स्वप्नांची किंमत ती साकार करणाराच जाणतो, बाकीच्यांसाठी ती केवळ दूरच्या डोंगरांसारखी असतात… हिरवीगार! मिशेल डिकास्टा यांची ‘यू एन्व्ही द कुटिन्होज’ ही कादंबरी म्हणजे या हिरव्या डोंगरावरच्या दुरून न दिसणार्‍या भेगांचं चित्रण आहे. वरवर पाहता ही केवळ एक कौटुंबिक कथा, पण परदेशात स्थायिक भारतीयांचं भीषण वास्तव ती मांडते. डिकास्टा यांची ही पहिलीच कादंबरी. नायक- जोचिम कुटिन्हो- मंगळुरूमध्ये वाढलेला… जोकिम, त्याचा दारुडा, वरचेवर घरातून गायब होणारा बाप, बापाचा मार खाणारी तरी त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणारी आई आणि लहान बहीण असं हे कुटिन्हो कुटुबं. मुंबईत जाऊन बॉलीवूड स्टार होण्याचं स्वप्न पाहणार्‍या पण दिसण्यास बेतास बात असलेल्या जोकिमला कुटुंबाला गरिबीतून आणि कर्जातून बाहेर काढण्यासाठी बाहरेनमधली नोकरी स्वीकारणं भाग पडतं.

एकीकडे राहण्या-खाण्याचे हाल, अपमान, अभावित जगणं, एकाकीपणा, मागे सुटलेलं, पण अद्याप मनात कुठे तरी जिवंत असलेलं स्टार होण्याचं स्वप्न आणि त्याच वेळी दुसरीकडे मायभूमीतल्या नातेवाईकांसमोर समृद्ध चेहरा जपण्याची गरज यातली तारेवरची कसरत ही कादंबरी मांडते.

साधारण १९८० ते २०१७ असा साधारण चार दशकांचा काळ यात मांडला आहे. मुंबईबाहेरच्यांच्या मनात असलेलं तथाकथित मायानगरीचं चित्र आणि भारतीयांच्या मनातलं परदेशातल्या जीवनाचं चित्र ही तफावत परस्परांशी थेट नातं सांगणारी भासते. अनोळखी देशात कुटुंब वाढवतानाची आव्हानं मायदेशातल्या अडथळ्यांच्या तुलनेत किती कठीण असतात याची झलक ही कादंबरी दाखवते. जगण्यासाठी आणि कुटुंबाला जगवण्यासाठी कौतुकाने परदेशी पाठवलेल्या मुलाला तो तिथे रुळल्यानंतर ‘पैसे दिले म्हणजे झालं का,’ असं ऐकवलं जातं तेव्हा त्यातून आयुष्यात काळानुरूप आणि त्या त्या काळातील गरजांनुरूप प्राधान्यक्रम कसे बदलत जातात याची प्रचीती लेखिका देते.

‘तिथल्यां’ची आव्हानं समजून घेण्यात अपयशी ठरलेले ‘इथले’ पालक आणि आपल्या प्रियजनांच्या सुखदु:खात सहभागी होऊ न शकल्याचं शल्य घेऊन जगणारे स्थलांतरित यांच्यापैकी कोण अधिक बिचारं आहे, हे ठरवण्याची जबाबदारी लेखिका वाचकांवर सोपवून मोकळी होते. ‘इथल्या’ आणि ‘तिथल्या’ भावंडांतील सुरुवातीचं प्रेम-काळजी पुढे कशी स्पर्धा, असूया, गैरसमज, हतबलता यात परिवर्तित होत जाते, याचे दाखले कथानकाच्या ओघात मिळतात. परदेशांत शेजारी-पाजारी, मित्र, सहकारीच कसे हळूहळू नातेवाईकांच्या भूमिकेत शिरत जातात आणि कधी मदतीला येतात तर कधी किती तापदायक ठरतात याची उदाहरणंही यात आहेत.

जोकिमची पत्नी एमिल्डाच्या निमित्ताने भारतात ख्रिश्चन मिशनरीच्या छत्रछायेत वाढलेल्या अनाथ मुलींचं आयुष्य, तिथल्या वातावरणाचा त्यांच्या आयुष्यावर असलेला ठसा, पक्के झालेले समज यांचीही झलक मिळते. नातेवाईक एका घरात राहणारे असोत वा जगाच्या दोन वेगवेगळ्या कोपर्‍यांत राहणारे; परस्परांना अनेक वर्षांतून कधी तरी एकदाच अल्पावधीसाठी भेटत असतील, तरीही तेवढेच हेवेदावे कसे काय बाळगू शकतात, असा प्रश्न यातील वर्णनं वाचताना पडतो.

पुस्तकात परदेशांत वाढलेल्या मुलांची द्विधा मांडली असली, तरी बाहरेनमध्ये प्रचंड संख्येने असलेल्या भारतीयांमुळे ही द्विधा काहीशी सौम्य झाल्याचं दिसतं. हिंदी, कोंकणी, कन्नड, मल्याळम बोलणार्‍यांच्या आणि भारतीय मूल्यव्यवस्थेवर विश्वास असणार्‍यांच्या सहवासामुळे या मुलांचा मायदेशातल्या संस्कृतीशी परिचय आहेच, पण लैंगिक- धार्मिक पूर्वग्रह अद्याप मागे टाकू न शकलेल्या जुन्या पिढीशी नव्या पिढीचा संघर्ष काही तिथेही टळलेला नाही.

जोकिमच्या पुतण्याच्या निमित्ताने आपल्या काकाच्या पावलावर पाऊल टाकून स्वत:ही तीच तथाकथित समृद्धी प्राप्त करण्याची मनीषा बाळगणारा, पण तिथवर पोहोचताना प्रचंड धडपडणारा, परत उठण्याचा प्रयत्न करणारा तरुणही दिसतो. एकूण तीन पिढ्यांची ही कहाणी आहे- ‘ग्रेट अरब ड्रीम’भोवती फिरणारी.

कादंबरीत व्यथांचीच जंत्री एवढी आहे की शेवटी काहीशी नकारात्मक भावनाच मागे उरते. त्याच वेळी एवढ्या बिकट स्थितीत घरापासून दूरवर राहणं ज्यांना भाग पडतं, त्यांची इथली अवस्था किती भीषण असेल याचाही अंदाज येतो. दुरून साजिर्‍या दिसणार्‍या या डोंगराचं हे भेगाळलेलं वास्तव अस्वस्थ करणारं आहे, हे मात्र निश्चित.

यू एन्व्ही द कुटिन्होज

लेखक- मिशेल डिकोस्टा

प्रकाशक- ट्रँकिबार

पृष्ठे- ३२०, किंमत- ४९९ रु.