरुवात केली होती हे खरे. पण क्रिकेटच्या प्रत्येक पैलूचा आविष्कार सोबर्स यांनी दाखवायला सुरुवात केली, तशी त्यांची दखल घेतली जाऊ लागली. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सुप्रसिद्ध ‘टाय’ कसोटीत सोबर्स यांनी शतक झळकावले होते. त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजीतली समज अगाध होती. क्षेत्ररक्षणातील चापल्य थक्क करणारे होते. विख्यात क्रिकेटपटू बॅरी रिचर्ड्स यांनी त्यांचे वर्णन ‘थ्रीसिक्स्टी डिग्री’ फलंदाज असे केले. म्हणजे फटका लगावण्यासाठी सोबर्स यांच्या हालचालीचे वर्तुळ बॅटच्या सुरुवातीच्या स्थितीपासून पुन्हा त्याच स्थितीपर्यंत पूर्ण व्हायचे. त्यांनी ९३ कसोटी सामन्यांत जवळपास ५९च्या सरासरीने ८०३२ धावा जमवल्या. पाकिस्तानविरुद्ध एका डावात ३६५ धावा रचल्या.

सगळेच त्या काळातील विक्रम. इतके करूनही २३५ बळी घेण्याइतकी त्यांची गोलंदाजी उपयुक्त होती. मनगटात बॅटच्या करामती प्रसवण्याची विलक्षण क्षमता नि ताकद. डाव्या हाताच्या बोटांमध्ये चेंडू वळवण्याची खुबी नि नजाकत. क्रिकेटच्या विशाल मैदानी वर्तुळात कोणत्याही स्थानी क्षेत्ररक्षण करण्याची ऊर्जा नि हिंमत. आणि सगळ्या प्रतलांमध्ये आत्मविश्वासाने वावरण्याचे हुन्नर. कोणतीही स्थिती त्यांच्यासाठी प्रमाणाबाहेर आव्हानात्मक नसे. ‘माझ्यावर सोडा’ (लीव्ह इट टू मी) असे सहकार्‍यांना त्यांचे नित्याचे सांगणे असे. एकदा जेफ्री बॉयकॉटना म्हणाले, ‘तुझे फलंदाजी तंत्र सदोष आहे’. तंत्राविषयी अतीच अभिमानी बॉयकॉट भांबावले आणि तंत्रात सुधारणेसाठी सोबर्स यांची मदत त्यांनी मागितली. खुल्या दिलाने सोबर्स यांनी त्यांना चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. पुढच्याच सामन्यात सोबर्स यांच्या गोलंदाजीवर बॉयकॉट बाद झाले. ‘तू दुसर्‍या त्रुटीविषयी विचारले नाहीस’ असा सोबर्स यांचा त्यावर टोला! एका सामन्यात डेनिस लिली फलंदाजीस उतरले.

वर्ल्ड इलेव्हन विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा तो सामना. सोबर्स यांनी चेंडू मागितला. ‘याला बाउन्सर कसे टाकतात हे दाखवतो’. सोबर्स यांचा एकही चेंडू लिली यांना खेळता आला नाही. पॅव्हेलियनमध्ये परतताना आक्रमक लिली उद्गारले,‘मलाही संधी मिळेल.’ यावर, ‘त्याचीच वाट पाहतोय,’ हे सोबर्स यांचे उत्तर. त्या डावात सोबर्स यांनी २५४ धावा चोपल्या. त्यात विशेष वागणूक लिली यांनाच मिळाली. ऑस्ट्रेलियन भूमीवरील सर्वोत्कृष्ट खेळी असे तिचे वर्णन डॉन ब्रॅडमन यांनी केले. 

सोबर्स यांनी क्रिकेटवर मनमुराद प्रेम केले. तो त्या काळाचा महिमा होता. वेस्ट इंडिज क्रिकेटला स्वत:ची ओळख आणि स्थान प्राप्त होऊ लागले होते. गौरेतर क्रिकेट दुनियेसाठी – भारतासाठी हे खूप महत्त्वाचे होते. वेस्ट इंडियन क्रिकेटपटूंनी भारतीय संघाविषयी ममत्व वगैरे दाखवले नाही. पण दोन्ही देशांतील सामान्यांना परस्परांच्या क्रिकेटपटूंविषयी, त्यांच्या प्रगतीविषयी विलक्षण आदर होता. वसाहतोत्तर, नवस्वतंत्र देशांतील नागरिकांसाठी क्रिकेटच्या मैदानावर गोर्‍यांविरुद्ध प्रत्येक विजय, एखादे शतक किंवा बळींची मालिका महत्त्वाची ठरायची.

खुद्द सोबर्स यांनी थेट किंवा टोकाची राजकीय भूमिका घेतली नाही. त्यांची रोजीरोटी कौंटी क्रिकेटमधून यायची. कारण त्या काळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून – त्यातही वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाकडून मिळणारे मानधन तुटपुंजे होते. सोबर्स यांनी सर्वच आदर्श मूल्यांचे आचरण केले असेही नाही. त्यांना जुगाराचा अतोनात नाद होता, मद्यालयांविषयी आस्था होती. याचा परिणाम कधी त्यांच्या कामगिरीवर झाला नाही. त्यांचे समकालीन आणि चरित्रकार ट्रेव्हर बेली यांनीच याविषयी म्हटले की, संतमहात्मे चर्चबाहेर कंटाळवाणेच भासू लागतात! 

सोबर्स यांच्या जीवनात विविध रंग होते, रस होते. त्यांतील अनेक क्रिकेटच्या मैदानावर दिसून अवतरले. त्यांचा आस्वाद लाखो क्रिकेटप्रेमींनी पुरेपूर घेतला. साठ-सत्तरच्या दशकात ब्राझीलचे पेले आणि अमेरिकेचे मोहम्मद अली यांनी क्रीडा क्षेत्रात गौरेतरांचा – त्यातही काळ्यांचा अत्युच्च करिश्मा सादर केला. मोहम्मद अली त्याविषयी तीव्र अभिव्यक्त होते, पेले तसे नव्हते. सोबर्स यांची कामगिरी या दोघांच्या तोडीची होती. त्या अर्थी ते क्रिकेटमधील ‘ब्लॅक पर्ल’ होते. या हरहुन्नरी क्रिकेट महात्म्याला ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.