चिनी सत्ताधार्‍यांनी १९८९ मध्ये तियानान्मेन चौकातील विद्यार्थी/ युवक आंदोलन चिरडण्यासाठी लष्करी बळाचा वापर केल्यानंतर, धोरणांत थोडाफार बदल होतो आहे असा देखावा करावाच लागला. पण याच काळात चीनच्या धोरणांमध्ये खरोखर मुळापासून घडलेल्या बदलांचे शिल्पकार म्हणून जू रोंग्जी (इंग्रजी स्पेलिंगमध्ये ‘झेड एच यू’ ही अक्षरे असली तरी, त्याचा चिनी उच्चार ‘जू’ असा होतो) यांचे नाव घ्यावे लागेल. आज राजकीयदृष्ट्या झाकली मूठ ठेवूनही चीन हा आर्थिक महासत्ता होऊ शकला आहे, या अर्थक्रांतीचा पाया घालणार्‍या रोंग्जी यांचे १२ ऑगस्ट रोजी निधन झाले.

युरोप- अमेरिकेत १९८० चे दशक हे उदारीकरण व खासगीकरणाचे होतेच, पण मिखाइल गोर्बाचोव यांच्यासारख्या राजकीय उदारमतवादी नेत्यांचाही प्रभाव त्या दशकावर होता. अशा दशकाच्या उत्तरार्धात, १९८७ मध्ये रोंग्जी शांघायचे महापौर झाले. मुक्त व्यापाराचा कधीकाळचा वारसा चिनी कम्युनिस्ट राजवटीमुळे पुसला गेलेले शांघाय! आर्थिक उदारीकरणाला पर्याय नाही, हे वास्तव १९८९ नंतर प्रत्यक्षात आले ते रोंग्जी यांच्या नेतृत्वाखालील या शहरातच. ‘निर्गुंतवणूक’ म्हणजे ज्या सरकारी कंपन्या चालवणे अशक्य आहे, त्यांच्यातील गुंतवणूक काढून घेणे किंवा त्या बंदच करणे, हे सार्वजनिक मालकीचे तत्त्व पाळणार्‍या चीनमध्ये रोंग्जी यांनी सुरू केले . शांघायमधला त्यांचा कार्यकाळ १९९१ मध्ये संपला. त्याच वर्षी चीनचे तत्कालीन अध्यक्ष डेंग श्याओपिंग यांनी रोंग्जी यांना उपाध्यक्षपदी नेमले. अर्थव्यवस्थेती सुधारणांसाठीच त्यांची नेमणूक आहे, हे जाहीर करण्यात आले आणि हे काम त्यांनी यशस्वीही केले.

माओ झेडाँग यांच्या धोरणांवर टीका केल्याबद्दल स्पष्टवक्ते रोंग्जी पक्षातून निलंबित झाले; त्यांचे राजकीय पुनर्वसन डेंग यांनीच १९७८ मध्ये केले होते. मग १९९३ ते ९५ या काळात त्यांना चीनच्या मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही देण्यात आले. या बँकेचे चलन नियमनाचे कार्य आणि व्यावसायिक कर्जांचे कार्य यांची फारकत करण्याची कल्पना रोंग्जी यांनी राबवली, म्हणून आज चीनमध्ये चार केंद्रीय बँका आहेत आणि अर्थव्यवस्थेचे गाडे या चार चाकांवर चालते. रोंग्जी यांच्याच काळात, उभरत्या आशियाई अर्थव्यवस्था संकटात आल्या. त्यातून चीनला त्यांनी तारलेच, पण साम्यवादी चीनची दारे बंद असल्यानेच आग्नेय आशियाई देशांमध्ये युरोपीय व अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करतात, हे वास्तव जाणून रोंग्जी यांनी चीनची ती बंद दारे खुली केली. अर्थात, राष्ट्राध्यक्ष या नात्याने हे श्रेय डेंग आणि त्यापुढले अध्यक्ष जिआंग झेमीन यांनाच जाते, पण त्यामागील मंत्रणा रोंग्जी यांची होती. उपाध्यक्षपदाचा कालावधी संपल्यावर १९९८ मध्ये मिळालेल्या पंतप्रधान पदाचा पुरेपूर वापर रोंग्जी यांनी चीनला आर्थिक झळाळी देण्यासाठी केला. ‘जागतिक व्यापार संघटने’मध्ये – डब्लूटीओ- चीनचा समावेश २००१ मध्ये करण्याचे निर्विवाद श्रेय रोंग्जी यांनाच दिले जाते. या संघटनेच्या अटी- शर्तींचा चलाख अर्थ काढून त्यांनी पाश्चात्त्य गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर चीनकडे वळवली आणि चीनला ‘जगाची फॅक्टरी’ हे अभिधान मिळवून दिले. भारताशी मैत्री वाढवली पाहिजे अशा मताचे ते होते, हे त्यांच्या निधनाची नोंद घेण्याचे आणखी एक कारण!