‘लाइफ ऑफ पाय’ या कादंबरीवर आधारित चित्रपट आणि त्यानंतर कादंबरीची भारतातील मागणी अद्यापही थांबलेली नाही. सुरुवातीच्या तीन पुस्तकांना थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आयुष्यात काहीच नीट होत नसलेला हा कॅनडातील लेखक नव्वदीच्या दशकात भारतात भटकंतीसाठी आला. माथेरानमधील अल्प-निवासात ‘लाइफ ऑफ पाय’चे कथानक त्याला सुचले आणि पुढे त्या पुस्तकाने यान मार्टेलचे नाव जगप्रसिद्ध केले. पण आधीच्या पुस्तकांप्रमाणेच नंतरच्या पुस्तकांनाही ‘लाइफ ऑफ पाय’इतकी ओळख मिळाली नाही. आता या आठवड्यात (३१ मार्च) त्याचे आठवे पुस्तक – ‘सन ऑफ नोबडी’ येत आहे. इतिहास-वर्तमान यांच्या सांध्यावर चालणार्‍या त्याच्या कथानकाबाबत बरेच कुतूहल आहे. नव्या पुस्तकाच्या निमित्ताने ‘लिटररी हब’ने त्याला गोष्ट सांगण्याच्या लकबीबद्दल, घाट-शैलीबद्दल लिहिण्यास प्रवृत्त केले आहे. या आठवड्यात दाखल होणार्‍या ताज्या पुस्तकात काय आहे, हेदेखील यानिमित्ताने या दुव्यावर वाचता येईल.

भुत्तोंचा श्वान…

फातिमा भुत्तो यांचे साडेचारशे पानी आत्मवृत्त २०१० साली खळबळ माजवत पार पाकिस्तानी सीमा भेदून भारतातही लोकप्रिय झाले. भुत्तो कुटुंबातील कलह, वडिलांची पोलीस चकमकीत करण्यात आलेली हत्या या तपशिलांसह त्यांतील बेनझीर भुत्तो, आसिफ अली झरदारी यांच्याबाबतचे खळबळजनक आरोप पुस्तकात ठासून भरलेले असल्यामुळे खुुपविक्या लेखिकांच्या पंगतीत फातिमा भुत्तो समाविष्ट झाल्या. पुढे कादंबर्‍या लिहिल्या, भारतीय चित्रपटांपासून ते कोरियन पॉप बॅण्डवर अकथनात्मक लेखनाचे पुस्तक आले. मधल्या काळात ब्रिटिश वृत्तपत्रांत त्यांचे लेखन झळकले. सध्या त्यांचे नवे आत्मकथन ‘द अवर ऑफ द वूल्फ’ बाजारात दाखल झाले आहे. त्याचा बहुतांश भाग हा ‘कोको’ नावाच्या कुत्र्याने व्यापलेला आहे. भेट देण्यासाठी आणलेला हा कुत्रा त्यांनी स्वत:साठीच ठेवून घेतला. वाईट प्रसंगात या कुत्र्याने दिलेला आधार पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. या तपशिलांनी दुथडी भरलेले दोन लेख येथे वाचता येतील.