‘विमेन्स प्राइज-२०२६’ची अंतिम निवड यादी जाहीर झाली असून यादीतील सहा कादंबर्‍या मिसिसिपी डेल्टापासून १९६० च्या दशकातील ब्रॅडफोर्डपर्यंत विविध विषयांना स्पर्श करतात. त्यांची भौगोलिक पार्श्वभूमी वेगळी असली, त्यातील पिढ्यांत अंतर असले, तरीही महिलांसमोरची आव्हाने आणि ती पेलून पुढे जाण्याची त्यांची क्षमता, हा या सर्व पुस्तकांतील समान धागा दिसतो. समाजात महिला किती वैविध्यपूर्ण भूमिका बजावतात, त्यांच्या क्षमतांचा अवकाश किती मोठा आहे आणि त्या आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करू शकतात का, निवडीचे स्वातंत्र्य त्यांना असते का, याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न या पुस्तकांत दिसतो.

फ्लॅशलाइट

सुसान चोई यांच्या या कादंबरीचा समावेश बुकर पारितोषिकासाठीच्या लघुयादीत (२०२५) करण्यात आला होता. ही कादंबरी सेर्क नावाच्या एका कोरियन वडिलांची कथा सांगते, जे १९७८ मध्ये आपली १० वर्षांची मुलगी- लुईसाबरोबर समुद्रकिनार्‍यावर फिरत असताना गायब होतात. चोई यांनी, उत्तर कोरियाकडून अपहरण झालेल्या हजारो दक्षिण कोरियन नागरिकांच्या आयुष्यातील घटनांचा आधार यात घेतला आहे.

द कॉरस्पॉन्डंट

व्हर्जिनिया इव्हान्स यांची पत्रव्यवहार स्वरूपातील ही पहिलीच कादंबरी आहे. यात सिबिल व्हॅन अँटवर्प या पात्राच्या जीवनाचे चित्रण आहे. कथेची सुरुवात अँटवर्प सत्तरीच्या घरात असताना होते. नायिका तिच्या मुलांबरोबरचे गुंतागुंतीचे नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करताना, ३० वर्षांपासून मनात बाळगलेल्या एका व्यथेचा सामना करताना दिसते.

हार्ट अँड द लव्हर

या यादीतील सर्वांत प्रस्थापित नावांपैकी एक म्हणजे लिली किंग. त्यांच्या या कादंबरीची नायिका महाविद्यालयात दोन गुणवान विद्यार्थ्यांच्या धुंद आणि मोहक विश्वात ओढली जाते. अनेक दशकांनी, एका अनपेक्षित भेटीमुळे तिला तारुण्यातील निर्णयांचा सामना करणे भाग पडते.

डॉमिनियन

ॲडी ई. सिटचेन्स यांची पहिलीच कादंबरी ‘डॉमिनियन’ ही सहस्रकाच्या सुरुवातीच्या काळात मिसिसिपीमधील एका काल्पनिक गावात घडते. सेव्हन सील्स बॅप्टिस्ट चर्च, स्थानिक केशकर्तनालय आणि रेडिओ स्टेशन रेव्हरेंड सेबर विन्फ्रे यांच्या नियंत्रणात आहे. त्यांचा धाकटा मुलगा, इमॅन्युएल ‘वंडरबॉय’ म्हणून ओळखला जातो. एका अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण समाजात खळबळ उडते. ही कादंबरी प्रामुख्याने प्रिसिला आणि डायमंड या दोन महिलांच्या दृष्टिकोनातून सांगितली आहे.

द मर्सी स्टेप

मार्सिया हचिन्सन यांची ही कादंबरी, एका कृष्णवर्णीयाच्या मालकीच्या लहान स्वतंत्र प्रकाशक असलेल्या ‘कसावा रिपब्लिक’कडे येण्यापूर्वी ५० हून अधिक वेळा नाकारली गेली होती. त्या वयाच्या ६० व्या वर्षी पूर्णवेळ लेखिका बनल्या. ही कादंबरी १९६० च्या दशकातील ब्रॅडफोर्डमधील मर्सी नावाच्या एका हुशार लहान मुलीची कथा सांगते, तिच्या वडिलांचा स्वभाव तापट आहे आणि आईची चर्चवर प्रचंड निष्ठा आहे. नायिका यातून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात दिसते.

किंगफिशर

रोझी केली यांची ही कादंबरी एका सर्जनशील लेखक आणि प्राध्यापकाभोवती फिरते. हा प्राध्यापक आपल्या सहकारी महिलेच्या प्रेमात पडतो. या वेडामुळे त्याचे मूळचे नाते धोक्यात येते. केंद्रस्थानी पुरुष असला, तरीही या पुस्तकात ज्या सत्ता-संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, ते या पुरस्काराच्या परंपरेशी सुसंगत आहे.

११ जून रोजी पुरस्कार घोषित केला जाईल. विजेता वा विजेतीला ३०,००० पाउंडच्या रोख रकमेबरबोरच ‘बेसी’ ही पुरस्काराची कांस्य मूर्ती प्रदान केली जाईल.