scorecardresearch

चांदनी चौकातून: संसदेत रेलचेल कोणाची?

करोनानंतर फार कमी जणांना संसद भवनात येण्याची मुभा मिळत होती. पत्रकारांच्या प्रवेशावर गदा आली.

chadanichowk

दिल्लीवाला

करोनानंतर फार कमी जणांना संसद भवनात येण्याची मुभा मिळत होती. पत्रकारांच्या प्रवेशावर गदा आली. खासदारांच्या मदतनीसांनाही प्रवेश दिला जात नव्हता. संसदेचं मध्यवर्ती सभागृह बंद झालं. खासदारांचीही आसनव्यवस्था बदलली गेली. लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाची वेळ बदलली गेली. एक खासदार राज्यसभेत, दुसरा लोकसभेत, तिसरा प्रेक्षकांच्या कक्षात अशी कसरत करत करत सभागृहाचं कामकाज चाले. संसद भवनाबाहेर करोनाचे निर्बंध पाळले जात आहेत की नाही हे महत्त्वाचं नव्हतं. संसद भवनात आल्यावर मात्र निर्बंधांची सक्ती होती. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांना संसद भवनात कुठून प्रवेश मिळणार? गेल्या हिवाळी अधिवेशनापासून लोकांसाठी संसद भवनाची दारे खुली झाली आहेत. दरवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात दिल्लीत देशभरातून लोक येत असतात. दिल्ली भ्रमणामध्ये संसद भवन पाहण्याचा कार्यक्रमही समाविष्ट असतो. दोन वर्षांनंतर या वेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसद भवनामध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळाली. त्यात शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी होते, खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील लोकांना संसद भवन पाहायला आणलेलं होतं. त्यामुळं संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर भल्यामोठय़ा रांगा लागलेल्या होत्या. सभागृहांमध्येही प्रेक्षक कक्षांमधली बाकं पूर्वीसारखी भरून गेलेली होती. संसद भवनाच्या नवीन इमारतीचं काम सुरू असल्यामुळं लोकांना थोडी अडचण सहन करावी लागते. पण, संसदेतील अधिवेशनाचं कामकाज पाहायला मिळालं हीच त्यांच्यासाठी मोठी बाब असते. पण देशभरातील लोकांना संसद भवनात प्रवेश दिला जात असेल, त्यांना करोना निर्बंध पाळण्याची सक्ती नसेल तर, हा नियम फक्त प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना का लागू केला जात आहे, हे कोणालाही माहिती नाही! लोकांसाठी आणखी नवी गोष्ट म्हणजे संसद भवनातील खानावळीत भरड धान्यांचे पदार्थही मिळू लागले आहेत. तिथे बाजरीच्या खिचडीसारख्या पदार्थाचा आस्वाद घेण्याचा अनुभवही आता लोकांना मिळेल. मंत्र्यांच्या भोजनावळी, कार्यक्रमांमध्ये भरड धान्यांचे पदार्थ असले पाहिजेत असा आग्रह आता धरला जाऊ लागला आहे. संसद भवनामध्ये लोकांची आणि नव्या पदार्थाची रेलचेल सुरू झाली आहे.

‘व्हायरल’ची शिक्षा
राज्यसभेचे सभापती धनखड यांनी शुक्रवारी सकाळच्या सत्रामध्ये विरोधकांना इशारा देताना सभागृहात झालेल्या चित्रीकरणाचा विषय काढला होता. मोबाइलवर चित्रीकरण करणं योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. पण, संध्याकाळी ते या मुद्दय़ावर खासदाराचं निलंबन करतील असं सदस्यांना वाटलं नव्हतं. मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी गोंधळ घालून जितके अडथळे आणता येतील तेवढे आणले होते. विरोधी सदस्यांच्या आरडाओरडय़ामुळं मोदींनाही दखल घ्यावी लागली होती. मोदी त्यांना थेट काही बोलले नाही, पण त्यांच्यावर कदाचित कारवाई होऊ शकते, अशी शक्यता मात्र निर्माण झाली होती. अदानी प्रकरणाच्या चौकशीवरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष या पक्षांचे सदस्य घोषणाबाजी करण्यात अग्रेसर होते. मोदींचं भाषण जसजसं पुढे सरकू लागलं तसा विरोधही तीव्र होत गेला. पण, संसद टीव्हीनं विरोधकांना पडद्यावर दाखवलंच नाही. संसद टीव्हीचा दुजाभाव विरोधकांच्या रागाचं कारण बनला होता. फक्त मोदींना दाखवलं जातं, आपले चेहरेच दिसत नाहीत. सभागृहात आपण काय करतोय हे लोकांना कसं समजणार, या भावनेतून बहुधा काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांना विरोधी सदस्यांनी सभागृहातील विरोधकांच्या घोषणाबाजीचं चित्रीकरण करायला सांगितलं असावं. रजनी पाटील यांनी मोबाइलवर चित्रीकरण केलं. पण, ती चित्रफीत त्यांनी व्हायरल केली नाही, कोणी अन्य सदस्यांनी गोंधळ ट्वीट केला, त्याकडं लोकांचं लक्ष गेलं. भाजपच्या समाजमाध्यम विभागाकडून अनेक चित्रफिती व्हायरल होतात, पण, ही चित्रफीत विरोधी पक्षांकडून व्हायरल झाली. या व्हायरल प्रकरणाची दखल भाजपच्या खासदाराने घेतली. मग, शुक्रवारी संध्याकाळी सुमारे ४० मिनिटं राज्यसभेत नाटय़ घडलं. संसद टीव्हीनं विरोधकांना का लपवलं, असं सभागृहात विचारलं गेलं. पण, हा मुद्दा बाजूला राहिला. कृषी विधेयक संमत करताना राज्यसभेत दोन-तीन दिवस प्रचंड गदारोळ झाला होता. त्याची शिक्षा विरोधी पक्षांच्या सदस्यांना वर्षांखेरीस झालेल्या हिवाळी अधिवेशनात मिळाली होती. आता वारंवार शिस्तीचा बडगा उगारला जाईल असं दिसतंय.

झटपट विचारा प्रश्न
खासदारांसाठी प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहर सर्वात महत्त्वाचे असतात. अधिवेशनाच्या कामकाजाचे पहिले दोन तास खासदारांचे असतात. त्यांना तिथं बोलण्याची संधी चुकवायची नसते. बाकी, कामकाज होतच असतं, चर्चामध्ये पक्षाकडून बोलायला मिळतंच असं नाही. प्रश्नोत्तराच्या तासाला आपापल्या मतदारसंघातील प्रश्न मांडणं, मंत्र्यांकडून उत्तर मिळवणं हेच खासदारांचं खरं काम असतं. शून्य प्रहरात अनेक तत्कालीन मुद्दय़ांकडं मंत्र्यांचं लक्ष वेधून घेतलं जातं. या वेळी खासदारांना बोलायला मिळालेलं नाही. पहिल्या दिवशी राष्ट्रपतींचं अभिभाषण, दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्प, नंतर तीन दिवस तहकुबी. त्यामुळं महत्त्वाचे हेच दोन तास वाया गेले. मंगळवारी १२ वाजल्यापासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली. हा वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी लोकसभेत सध्या संध्याकाळी शून्य प्रहर घेऊन खासदारांना बोलण्याची संधी दिली जात आहे. प्रश्नोत्तराच्या तासालाही नेमका प्रश्न विचारा म्हणजे अधिकाधिक प्रश्नांचा निपटारा होईल असं दोन्ही सदनांमध्ये पीठासीन अधिकारी वारंवार सदस्यांना सांगत आहेत. सवयीनुसार एखादा खासदार मुख्य प्रश्नाआधी प्रस्तावना करण्यातच अधिक वेळ घेतो. शुक्रवारी धनखड सदस्यांनाच नव्हे मंत्र्यांनाही नेमकं बोला असं सांगत होते. काही सदस्य तर एक मिनिट तरी जास्त द्या, अशी सभापतींना काकुळतीला येऊन विनंती करत होते.

आणि पंतप्रधान हसले!
संसदेच्या अधिवेशनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनामध्ये येतात पण, दररोज ते सभागृहांमध्ये येतातच असं नाही. आठवडय़ातून एकदा ते दोन्ही सभागृहांच्या कामकाजामध्ये सहभागी होतात. या वेळी अदानी प्रकरणामुळं वातावरणामध्ये किंचित का होईना तणाव जाणवत होता. लोकसभेत विरोधकांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलताना अदानी प्रकरणावरून मोदींवर कठोर शाब्दिक प्रहार केले होते. तिथं दुपारनंतर मोदींना उत्तर द्यायचं होतं. पण, सकाळच्या सत्रात मोदी राज्यसभेत येऊन बसले. वरिष्ठ सभागृहातही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होती. चर्चेनं टोकदार वळण घेतलेले होते, विरोधक अदानीवरून केंद्रावर टीका करत आहेत, असं सगळं दडपण आणणारं चित्र होतं. मोदी अत्यंत गंभीर चेहऱ्यानं बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरची रेषही हलत नव्हती. काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंना बोलण्यासाठी अखेरची १५-२० मिनिटं देण्यात आलेली होती. खरगे त्वेषाने बोलतात, मध्ये कोणी बोललेलं त्यांना आवडत नाही. अनेकदा ते भाजपच्या सदस्यांना गप्प करतात. पण, या वेळी त्यांनी सभापती जगदीप धनखड यांची फिरकी घेतली. ते धनखडांना म्हणाले की, तुम्ही सर्वोच्च न्यायालयात वकिली पेशा सुरू केला, तेव्हा पैसे हाताने मोजत होता.

तुम्हीच मला हे सांगितलेलं होतं.. धनखड म्हणाले, हो. बरोबर.. मग, खरगे म्हणाले, पण,
काही काळानंतर तुम्ही पैसे मशीननं मोजायला लागलात!. खरगेंच्या हलक्याफुलक्या वाक्यांनी सभागृहात खसखस पिकली. मोदीही हसायला
लागले. धनखडांनी, नाही.. नाही म्हणत हात जोडले. विरोधी बाकांकडून आलेल्या वाक्यांवर सत्ताधारी बाकांवरून हसून प्रतिसाद मिळणं कठीण होऊन झालं आहे. खरगेंनी ही किमया करून दाखवली. खरगेंच्या भाषणातील शेरो-शायरी कामकाजातून काढून टाकली हा भाग वेगळा! त्यावरून काँग्रेसच्या प्रमोद तिवारींनी धनखडांना, ‘तुम्ही किती वेळा प्रेम केलं’, असा थेट प्रश्न करून अडचणीत टाकलं. धनखड म्हणाले, शेरो-शायरीमुळं प्रेम होतं की, प्रेमामुळं शेरो-शायरी होते? त्यावर, तुम्हीही प्रेम केलं असेल, आठवून पाहा, असं म्हणत तिवारींनी सभापतींनाच कोडय़ात टाकलं.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 04:03 IST
ताज्या बातम्या