– सुमेध सावंत
चेंडू जमिनीवर पडला की त्याचे टप्पे पडतात. या टप्प्यांचं स्वरूप हे चेंडू ज्या पृष्ठभागावर पडणार तो पृष्ठभाग आणि चेंडू या दोन्ही गोष्टी कशापासून बनल्या आहेत यावर अवलंबून असतं. कोणतीही वस्तू जेव्हा गतिमान असते तेव्हा तिच्यामध्ये गतिज ऊर्जा असते. वस्तूच्या गतीनुसार ही ऊर्जा कमीजास्त होत असते. चेंडूमध्ये असलेली ही गतिज ऊर्जा, जेव्हा चेंडू एखाद्या पृष्ठभागावर आदळतो तेव्हा कमी होते.
मऊ पृष्ठभागावर जेव्हा तुलनेने कडक पदार्थापासून बनवलेला चेंडू आपटतो, तेव्हा चेंडूची बरीचशी गतिज ऊर्जा तो मऊ पृष्ठभाग वाकवण्यात खर्च होते. त्यामुळे तो फारसा उलटा उसळत नाही. जर चेंडूची सारी गतिज ऊर्जा पृष्ठभाग वाकवण्यात आणि काही प्रमाणात आवाज निर्माण होण्यात म्हणजेच ध्वनीऊर्जेत खर्च झाली तर उलट उसळी मारण्यासाठी चेंडूकडे ऊर्जाच राहात नाही. मग तो जागेवरच थांबतो. म्हणूनच जर गादीवर चेंडू टाकला तर तो फार उसळत नाही. चेंडू गादीवर पडताना जर अलगदपणे पडला असेल तर अजिबात न उसळता, तो चेंडू तिथल्या तिथे थांबतो.
जर चेंडू आणि पृष्ठभाग दोन्ही टणक पदार्थापासून बनलेले असतील, तर चेंडू आणि काही अल्प प्रमाणात टणक पृष्ठभागही दबला जातो. मात्र यात चेंडूची फारच कमी ऊर्जा वापरली जाते. मात्र ‘स्थितिस्थापकत्व’ या गुणधर्मामुळे ते दोघेही आपल्या मूळ आकारात येतात. मूळ आकारात परत येताना, जमिनीकडून चेंडूला परत थोडी ऊर्जा पण उलट्या दिशेनं मिळते आणि चेंडू राहिलेली ऊर्जा वापरून उलट उसळी मारतो. पण या सगळ्या देवाणघेवाणीत थोडी ऊर्जा कमी झाल्यामुळे, चेंडू मूळ उंचीपेक्षा कमी उंची गाठतो.
ट्रॅम्पोलिनसारखे काही पृष्ठभाग आकारात जास्तीत जास्त बदल होण्यासाठी बनवलेले असतात. त्यांच्या आकारात होणारा मोठा बदल, त्यांच्यावर येऊन पडणार्या चेंडूची जवळपास सारीच गतिज ऊर्जा शोषून घेतो आणि त्यांच्या आकारातही मोठा बदल होतो. पण त्यांच्या विशेष गुणधर्मामुळे, ते मूळ आकारात लगेच परतताना, त्यांना चेंडूपासून मिळालेली जवळपास सारी ऊर्जा चेंडूला परत देतात. त्यामुळे उलटा उसळणारा चेंडू जवळपास सुरुवातीची उंची गाठतो.
काही विशेष पृष्ठभाग टकरीनंतर कंप पावू लागतात. जर या कंपनांपैकी एक कंपन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आणि चेंडूला जास्तीत जास्त उंची गाठून खाली येण्यास लागणारा वेळ, हे जर एकमेकांच्या पूर्णांक पटीत असतील तर हळूहळू चेंडू मूळ उंचीपेक्षाही जास्त उंची गाठतो. या प्रकाराला ‘रेझोनन्स’ म्हणजेच ‘अनुनाद’ असं म्हणतात. त्यानंतर मात्र हळूहळू चेंडूची ऊर्जा कमी होत जाते आणि त्याच्या टप्प्यांची उंची कमीकमी होत जाते.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
