योगेन्द्र यादव

धर्म या संकल्पनेची आपल्याकडे सातत्याने चर्चा होत आहे. पण ‘स्वधर्म’ ही संकल्पना आपल्याला त्या पलीकडे घेऊन जाते आणि एक व्यापक अशी दृष्टी देते. ‘भारत जोडो यात्रा’ या स्वधर्म संकल्पनेच्या स्पष्टतेसाठी आहे, असे मला वाटते.. 

Gujarat Freedom of Religion Act
हिंदू अन् बौद्ध धर्म वेगळा, आता धर्मांतरासाठी परवानगी घ्यावी लागणार; गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा काय सांगतो?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

‘भारत जोडो यात्रा’ सुरू झाल्यावर पुन्हा पुन्हा विचारला गेलेला एक प्रश्न म्हणजे ‘भारत जोडो यात्रा’ कशासाठी? या प्रश्नाला माझे एका वाक्यामधले उत्तर होते, ‘‘भारताचा स्वत:चा म्हणून एक स्वधर्म आहे. त्यावर होणारे विधम्र्याचे  घातक हल्ले रोखण्यासाठी’’. माझ्या या उत्तरामुळे भारत जोडोबद्दलची सर्वसामान्य लोकांची उत्सुकता शमली जात नाही, हे तर उघडच आहे, कारण या उत्तरामुळे आणखीच प्रश्न निर्माण होतात.

भारताचा स्वधर्म म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या किंवा जातीच्या स्वधर्माबद्दल ऐकले आहे. पण देशालाही स्वधर्म असू शकतो का? स्वधर्म हा शब्द ऐकल्यावर काही लोकांना असे वाटायला लागते की ही चर्चा एखाद्या राष्ट्राच्या धर्माच्या दिशेने जाते आहे की काय. राष्ट्रांचे म्हणून धर्म असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. उदाहरणार्थ काही देशांमध्ये इस्लाम तसेच ख्रिश्चन या धर्माना त्या त्या देशाचे धर्म म्हणून अधिकृत मान्यता आहे. त्याच धर्तीवर भारतात काही लोक हिंदू हा भारताचा धर्म आणि भारत हे हिदू राष्ट्र हा विचार पुढे आणू बघत आहेत. भारताचा स्वधर्म ही कल्पना या दिशेने तर चाललेली नाही ना? समजा तसे असेल, तरीही भारताचा स्वधर्म कुठे शोधायचा? त्याची व्याख्या कोण करणार?  त्यासाठी चला, आपण भगवत्गीतेपासूनच सुरुवात करू या. धर्मसंकल्पना गीतेपासून सुरू होते म्हणून भगवत्गीतेपासून सुरुवात करायची असे माझे म्हणणे नाही, तर भगवत्गीता ही वैदिक आणि बौद्ध धर्मापुढे असलेल्या आव्हानांचा मेळ साधून आपल्या संस्कृतीतील काही मूलभूत मूल्यांचा परिचय करून देते, म्हणून तिथून सुरुवात करायची.

गीतेमधला एक श्लोक प्रसिद्ध आहे. ‘श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात्। स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:।।’ (भगवद्गीता ३.३५) म्हणजे, दुसऱ्याच्या धर्मात  सद्गुण असतील, आणि आपल्या धर्मात भलेही ते नसतील, पण तरीही दुसऱ्याच्या धर्मापेक्षा आपला स्वत:चा धर्मच श्रेष्ठ असतो. दुसऱ्याचा धर्म भय देणारा असतो. त्यामुळे त्या धर्मात जाऊन मरण्यापेक्षा स्वत:च्या धर्मात मरणे हिताचे आहे. साहजिकच इथे धर्माचा अर्थ रिलिजन असा नाही. इथे धर्म हा शब्द हिंदू, मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्म अशा अर्थाने वापरलेला नाही. कारण ते सगळे पंथ आहेत. येथे धर्म या शब्दाचा अर्थ जो धारण करण्यायोग्य आहे, नैतिक आहे, तो धर्म असा आहे.

धर्म या संकल्पनेची चर्चा करताना हे स्पष्ट करणेदेखील आवश्यक आहे की धर्माची ही व्याख्या उच्चवर्णीय असण्याची गरज नाही. भगवद्गीतेत स्वधर्म या शब्दाचा वापर चातुर्वण्र्यातील जातीयवादाला बळकटी देण्यासाठी केला आहे ही वस्तुस्थिती आहे, पण धर्म या संकल्पनेची अभिजन आणि जन अशा दोन्ही परंपरेतील वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या सुरुवातीपासूनच केल्या गेल्या आहेत आणि त्या वापरात आणल्या जात आहेत. अभिजन परंपरेने धर्म ही संकल्पना एका विशिष्ट जातीशी, समुदायाशी किंवा परिस्थितीशी जोडली. परंतु येथील लोकपरंपरेने धर्म ही संकल्पना एक सामान्य नैतिक आदर्श म्हणून प्रस्थापित केली. ज्ञानेश्वरांनी कुणा एका भूमीचा स्वधर्म न सांगता जो ‘विश्वस्वधर्म’ ओळखला,तो साऱ्या प्राणिजाताच्या कल्याणाचा विचार मांडणारा होता. त्याहीआधी, अशोकाच्या शिलालेखात उल्लेख आहे तो ‘धम्म’देखील या लोकपरंपरेतून आला आहे. भारताचा स्वधर्म ही संकल्पना आपल्या संस्कृतीच्या या उदात्त प्रवाहाशी जोडली गेली पाहिजे.

स्वधर्म या संकल्पनेमध्ये दोन तत्त्वांचा मिलाफ आहे. त्यातील एक तत्व म्हणजे स्व आणि दुसरे तत्व धर्म. स्वार्थामध्ये स्व असतो पण धर्म नसतो. दुसरीकडे, सर्व धर्मामध्ये धर्म आहे, परंतु स्व नसतो. स्वधर्माचा एक घटक तो धारण करणाऱ्याकडे बोट दाखवतो आणि दुसरा घटक योग्य दिशा दाखवतो. स्वधर्म म्हणजे केवळ स्वभाव नाही, सामान्य प्रवृत्ती नाही, बहुसंख्य लोकांचा कल नाही. स्वभाव चांगला असू शकतो तसाच तो वाईटदेखील असू शकतो. सामान्य प्रवृत्ती अनेकदा ऱ्हासाकडे नेणारी असू असते. बहुसंख्यांचा कल जाचक आणि अन्यायकारक असू शकतो. पण स्वधर्म कधीही अनुचित असू शकत नाही. तसेच स्वधर्म हे शाश्वत नैतिक मूल्य नसते, कारण काही शाश्वत मूल्ये स्वशी संबंधित नसू शकतात.

स्वधर्माची संकल्पना समजून घेण्यासाठी परधर्म, अधर्म आणि विधर्म (पाखंड) यांचा अर्थही समजून घ्यावा लागेल. अधर्म या शब्दाचा अर्थ समजणे अवघड नाही. अधर्म म्हणजे जो धर्माला अनुरूप नाही तो. धर्म सद्गुणांची निर्मिती करत असेल, तर धर्मापासून दूर जाणे किंवा अध:पतन यातून निर्माण होणाऱ्या कुप्रथांच्या मुळाशी अधर्म असतो. अनेकदा अधर्मातून दांभिकता निर्माण होते. अधर्म हा धर्माबाबत प्रश्न उपस्थित करत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणताना तो धर्माचा आदर करतो पण व्यवहारात मात्र धर्माकडे दुर्लक्ष करतो. ही सगळय़ाच  मानवी समाजांमध्ये आढळणारी सर्वसामान्य प्रवृत्ती आहे. सकाळी मंदिरात जाऊन देवदर्शन घ्यायचे, दिवसभर कृष्णकृत्ये करायची किंवा बोलताना अहिंसेचा उदोउदो करायचा आणि प्रत्यक्षात मात्र हिंसेचा अवलंब करायचा ही त्याची उदाहरणे आहेत.

अशा अधार्मिकतेकडे दुर्लक्ष करणे आणि ती नाकारणे हे आपले कर्तव्य आहे. परधर्म याहून पूर्ण वेगळा आहे. परधर्म म्हणजे दुसऱ्याचा धर्म. तो स्वीकारण्यायोग्य असू शकतो, परंतु माझा काळ, माझे ठिकाण, माझी परिस्थिती यांना योग्य असत नाही. त्या धर्मात भलेही सद्गुण असतील, तो भलेही आकर्षक असेल, तो भलेही मोहित करणारा असेल, पण तो आपल्याला आपल्या पथापासून विचलित करणारा असू शकतो आणि म्हणून तो भयावह असतो. अनेकदा दुसऱ्याच्या स्वधर्माचे अनुकरण किंवा गुलामी करण्यातून परधर्माबद्दल आकर्षण निर्माण होते. दुसऱ्याने बनवलेल्या मार्गावर चालण्याचे आश्वासन आणि सुरक्षिततेची खोटी भावना आपल्याला परधर्माकडे खेचते. आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चिमात्य भाषेचे, पेहरावाचे, खाद्यपदार्थाचे अनुकरण करण्याची किंवा आपल्या बुद्धिजीवी लोकांमध्ये युरोपच्या कल्पना व वचनांचे आंधळेपणे अनुकरण करण्याची प्रवृत्ती ही परधर्माच्या आकर्षणाचे उदाहरण आहे. भगवत्गीता आपल्याला सावध करते की परधर्माचा आदर करा, पण तो करताना त्याच्या मोहापासून सावध राहा.

अधर्म किंवा परधर्मापेक्षा विधर्माचा  म्हणजे पाखंडाचा धोका वेगळा आहे. धर्माला विरोध करणारा म्हणजे पाखंडी. पाखंडी हा फक्त धर्माशी विसंगत असतो, एवढेच नाही तर तो धर्माच्या विरोधात जाऊन त्याचे खंडन करण्याचे काम करतो. हे सर्वात धोकादायक आहे कारण पाखंडी स्वधर्माला धर्म मानत नाहीतच, वर सतत तो मोडण्याचा प्रयत्न करतो. वैदिक धर्माचा एके काळी जैन आणि बौद्ध धार्मिक परंपरांशी संघर्ष झाला तेव्हा त्याच्या दृष्टीने तो पाखंडींचा हल्ला होता. पाखंडाला विरोध करणे अपरिहार्य होते.

धर्माची व्याख्या करताना विनोबा भावे म्हणाले होते, ‘स्वधर्मावर प्रेम, इतर धर्माचा आदर आणि पाखंडाला नकार हे सगळे मिळून जे तयार होते ते म्हणजे धर्म’. त्यात सुधारणा करून असे म्हणता येईल की धर्माचे पालन म्हणजे स्वधर्माबद्दल प्रेम, परधर्माचा आदर, अधर्माची अवहेलना आणि विधर्माला विरोध.

पण कोणाही देशाला स्वत:चा धर्म असू शकतो का? आज भारतात जे काही सुरू आहे ते म्हणजे आपल्या देशाच्या स्वधर्मावरचे आक्रमण आहे असे आपण कसे म्हणू शकतो? याचे उत्तर पुढील भागात.

लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत.

yyopinion@gmail.com