‘महागाई वाढली असेल तर थोडे कष्ट करून उत्पन्न वाढवा, अजून किती काळ मोदीजींना दोष देत बसाल’ या वक्तव्याला देशभर प्रसिद्धी मिळाल्याने रामदेवबाबा भलतेच खुशीत होते. आता नक्कीच दिल्लीहून विश्वगुरूंचा फोन येईल व आभार मानतील असे स्वप्न रंगवत ते दुपारच्या आरामासाठी कक्षात गेले. दोनेक तासांनी अचानक गलका ऐकू आल्याने त्यांची झोपमोड झाली. बाहेर येऊन बघतात तर आश्रमाच्या प्रवेशद्वारावर हजारो लोक जमलेले. त्यांची रीतसर नोंदणी करून आत घेताना सुरक्षारक्षकांची धावपळ उडालेली. नियमित योगसाधनेसाठी एवढी गर्दी? आपली लोकप्रियता पुन्हा वाढली की काय? येऊ देत लोक. या सार्यांना महागाईसाठी मोदी कसे जबाबदार नाहीत यावर प्रवचन देता येईल असा विचार करत ते आत गेले.
थोड्याच वेळात सेवक आत आला. आलेल्या लोकांना आधी तुमच्याशी बोलायचे आहे. त्याशिवाय जागचे हलणार नाही असे ते म्हणताहेत. हा तर आश्रमाच्या शिस्तीचा भंग असे म्हणत उठून ते बाहेर आले, त्यासरशी गलका थांबला. मग गर्दीतला एक पुढे होत म्हणाला. ‘योगीजी, आम्ही सर्व महागाईने त्रस्त झालेले लोक. तुमच्या वक्तव्यामुळे आम्हाला आशेचा किरण दिसला. कष्ट करून उत्पन्न वाढवण्याची आमची तयारी आहे. मात्र बाहेर काम मिळत नसल्याने आम्हाला इथेच ते द्या. काम मिळाल्यावर आणखी जोरात मोदींचा जयजयकार करू.’ हे ऐकून बाबा धास्तावले. स्वत:चाच आश्रम असल्याने दिल्लीसारखे इथून पळताही येणार नाही याची जाणीव त्यांना झाली. मग लगेच त्यांनी कंपनीच्या कर्मचार्यांना बोलावून या सर्वांना उत्पादने विक्रीसाठी द्या असा आदेश दिला. जमावातले सुमारे हजारेक लोक ती घेऊन विक्रीसाठी आजूबाजूच्या परिसरात रवाना झाले. तरीही बरेच लोक उरलेले. यांना काय काम द्यायचे असे कर्मचार्यांनी विचारताच बाबा म्हणाले. ‘उरलेल्यांनी आश्रमाच्या वनौषधीच्या शेतांमध्ये जावे. तिथे उत्पादनासाठी लागणारी पाने, फुले, फळे गोळा करावीत.’ मग क्षणात गर्दी पांगली. एका झटक्यात इतक्या लोकांना कष्ट करण्याची संधी दिली म्हणून विश्वगुरू आणखी खूश होतील या विचारानेच बाबा आनंदले.
थोड्याच वेळात कंपनीचा विक्री व्यवस्थापक धावतच आला. गावोगाव फिरणारे हे नवे विक्री प्रतिनिधी बघून अधिकृत एजन्सीधारक संतापले असून ते धडाधड करार रद्द करताहेत. हा विश्वासघात आहे. आता आमच्या स्टोअरमध्ये कोण येणार असा प्रश्न विचारताहेत. हे ऐकून बाबा काळजीत पडले. तेवढ्यात वनौषधींच्या शेतात काम करणारे जुने कर्मचारी बाबांकडे आले. हे नवे लोक औषधांच्या झाडांना नुसते ओरबडून काढताहेत. तिथे इतकी गर्दी झाली आहे की कोण काय करत आहे, तेच कळत नाही. कुणाच्या हातात अर्धे फूल तर कुणाच्या हाती अर्धे पान. फळांचा पार चुराडा झालाय. यामुळे अस्वस्थ होऊन त्यांनी हुकूम सोडला. सर्वांना उद्या सकाळच्या योगसाधनेत यायला सांगा.
पहाटे पाचला ते मंडपात आले तेव्हा तो गर्दीने फुलून गेला होता. ती गर्दी बघून भारावलेल्या आश्रमाच्या चॅनलवाल्यांनी दहा कॅमेरे अधिकचे लावले. शांतता पसरल्यावर बाबा म्हणाले. ‘कष्ट करण्याची एक पद्धत आहे. तुम्हाला ती जमली नाही. आता तुम्ही आपापल्या घरी जा. तिथेच आमचे एजन्सीवाले तुम्हाला काम देतील. आलेच आहात तर मी सांगतो तसा योग करा.’ हे ऐकून काही लोक उभे राहिले. ‘योग करताना शरीराला ताण देणे म्हणजे कष्ट करणे. याचेही पैसे आम्हाला लागतील.’ हे ऐकताच बाबा जाम चिडले. ‘मी महागाईवरचे विधान मागे घेतो. तुम्हाला जे करायचे ते करा पण इथून जा’ असे सांगत त्यांनी मंडप सोडला.
