– अपर्णा कुलकर्णी
जागतिक बँकेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘Poverty, Prosperity, and Planet Report 2026 : Jobs at the Center of Poverty Eradicationl’ या अहवालातून जगाच्या आर्थिक विकासाचे एक विरोधाभासी चित्र उभे राहते. एकीकडे जगभर आत्यंतिक दारिद्र्य- एक्स्ट्रीम पॉव्हर्टी- कमी करण्याची प्रक्रिया मंदावते आहे, तर दुसरीकडे भारताने अलीकडील काळात दारिद्र्यात सर्वाधिक घट नोंदवली आहे. या अहवालानुसार, जागतिक बँकेच्या सुधारित ३.०० अमेरिकी डॉलर प्रति दिन प्रति व्यक्ती (जानेवारी २०२६ पासून डॉलरचा सरासरी दर लक्षात घेता सुमारे २८३ रु.; सन २०११ च्या सरासरी विनिमय दरानुसार सुमारे १४० रु.) या आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेनुसार भारतातील दारिद्र्याचे प्रमाण २०११ सालातील २७.१ टक्क्यांवरून २०२३ मध्ये २.६ टक्के इतके घसरले आहे. यामुळे अंदाजे ४९.६ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत. यातून जागतिक अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या विकासाचे आश्वासक चित्र निर्माण झाले आहे.
जागतिक बँकेची दारिद्र्य-मापन पद्धत
जागतिक बँक दारिद्र्य मोजण्यासाठी घरगुती उपभोग खर्च किंवा उत्पन्नाची तुलना आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषांशी करते. या रेषा क्रयशक्ती समता (पर्चेसिंग पॉवर पॅरिटी) पद्धतीने निर्धारित केल्या जातात. जागतिक बँकेने २०२६ च्या अहवालात २०२१ चे क्रयशक्ती प्रमाण वापरले आणि आत्यंतिक दारिद्र्यरेषा २.१५ डॉलरवरून ३.०० डॉलर प्रति दिन प्रति व्यक्ती इतकी सुधारित केली. अल्प-मध्यम उत्पन्न देशांसाठी ४.२० डॉलर प्रति दिन दारिद्र्यरेषा निश्चित केली.
भारतासाठी जागतिक बँक ‘राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालया’च्या ‘घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणा’च्या माहितीचा आधार घेते. २०२२-२३ आणि २०२३-२४ या अलीकडील सर्वेक्षणांतील माहितीनुसार सुधारित मिश्र स्मरण-कालावधी (मॉडिफाइड मिक्स्ड रेफरन्स पीरिअड- एमएमआरपी) पद्धत वापरली गेली आहे. या पद्धतीत वस्तूंच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या स्मरण-कालावधीतील खर्च नोंदवला जातो; याने जुनी समान स्मरण-कालावधी (युनिफॉर्म रेफरन्स पीरिअड- यूआरपी) पद्धत मागे पडली आहे. जागतिक बँकेच्या भारतासंबंधीच्या विश्लेषणात सार्वजनिक कल्याणकारी योजनांद्वारे मिळणार्या मोफत वस्तू व सेवांचे मूल्यही समाविष्ट केले आहे. अन्न, निवारा, स्वयंपाकाचा गॅस, वीज आणि आरोग्य सेवा यांसारख्या लाभांमुळे दारिद्र्यरेषेखालील लोकांचे जीवनमान लक्षणीयरीत्या सुधारल्याचे लक्षात आले आहे.
भारतासारख्या मोठ्या अनौपचारिक क्षेत्राच्या अर्थव्यवस्थांमध्ये उत्पन्नाच्या तुलनेत उपभोग खर्चाचे सर्वेक्षण जीवनमान मोजण्यास अधिक योग्य ठरते. परंतु उच्च-उत्पन्न असणार्या कुटुंबांचा खर्च यात पूर्णपणे नोंदवला जात नाही, हेही इथे लक्षात घेतले पाहिजे.
भारताचा दारिद्र्य-निर्मूलनाचा प्रवास
भारताची दारिद्र्य निर्मूलनाची कामगिरी ही या अहवालातील सर्वांत महत्त्वाच्या निष्कर्षांपैकी एक आहे. २०११-२३ या कालावधीत निम्न-मध्यम उत्पन्न देशांसाठी तीन डॉलर प्रति दिन या निकषानुसार दारिद्र्यरेषेखालील भारतीयांचे प्रमाण २७.१ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांवर येत असताना, अल्प-मध्यम उत्पन्न देशांच्या ४.२० डॉलर या रेषेखालील प्रमाण ५७.७ टक्के वरून १६.१ टक्के इतके घटले. त्या देशांत या कालावधीत अंदाजे ४९.६ कोटी लोक ४.२० डॉलर प्रति दिन या रेषेच्या वर आले.
उदारीकरणानंतरच्या दशकांत भारताने दारिद्र्य लक्षणीय प्रमाणात कमी केले होते; परंतु २०११-२३ मधील घट विशेष महत्त्वाची आहे, कारण ती कोविड-१९ संकट, महागाई आणि अनौपचारिक उपजीविकांवरील खर्च यांच्या पार्श्वभूमीवर घडली. जागतिक बँकेच्या मते, या सुधारणेत रोजगारवाढीचा वाटा मोठा आहे. भारतात २०१७ ते २०२३ या काळात सुमारे १३.४ कोटी रोजगार वाढले. ग्रामीण भागातील महिलांचा वेतनभोगी कामात सहभाग वाढल्याने प्रत्येक घरातील कमावणार्या सदस्यांची संख्या वाढली.
या अहवालानुसार जगभर सुमारे ८१.१ कोटी लोक- म्हणजे प्रत्येक दहापैकी एक व्यक्ती तीन डॉलर प्रति दिन या दारिद्र्य रेषेखाली जगत आहेत. हे प्रमाण २०१९ नंतर जवळपास बदललेले नाही. सर्वसमावेशक वाढ न झाल्यास २०३० पर्यंत जगात आत्यंतिक दारिद्र्यातील लोकसंख्या आणखीही वाढू शकते असा जागतिक बँकेचा इशारा आहे. या पार्श्वभूमीवर भारत हा मोठा अपवाद ठरतो.
भारताची दारिद्र्यरेषा तीन प्रभावशाली तज्ज्ञ-गटांच्या शिफारशींद्वारे विकसित झाली आहे. (तक्ता पाहावा)
जुन्या पद्धतींमधील कालबाह्य उपभोग-प्रमाण, अपुरे महागाई-समायोजन आणि आरोग्य व शिक्षण सार्वजनिकरीत्या उपलब्ध असल्याची गृहीतके या तीन त्रुटी दूर केल्यामुळे तेंडुलकर पद्धत अधिकृत दारिद्र्य-अंदाजाचा आधार बनली. तर रंगराजन समितीने अधिक उदार दारिद्र्यरेषेचा पुरस्कार केला. यावरून असे स्पष्ट होते की, दारिद्र्य मोजणे हा केवळ तांत्रिक विषय नाही, तर नैतिक निर्णयांशीही संबंधित आहे.

उपभोग आणि रोजगार या दोन्ही निर्देशकांमध्ये भारताची अलीकडच्या काळातील प्रगती स्पष्ट दिसते. रोजगारवाढ हा या प्रगतीचा केंद्रबिंदू आहे. भारतीय श्रमबाजारात २०१७ ते २०२३ दरम्यान १३.४ कोटी कामगारांची भर पडली. विशेषत: ग्रामीण महिलांचा श्रमबाजारातील सहभाग वाढल्याने कुटुंबांचे उत्पन्न वाढले आणि एकाच उत्पन्न-स्रोतावरील अवलंबित्व कमी झाले. रोजगार हाच आर्थिक वाढ आणि दारिद्र्यनिर्मूलन यांच्यातील सर्वात प्रभावी दुवा आहे, असे मत जागतिक बँकेने या निमित्ताने नोंदवले आहे.
आर्थिक विषमतेचे आव्हान
भारताच्या दारिद्र्य-घटीच्या तुलनेत आर्थिक विषमतेचे चित्र अधिक वादग्रस्त आहे. अलीकडील अहवालांत उल्लेख असलेल्या जागतिक बँकेच्या ‘इंडिया पॉव्हर्टी ॲण्ड इक्विटी ब्रीफ’नुसार, भारताचा गिनी निर्देशांक (मासिक उत्पन्न व संपत्ती विषमतेचे प्रमाण मोजणारा गुणांक) २० टक्क्यांनी घटून २३ टक्के एवढा झाला आहे. या मापनानुसार भारत तुलनेने कमी विषमता असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये मोडतो. गिनी निर्देशांक हा ० ते १०० दरम्यान असतो. ० गिनी म्हणजे पूर्ण समानता आणि १०० म्हणजे संपूर्ण आर्थिक विषमता. मात्र भारतात मजुरी, मालमत्ता, शैक्षणिक संपन्नता, शहर-ग्राम संधी आणि औपचारिक रोजगाराची उपलब्धता यांमध्ये मोठी तफावत कायम आहे. जागतिक अहवाल असेही नोंदवतो की, श्रमबाजारात संधींची विषमता निर्णायक आहे. जवळपास ४० टक्के वेतन-उत्पन्न विषमता ही शैक्षणिक गुणवत्ता, कामाचे ठिकाण यांसारख्या व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितींशी संबंधित आहे. त्यामुळे गरिबीतील घट झपाट्याने होत असली तरीही आर्थिक आणि संधींची विषमता हे आव्हान कायम राहते.
एवढ्याने समाधान मानावे का?
पुढील टप्प्यातील दारिद्र्य-निर्मूलनाची आव्हाने यापूर्वीच्या टप्प्यापेक्षा अधिक जटिल असतील. अनुसूचित जाती-जमाती, अनौपचारिक क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित श्रमिक आणि कमी विकसित राज्यांतील लोक यांकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल. त्यासाठी वेगवान आर्थिक वाढीपेक्षा प्रभावी हस्तक्षेप आवश्यक आहेत.
दुसरे, रोजगाराच्या वाढीप्रमाणे रोजगाराची गुणवत्ताही महत्त्वाची आहे. भारतातील बहुसंख्य कामगार अनौपचारिक, कमी-उत्पादक आणि असुरक्षित क्षेत्रांत कार्यरत आहेत. कमी परतावा असलेल्या शेती आणि अनौपचारिक कामातून कामगारांना अधिक चांगले वेतन देणार्या संधी उपलब्ध करून दिल्यास दारिद्र्य लक्षणीयरीत्या (सरकारी लाभांविना) कमी होऊ शकते. याचा अर्थ कौशल्य-विकास, शहरी रोजगार, उत्पादन व सेवा क्षेत्रे, सामाजिक सुरक्षा आणि महिलांचा श्रमबाजारातील सहभाग यांवर अधिक सार्वजनिक गुंतवणूक करणे इष्ट ठरेल.
तिसरे, हवामान व पर्यावरणीय धोके आजवर मिळवलेली प्रगती धोक्यात आणू शकतात. उष्णतेचा ताण, पाण्याची कमतरता, पीक-अस्थिरता आणि अतिवृष्टी किंवा दुष्काळ यांचा परिणाम ग्रामीण भागात तीव्रतेने जाणवतो. त्यामुळे या समस्यांना प्रभावीपणे तोंड देऊन शाश्वत कृषी विकास घडवणे आणि अनुकूलनक्षम सामाजिक सुरक्षा यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.
माहितीची विश्वासार्हता आणि धोरणातील सातत्य अत्यंत महत्त्वाचे आहे. भविष्यात दारिद्र्याचे प्रभावी मोजमाप करून त्यात घट घडवून आणण्यासाठी पारदर्शक विदा, वितरण-आधारित माहितीची उपलब्धता आणि पोषण, आरोग्य, शिक्षण, निवारा व रोजगार-गुणवत्ता यांचा समावेश असलेले बहुआयामी निर्देशक आवश्यक आहेत.
सातत्यपूर्ण आर्थिक वाढ, कल्याणकारी योजना आणि वाढत्या रोजगारसंधींद्वारे दारिद्र्यनिर्मूलन वेगाने घडवता येते हे भारताने दाखवून दिले आहे. परंतु जागतिक बँकेचा हा अहवाल असेही स्पष्ट करतो की, पुढील काळातील आव्हान केवळ दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या कमी करणे असणार नाही तर आर्थिकदृष्ट्या असुरक्षित असलेल्यांसाठी सुरक्षित, उत्पादक आणि सर्वसमावेशक रोजगार निर्माण व्हावेत हे सुनिश्चित करण्याचे आव्हान मोठे आहे.
(लेखिका या झेवियर्स कॉलेज, मुंबई येथे अर्थशास्त्राच्या सहायक प्राध्यापक)
aparna.kulkarni@xaviers.edu
