भारताचा अत्यंत यशस्वी आणि आक्रमक कर्णधार म्हणून गौरवला गेलेला सौरव गांगुली याने दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाविषयी केलेले भाष्य विचार करायला लावणारे आहे. म्हणजे त्याने फार खोलात जाऊन काही विधान वगैरे केलेले नाही. तर, या मुद्दय़ावर जुजबी माहिती करून घ्यायची गरज त्याला वाटत नाही हा मुद्दा आहे. ‘जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाविषयी मला थोडीफार माहिती आहे, तीदेखील वृत्तपत्रांमुळे. कुस्तीपटूंना त्यांची लढाई लढू द्यावी. क्रीडा क्षेत्रात एक बाब माझ्या ध्यानात आली. ती म्हणजे, माहिती असल्याशिवाय कोणत्याही विषयावर बोलू नये.’ काहींना हे उद्गार व्यावहारिक शहाणपणाचे वाटतील. परंतु एखाद्या वादग्रस्त विषयाच्या बाबतीत व्यावहारिक शहाणपणा म्हणजे वैचारिक पळवाटीचे दुसरे नाव. सर्वसामान्यांसाठी ते ठीक. सौरव गांगुली हे काही सर्वसामान्य नाव नव्हे. किंबहुना, नवीन सहस्रकाच्या सुरुवातीस भारतीय क्रिकेटला नवा आकार आणि रंग देणारा असा त्याचा लौकिक. क्रिकेटमधील गोऱ्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी, त्यांच्या मैदानांवर क्रिकेट सामने जिंकून देण्याबरोबरच प्रसंगी त्यांच्याच भाषेत ‘अरेला कारे’ करणारा म्हणूनही तो सुपरिचित. वयपरत्वे त्याचा आक्रमकपणा कमी झाला असावा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) प्रमुख म्हणून, मध्यंतरी आपल्याकडील क्रिकेटला नवी दिशा देण्याविषयी त्याच्याकडून अपेक्षा होती. ती अजिबातच पूर्ण होऊ शकली नाही आणि अनेक मुद्दय़ांवर खरोखरच भूमिका घेण्याची वेळ आली, त्या वेळी देशाप्रमाणेच बीसीसीआयमध्येही विराजमान झालेल्या नवसत्ताधीशांसमोर मान तुकवून सौरव बाबूमोशाय अध्यक्षपदावरून मुकाट पायउतार झाले! कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबतीत सौरवची कृत्रिम अनभिज्ञता, बीसीसीआयमधून बाहेर पडताना त्याच्या व्यक्तिमत्त्वात भिनलेल्या सत्ताधीशभीरू वृत्तीचाच विस्तार ठरतो.
जो विषय गेले आठवडाभर सुरू आहे, ज्याविषयी सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांतून दररोज काही ना काही प्रसृत होते आहे, त्याविषयी काहीही ठाऊक नसणे याचा अर्थ, माहिती करून घेण्याची इच्छा वा पर्वा नसणे हाच असतो. पण सत्ताधीशभीरुत्वाची ही नवी संस्कृती देशातील बहुतांश कलाकार, लेखक, विचारवंतांप्रमाणेच क्रीडापटूंमध्येही भिनू लागली असावी काय, अशी शंका येते. कुस्तीपटूंनी कुस्तीगीर संघटनेचे सध्या पदच्युत करण्यात आलेले अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांची आणि आरोप करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे आणि या आरोपांचे स्वरूप गंभीर आहे. ज्यांच्याकडून आरोप केले जात आहेत, त्यामध्ये ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल आणि जागतिक स्पर्धामधील पदकविजेत्या व विजेते कुस्तीपटू आहेत. या कुस्तीपटूंनी खऱ्या अर्थाने व्यवस्थेविरुद्ध बंड केले आहे. त्यांच्या आरोपांसंदर्भात न्यायालयाने कायदेपालनाची आठवण करून दिल्यानंतर आता कुठे पोलीस तक्रार वगैरे सोपस्कार सुरू झाले आहेत. खरे तर ही लढाई केवळ कुस्तीपटूंची नाही. आज कुस्तीपटूंवर अशी वेळ आली, उद्या इतर खेळांमध्येही असेच काही होऊ शकेल किंवा घडतही असेल. त्या प्रत्येक वेळी ‘त्यांची लढाई त्यांनी लढावी’ अशी भूमिका सगळय़ांनीच घेतली, तर उद्या कदाचित पीडनाविषयी आरोप करण्यासही कोणी धजावणार नाही.
आजतागायत नीरज चोप्रा, अभिनव बिंद्रा, वीरेंदर सेहवाग, कपिलदेव अशा मोजक्यांनीच या विषयावर मतप्रदर्शन केले. बाकीचे गप्पच आहेत. आज भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी असलेल्या पी. टी. उषा यांना तर अशा प्रकारची आंदोलने देशाची प्रतिमा डागाळणारी वाटतात. या प्रकरणाच्या देखरेख समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या जिगरबाज बॉक्सर एम. सी. मेरी कोम यांना तर समितीला नेमके काय म्हणायचे हेही सांगावेसे वाटत नाही. या मंडळींना नेमकी कशाची भीती वाटते? त्यांना स्वत:च्या प्रभावाविषयी खात्री वाटत नाही का? भारतरत्न, खेलरत्न विजेत्यांपैकी कोणालाही या मुद्दय़ावर एखादे सबुरीचे वक्तव्य करण्याचीही गरज का वाटू नये? सत्तारूढ भाजपचे सरसकट सगळे नेते सध्या कर्नाटकात प्रचारात गुंतलेले आहेत. त्यांच्यासाठी कर्नाटकविजय हे एकमेव लक्ष्य दिसते. त्यामुळे जंतरमंतरवर आठवडाभर कुस्तीपटूंंचेआंदोलन सुरू राहिले काय किंवा राजौरीत दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले काय, प्रचारात खंड पडता कामा नये! जंतरमंतरवर काँग्रेस सरकारविरोधी आंदोलने झाली, त्या वेळी भाजपची मंडळी लवाजम्यासह हजेरी लावायची. आज भाजपचाच खासदार या प्रकरणात गुंतलेला असल्यामुळे, त्यांना जंतरमंतरवर जाण्याचा आदेश नसावा आणि काँग्रेसमध्ये आंदोलकांना पाठिंबा देण्याइतपत जीवच शिल्लक राहिला नसावा. कुस्तीपटूंना राजकारण्यांच्या उदासीनतेविषयी इतका विषाद वाटणार नाही. पण क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या बंधुभगिनींची उदासीनता त्यांच्यासाठी सर्वाधिक क्लेशकारक ठरते.