शालिनी जोशी
आपल्याकडे ज्या जुन्या पोथ्या, पुस्तकं, कात्रणं असतात, त्यांचा कागद पिवळा पडलेला दिसतो. नवीन असताना पांढरा असणारा कागद कालांतराने पिवळा का बरं पडतो? कागद वनस्पतीजन्य असतो. तो लाकडाच्या लगद्यापासून तयार करतात. त्यासाठी निलगिरी, सुबाभूळ, सुरू अशा झाडांचा वापर केला जातो. लाकडातील मुख्य घटक म्हणजे सेल्युलोज, जे पांढरं असतं. लाकडातला आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे लिग्निन! ते गडद तपकिरी रंगाचं असतं. लिग्निन सेल्युलोजचे तंतू एकत्र बांधतं आणि झाडांना मजबूत बनवतं. लिग्निन नसेल तर झाड जास्त उंच वाढू शकत नाही.
असं हे लिग्निन झाडासाठी उपयोगी असलं तरी, कागदावर त्याचा वेगळा परिणाम होतो. या लिग्निनचा, प्रकाशातले अतिनील किरण किंवा हवेतल्या दमटपणा आणि ऑक्सिजनशी संपर्क आला तर, त्यांच्याशी त्याची रासायनिक अभिक्रिया होते. या अभिक्रियेमुळे अस्थिर झालेलं लिग्निन, जास्तीचा सूर्यप्रकाश शोषतं. या जास्तीच्या सूर्यप्रकाशामुळे कागदातल्या रेणूंची रचना विस्कळीत होऊ लागते. परिणामी कागद पिवळा पडतो. शिवाय ठिसूळ म्हणजेच जीर्ण होत जातो.
जुने कागद पिवळे पडण्यामागचं अजून एक कारण म्हणजे जुन्या काळी कागद तयार करताना वापरण्यात आलेली तुरटी! कागदावर शाई पसरू नये म्हणून तिचा वापर केला जात असे. असा कागद सूर्यप्रकाशाच्या व हवेच्या संपर्कात आल्यावर काही रासायनिक अभिक्रिया घडतात. त्यामुळेही कागदाची आम्लता वाढते आणि सेल्युलोजचे रेणू कमकुवत होतात. हळूहळू कागद जीर्ण होतो, पिवळा पडतो. त्यावर उपाय म्हणजे, कागद हवा आणि सूर्यप्रकाशापासून पूर्णपणे दूर ठेवणं!
म्हणूनच, ऐतिहासिक कागदपत्रं दीर्घकाळ टिकवण्यासाठी, त्यांना प्रकाश व दमटपणापासून दूर ठेवतात. तापमान नियंत्रित केलेल्या अंधार्या खोलीत त्यांचं आयुर्मान वाढतं. तसंच जुनी कागदपत्रं टिकण्यासाठी त्यांच्यावर काही रासायनिक प्रक्रियाही केल्या जातात.
चांगल्या प्रतीचा पांढरा कागद तयार करताना त्यातलं लिग्निन काढण्यासाठी विशेष प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया खर्चीक असली तरी त्यामुळे कागद दीर्घकाळ पांढरा राहतो. कमी प्रतीचा कागद तसंच वर्तमानपत्राचा कागद तयार करताना अशा प्रक्रिया केलेल्या नसतात. त्यामुळे त्यात लिग्निनचं प्रमाण जास्त असतं. याच कारणामुळे वर्तमानपत्राचा कागद लवकर पिवळा पडतो. खाकी कागद, पुठ्ठे तयार करताना मात्र लिग्निनचा वापर मुद्दाम केला जातो. त्यामुळे कागद ताठ व मजबूत होतो. अशा वेळी कागदाचा रंग पांढराशुभ्र असण्याची गरज नसते.
एक गोष्ट मात्र खरी की कागद पांढराशुभ्र असो किंवा पिवळा पडलेला असो, त्याचं पुनर्चक्रीकरण नक्की करता येतं.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
