नुकत्याच झालेल्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त (२३ एप्रिल) वाचनाच्या विविध अंगांबद्दल, पैलूंबद्दल लिहिण्याचा फायदा म्हणजे आपण जो नाद करत आहोत त्याचा मागोवा घेता येतो. त्यात आवडलेल्या पुस्तकांबद्दल बोलता येते. एवढे काय काय वाचून आपल्या हाताला खरेच नेमके काही लागले का? आजही अवांतर असे फारसे न वाचलेल्या आणि लौकिक अर्थाने यशस्वी ठरलेल्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यात नेमका काय फरक आहे याच्या उत्तराभोवती धुके पसरलेले आहे. घरी जी माणसे पहिल्यांदाच येतात ती ग्रंथसंग्रह पाहून नेहमीचा प्रश्न विचारतात, ‘ही सारी पुस्तके तुम्ही वाचली आहेत का?’ मी माणूस पाहून उत्तर देतो, ज्याला सब नॉर्मल भाषेत माणूस पाहून पुडी बांधणे म्हणतात. मी समजा ‘नाही’ असे म्हटले तर त्यांच्या मनात ‘मग एवढी पुस्तके जमवली कशाला,’ हा प्रश्न निर्माण होतो, जो ते विचारत नाहीत आणि मी ‘वाचली आहेत’ असे म्हटले तरीही ते काही माझी परीक्षा घेत नाहीत. त्यांनी फक्त त्यांची आश्चर्याची भावना व्यक्त केलेली असते. त्यामुळे माझे उत्तर महत्त्वाचे नसते.
माझ्या विद्यार्थिदशेत ॲप्टिट्युड टेस्ट वगैरे भानगडी नसत. तरीही वडील काही अपेक्षेने अशी टेस्ट करणार्या व्यक्तीकडे मला घेऊन गेले. परीक्षा घेणारी व्यक्ती आणि मी दोघेही गोंधळात पडलो होतो. त्यावेळचा त्या व्यक्तीच्या चेहर्यावरचा गोंधळ, प्रथमदर्शनी एकमेकाशी संबंध नसलेल्या विषयावरील पुस्तके माझ्या संग्रहात पाहणार्या माणसाच्या चेहर्यावर आजही मला वाचता येतो.
काही दिवसांपूर्वीच माझा ग्रंथसंग्रह कुतूहलाने न्याहाळत असलेल्या एका पंचविशीतील तरुणाचे लक्ष ‘स्ट्रेस टेस्ट’ या बराक ओबामा यांच्या कारकीर्दीतील सब प्राइम घोटाळ्यावरील पुस्तकाकडे गेले. तो म्हणाला, ‘‘किती जुने विषय आहेत सगळे!’’ खरेतर केवळ १६ वर्षांपूर्वीची ही घटना आहे. वाचणार्या माणसाला पाचपाचशे वर्षापूर्वीच्या घटना जवळच्या वाटतात. अनंत काळाला एका मुठीत आणण्याचा यशस्वी प्रयत्न करणे हे पुस्तकांना बरोबर जमते. आपल्याला काय जमते? हा प्रश्न तहहयात माझ्या मनात आहे. त्याचे उत्तर पुस्तकातून शोधता शोधता आपल्याला वाचणे जमते या निष्कर्षावर मी काही वर्षापूर्वी आलो. तरीही काय वाचणे जमते? हा पुढचा प्रश्न जास्त टोकदार आहे. ‘चाय चाय: ट्रॅव्हल्स इन प्लेसेस वेअर यू स्टॉप बट नेव्हर गेट ऑफ’ या पुस्तकाचा उल्लेख काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर पाहिला. त्याला किंडलवर अवतीर्ण होण्याची आज्ञा दिली.
झाशी, मुघलसराय, गुंटकल अशा गावांवर त्यात लिहिलेले आहे. ही भारतातील मोठी रेल्वे जंक्शन आहेत. ५०० पेक्षा अधिक गाड्या रोज काही क्षण तेथे थांबतात आणि पुढे जातात. त्या मानाने या स्टेशनांभोवती पसरलेली गावे छोटी आहेत. मी त्यातील काही स्टेशनवरून अनेकदा गेलेलो आहे. तिथे चहाचे घुटके घेताना या गावात रोज नेमके काय घडत असेल याचे कुतूहल माझ्या प्रवासी मनात तरळून जाते. विश्वनाथ घोष नावाच्या पत्रकाराने अशा गावांविषयी या पुस्तकामध्ये लिहिले आहे. विषयाच्या प्रेमात पडून ते पुस्तक काही अंतर मी वाचले आणि नंतर पार बाजूला सारले. लेखक तेथे पहाटे पहाटे कसा पोहचला? मग रिक्षावाला त्याला काय म्हणाला? घासाघीस, हॉटेलचे दर, माणसे काय खात होती असल्या मजकुराने ते पुस्तक भरले होते. तीनचार दिवस एखाद्या गावात राहून आपल्याला त्याचा आत्मा समजणे कसे शक्य आहे? पण त्याच्या बर्याच प्रती विकल्या गेल्याचे कळले.
टॉलस्टॉयच्या ‘कोसॅक्स’ या कादंबरीची सुरुवात हिवाळ्यातल्या एका पहाटे मास्कोमध्ये टांगा शिरतो या प्रसंगाने होते. रस्त्यावरचे दिवे मालवले आहेत आणि घरातील दिवे अजून पेटायचे आहेत. नंतर पुढच्या परिच्छेदात कुठेकुठे लागलेल्या मिणमिणत्या दिव्यांच्या धडपडीत उजळू पाहणार्या, गोठलेल्या निद्रिस्त मास्कोचे त्याने केलेले वर्णन डेव्हिड लीनच्या सिनेमॅटिक कौशल्याला मात देणारे आहे. चला, आपण टॉलस्टॉय अगदी आऊट ऑफ द सिलॅबस म्हणून सोडून देऊ. कशाला अप्राप्य देणगी मागे पामराने धावावे? पण आपल्याला रस्किन बाँडच्या ‘द नाइट ट्रेन ॲट देओली’ किंवा ‘टाइम स्टॉप्स ॲट शामली’ या कथा आठवतात. पत्रकाराची भाषा साहित्यिकाइतकी वेधक असण्याची अपेक्षा नाही. पण पुस्तक वर्तमानपत्रीय भाषेत लिहून कसे चालेल? तुम्ही त्या शहरात मनाने गुंतला आहात का फक्त कोरडे रिपोर्टिंग करता आहात? अशोक पाटोळे एकदा म्हणाले होते की तुम्ही कितीही निकृष्ट लिहा त्याला चांगले म्हणणारे लोक असतातच. मला मात्र घोष महाशयांची इतकी सुंदर कल्पना अशी वाया गेली याचा खेद वाटला. संकेतस्थळावर या पुस्तकाबद्दल वाचकांनी चांगले शेरे दिले आहेत कारण वाचकांना याच भाषेची सवय आहे. वृत्तपत्र सोडून ते काही वाचत नसावेत हे स्पष्ट आहे.
समाजमाध्यमांची भाषा हा आणखी उबग आणणारा विषय आहे. त्यांच्या उथळ पुरात पोहण्यापेक्षा बुडून मरणे श्रेयस्कर या मतावर मी आलो आहे. आजकाल आम्हाला कुठेच थांबायचे नाही. पहायचे नाही. वाचायचे नाही. केवळ जमेल ते जमेल तसे पाहून जमेल ते लिहायचे आहे. असे जमेल ते लिहिलेले वाचणे जमणे अवघड आहे. सेंट क्झुपेरिच्या शब्दात म्हणायचे झाले तर सारखे यांना कुठेतरी जायचे असते आणि पोहचायचे मात्र कोठेच नसते.
एखाद्या गावाचा बौद्धिक आणि भावनिक स्तर जोखायचा असेल तर तेथल्या पुस्तक आदानप्रदान सोहळ्याला जावे. तेथे पसरलेली धार्मिक, सेल्फ हेल्पची पुस्तके, घरगुती औषधोपचार आणि रेसिपी यांची पुस्तके, प्राधान्याने असलेली कुठल्याही विविक्षित संघटनेच्या विचारधारेवरील प्रचारकी पुस्तके पाहून आपण कोणा बरोबर जगत आहोत याचा अंदाज येतो. या सोहळ्यात तेथल्या सर्वसाधारण समाजाचे प्रतिबिंब पडलेले असते. लक्षात असे येते की लेखकच नाही तर वाचकाची देखील आपल्या वाचनाची सीमारेषा ओलांडण्याची मानसिकता नसते. मुंबई मराठी माणसाची आहे की नाही यावरून जोरदार प्रसिद्धिलोलूप खडाजंगी दर काही काळाने घडते. पण ‘द मॅक्झिमम सिटी, बॉम्बे लॉस्ट ॲण्ड फाऊंड’ हे पुस्तक लिहिणारा पत्रकार गुजराथी आहे याकडे कसे दुर्लक्ष करता येईल? १९९३ आणि २००८ चे मुंबईवरील दहशतवादी हल्ले मोठे होते. पण कुठल्याच मराठी पत्रकाराला या विषयांचा सर्वांगाने सविस्तर वेध घेणारे पुस्तक लिहावेसे वाटले नाही. छोट्या छोट्या घटना होत असतात त्यावर काय लिहायचे असे वाटणे शक्य आहे.
पुस्तक आदानप्रदान सोहळ्याच्या मर्यादा या त्या परिसराच्याच मर्यादा असतात. समाजातील ज्या घटकाने विचारपूर्वक कृती केली पाहिजे अशा अभिजनांचा हा सोहळा असायला हवा. तिथे जाणे कितीही निराशाजनक वाटले तरी एखादी फेरी तेथे मारण्याचा मोह मला होतो. कधी कधी काही महत्त्वाचे हाती लागतेही. एकदा तेथे हाती आलेल्या पुस्तकात अमेरिकास्थित भारतीय तंत्रज्ञाने जगातील पुलांच्या कहाण्या सांगितल्या होत्या. नुकतेच ‘इस्रायल छळाकडून बळाकडे’ हे पुस्तक अशा सोहळ्यात ठेवलेले मला दिसले. १९६६ साली प्रकाशित झालेले हे पुस्तक नंतर अनेकदा छापले गेले आहे. माझ्याकडे गेली अनेक वर्षे ते आहे. त्याचे लेखक ना. ह. पालकरांना त्यांच्या संघटनेच्या दृष्टिकोनाच्या मर्यादा असल्या तरीही ते उत्तम पुस्तक आहे. एकदा बळ मिळाले की काय होते हे आज आपण अनुभवत आहोत. ६० वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले. संदर्भ किती बदलून गेले आहेत! पण पालकरांचा भाबडा आशावाद दर्शविणारे त्या पुस्तकातील शेवटचे वाक्य महत्त्वाचे आहे, जे कधीच जुने होऊ नये. त्यांनी लिहिले होते ‘‘ जगातील सार्या पददलितांना आणि दु:खितांना आधार देण्यासाठी भारताने प्रबळ होऊन उठावे, हीच तर आजच्या काळाची एकमेव अपेक्षा आहे.’’ ते पुस्तक मी उचलले आणि ते वाक्य त्यात अजून आहे की नाही हे पाहून घेतले.
