पश्चिम बंगालमधील माथाभंगाची सभा आटोपून लखनौला परतलेले योगी थकले होते. बंगालमधील सभांचा ‘फिडबॅक’ सकाळी घेऊ असे ठरवत ते झोपी गेले. सकाळी आठला काल त्यांच्यासोबत असलेला साहाय्यक हजर झाला. सभांना चांगली गर्दी होती. विजय आपलाच आहे अशी स्तुती करून झाल्यावर तो हळूच म्हणाला, ‘एक चूक झाली. ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हें आझादी दूंगा’ हे वाक्य सुभाषचंद्र बोसांनी म्हटले.
तुम्ही विवेकानंदांचे नाव घेतले. यावरून जबर खिल्ली उडवली जातेय. ती महुआ मोईत्रा तुम्हाला ‘बुलडोजर बुद्धी’ म्हणाली.’ ऐकताच योगी भडकले. ‘निकलो यहाँ से, किसी दूसरे को भेजो.’ मग दुसरा साहाय्यक येताच योगी त्याला म्हणाले, ‘आपल्या राज्यातील नामवंत इतिहासकारांपैकी दोघा-तिघांना तातडीने बोलवा.’ एक तासात दोन इतिहासकार हजर झाले. झालेली गफलत सांगून योगी म्हणाले, ‘मला तातडीने नवा इतिहास लिहून हवाय.
पैसे, मनुष्यबळ काय हवे ते सांगा, पण २४ तासांत तुमच्या नव्या प्रतिपादनाने देशभर धुमाकूळ घातलाच पाहिजे.’ यावर त्यातला एक म्हणाला, ‘सुभाषबाबूंचे हे वाक्य ४ जुलै १९४४ चे. रंगूनमध्ये बोलतानाचे. ते कसे बदलणार? मुळात अशी चूक झालीच कशी?’ हे ऐकून संतापाला आवर घालत योगी म्हणाले, ‘आमच्यासाठी विवेकानंदच सब कुछ. आधी सुभाषबाबू होते पण त्यांचा पणतू नुकताच पक्षातून पळाला.
म्हणून त्यावर आम्ही फुली मारलेली.’ मग दुसरा इतिहासकार म्हणाला, ‘विवेकानंद व बोसांचा कालखंड वेगळा. त्याची कशी सांगड घालणार. उद्या आमच्या तोंडात लोक शेण घालतील.’ हे ऐकून योगींचा पारा चढला. ‘कहाँ रहते हो तुम दोनों’ गोमतीनगर असे उत्तर येताच त्यांनी साहाय्यकाला आदेश दिले. ‘या दोघांच्या घरासमोर बुलडोजर उभे ठेवा.’ त्या दोघांनाही घाम फुटला. त्यांनी हात जोडले. मग खूश होत योगी बोलू लागले, ‘चला घ्या कागद व पेन आणि मी सांगतो तसा घटनाक्रम लिहून घ्या व रात्रीपर्यंत नवा इतिहास लिहून काढा.
शिकागोतील जगप्रसिद्ध भाषणानंतर विवेकानंद भारतात परतले. तिथून येतानाच त्यांच्यात स्वातंत्र्यलढ्याची ऊर्मी जागृत झाली. येथे येताच त्यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. याची कुणकुण ब्रिटिशांना लागताच ते त्यांच्या पाळतीवर राहू लागले. हे कळताच विवेकानंदांचा हिंदूंचे सैनिक संघटन हवेच हा ध्यास आणखी पक्का झाला. ब्रिटिशांची नजर चुकवून ते रंगूनमध्ये गेले.
तिथे त्यांनी भारतीय समुदाय व मोजक्या सैनिकांसमोर हे वाक्य उच्चारले. तिथून ते जर्मनीत गेले. हिटलरला भेटले वगैरे वगैरे.’ हे ऐकल्यावर दोन्ही इतिहासकारांची बोबडीच वळली. बुलडोजरच्या धाकामुळे त्यांना बोलताही येईना. कसेबसे हो म्हणून त्यांनी तिथून सुटका करून घेतली. घरी परतले तर बुलडोजर उभेच. मग दोघेही नवा इतिहास लिहायला बसले. त्यांनी लिहिलेले बाड रात्री योगींच्या पुढ्यात होते. लगेच समाजमाध्यमावर त्यातला मजकूर झळकू लागला. सकाळपर्यंत देशभरात चर्चेचा विषय ठरला. योगी खूश. तेवढ्यात तो चूक दाखवून देणारा आधीचा साहाय्यक येऊन थेट पायाच पडला. ‘चूक झाली, नवा इतिहास ठाऊक नव्हता’ असे म्हणाला. तिकडे पश्चिम बंगालमध्ये महुआने कपाळावर हात मारून घेतला. आपण बुलडोजर बुद्धीच्या ऐवजी बुलडोजर ‘बाल’बुद्धी असेच विशेषण वापरायला हवे होते असे राहून राहून तिला वाटू लागले.
