भाजपमधील संभाषण दरीकडे अंगुलिनिर्देश करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी इंग्रजीचे बोट धरले आणि ‘कम्युनिकेशन गॅप’ राजकारणात कुठे, कशी, कोणात आहे याचे अनेक स्तरही या निमित्ताने समोर आले.. मतदार आणि राजकारणी यांच्यातील वाढती दरी हा गंभीर प्रश्न असला तरी त्याकडे कुणाचे लक्ष नाही, हेही.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांत कम्युनिकेशन गॅप असल्याचे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे. उद्धव आणि त्यांचा पक्ष हे मराठीचे पुरस्कर्ते मानले जातात. मराठीचे वर्तमान, भवितव्य आणि भूतकाळदेखील सुरक्षित राहिला तो शिवसेनेमुळेच असा त्यांचा समज असतो. तेव्हा खरे तर त्यांना कम्युनिकेशन गॅपची जाणीव मातृभाषेतून व्हावयास हवी. पण या संभाषण दरीकडे अंगुलिनिर्देश करण्यासाठी त्यांना इंग्रजीचे बोट धरावे लागले. बहुधा हा सेनेचे उगवते सूर्य आदित्य ठाकरे यांचा प्रभाव वडिलांवर असल्याचा परिणाम असावा. पूर्वी तीर्थरूपांच्या प्रभावाखाली पुढील पिढी असायची. उद्धव ठाकरे हे याचे साक्षीदार आहेत. आता उलट झाले आहे. अलीकडचे वडीलच पुढील पिढीच्या प्रभावाने वाकलेले दिसतात. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या मुखातून अलीकडे जी काही इंग्रजी रसवंती पाझरताना दिसते ती चि. आदित्य यांच्यामुळेच, असे मानण्यास जागा आहे. असो. मुद्दा कम्युनिकेशन गॅप या संभाषण दरीचा आहे. उद्धव ठाकरे या दरीशी उत्तमपणे परिचित असल्यामुळे त्यांना ही कम्युनिकेशन गॅप अधिक तीव्रपणे खुपली असणार. मातोश्रीच्या खोल्याखोल्यांत, त्या खोल्यांतून निवास करणाऱ्यांत आणि पुढे ते घर सोडून गेलेल्यांत असलेली संभाषण दरी त्यांना चांगलीच ठाऊक. खेरीज, दूरध्वनी यंत्र ते उद्धव ठाकरे यांचे कान ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी कम्युनिकेशन गॅप. महाराष्ट्रात एक वेळ जायकवाडी आणि उजनी धरणे भरून वाहू लागतील. पण दूरध्वनी यंत्र आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दरी मात्र पुसता पुसली जाणार नाही, असे गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यापासून ते कै. प्रमोद महाजन यांच्यापर्यंत अनेकांचे मत. खासगीत विचारल्यास जवळपास सर्व सेना नेतेदेखील या मतास दुजोरा देतील. तेव्हा ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शेती, जमीन आदी प्रश्नांचा सुगावा सर्वात आधी शरद पवार यांना लागतो, कोणत्या पाटबंधारे प्रकल्पात किती खर्च वाढू शकेल याचा अंदाज सर्वप्रथम अजित पवार यांना येतो त्याचप्रमाणे कम्युनिकेशन गॅपची पहिली जाणीव उद्धव ठाकरे यांना झाल्यास नवल नाही. तंत्रज्ञानाचा जसजसा प्रसार आणि प्रचार होत गेला तसतसे आपले जीवन बदलत गेले. दळणवळण हे याचे सर्वात मोठे उदाहरण. परंतु उद्धव ठाकरे यांना ते मान्य नसावे. त्यामुळे समाजात ज्या प्रमाणे दळणवळणतज्ज्ञ तयार झाले, तसेच दळणवळण दरीतज्ज्ञदेखील उदयाला आले. उद्धव ठाकरे यांना हे मान्य व्हावे. त्याचमुळे त्यांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांतील दळणवळण दरी अधिक प्राधान्याने खुपली.
खरे तर त्या दरीपेक्षा अधिक मोठी दरी ही भाजप आणि सेना यांच्यात आहे आणि सेना भाजप युती अस्तित्वात आल्यापासूनच ती जन्माला आलेली आहे, याचीही जाणीव उद्धव ठाकरे यांना असणारच. ही दरी तिहेरी आहे. यातील पहिला स्तर हा खुद्द सेनेत असलेल्या दरीचा. त्याची दखल उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे इतिहास दर्शवत नाही. नपेक्षा नारायण राणे वा छगन भुजबळ हे सेनेत असते. शिवाय मातोश्रीवर तासन्तास वाट पाहावी लागूनही उद्धव ठाकरे यांचे साधे दर्शनही सेना नेत्यांना होत नाही, ते या दरीमुळेच. उद्धव ठाकरे यांना अधिक काळजी वाटावयास हवी ती खरे तर या दरीबाबत. परंतु ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते आणि आपल्या डोळ्यातील मुसळाची जाणीवही होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या अंगणातील सूक्ष्म छिद्रे दिसतात आणि आपल्या परसातील खिंडाराचीही जाणीव होत नाही.
दुसऱ्या स्तरावर आहे ती भाजपतील- उद्धव ठाकरे यांना खुपली ती- दरी. गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर आपापल्या मगदुराप्रमाणे वा गरजेप्रमाणे ती वाढवतात वा वाढलेली असल्यास वेगवेगळ्या खुंटय़ा वा पाचर मारून ती कमी करण्याचा प्रयत्न करतात. कोणत्या दरीसाठी कोणती पाचर मारायची याची शास्त्रशुद्ध पाहणी, अभ्यास आणि नंतर पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन भाजपने करून ठेवलेले असल्याने भाजपला या दरीचे अप्रूप नाही. शिवाय, भाजप हा राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस या सर्वात जुन्या पक्षास पर्याय ठरू पाहत असल्यामुळे सर्व चांगल्या-वाईट काँग्रेसी सवयींचे अनुकरण करू लागला आहे. काँग्रेसमध्ये ज्या प्रमाणे वेगवेगळ्या पातळ्यांवर जाणूनबुजून दऱ्या ठेवल्या जातात वा निर्माण केल्या जातात, तसे भाजपदेखील करू लागला आहे. उदाहरणार्थ- दिग्विजय सिंग आणि जयराम रमेश वा वीरप्पा मोईली आणि जयंती नटराजन वगैरे. यात सन्माननीय असा एकमेव अपवाद जर कोणाचा असेल तर तो अर्थातच पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा. सिंग यांची कोणाहीबरोबर कधीही दळणवळण दरी तयार होत नाही. कारण त्यांचे कोणाशी दळणवळणच नसते. त्यामुळे तो एक अपवाद वगळता काँग्रेस मुक्तपणे अशा दऱ्यानिर्मितीस उत्तेजन देत असते आणि त्याच पक्षाच्या पावलावर पाऊल टाकून चालू पाहणाऱ्या भाजपमध्येही अशा दऱ्या आनंदाने निर्माण केल्या जातात. या दऱ्या वाढवायच्या की कमी करायच्या याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जातो आणि तसा तो घेतला जाण्यात दिरंगाई होत असेल तर नागपुरातून आदेश काढून त्या भरून काढल्या जातात. तिसऱ्या स्तरावर आहे ती भाजप आणि सेना यांच्यातील दरी. उद्धव ठाकरे यांनी वास्तविक चिंताग्रस्त व्हायला हवे ते या दरीबाबत. या दरीच्या अस्तित्वामुळेच भाजप नेत्यांचे निरोप उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, पोहोचले तर त्याची दखल घेतली जात नाही आणि घेतली गेली तरी त्या निरोपास काही किंमत दिली जात नाही. हे झाले महत्त्वाच्या, दखलपात्र दऱ्यांबाबत. त्याखेरीज प्रसंगोपात्त अनेक छोटय़ा छोटय़ा दऱ्यादेखील तयार होत असतात. उदाहरणार्थ, सेना आणि रामदास आठवले यांच्यातील रिपब्लिकन दरी किंवा सेना-भाजप आणि राजू शेट्टी यांच्यातील स्वाभिमानी दरी. या अशा दऱ्यांची दखल घ्यायला हवी असे उद्धव ठाकरे यांना वाटले नसणार. कारण त्या संदर्भात इतके दिवस कधी त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सामन्यात नाही. खरे तर या सगळ्याच्या पलीकडे एक प्रचंड मोठी दरी आहे आणि सर्वच राजकीय पक्षांनी तिची दखल घ्यावयास हवी. ती म्हणजे मतदार आणि राजकारणी यांच्यातील वाढती दरी. या दरीची जाणीव कोणाही राजकीय पक्षास नाही आणि त्यामुळे ती भरून यावी अशी इच्छाही नाही. मतदारांच्या जाणिवा, त्यांच्या गरजा आणि राज्यकर्त्यांची कृती यांच्यातील प्रचंड तफावत ही या वाढत्या दरीच्या मुळाशी आहे. तेव्हा या दरीबाबत कोणालाही चिंता आहे, असे दिसत नाही. अशा वेळी क्षुद्र राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थाच्या भेगा बुजवण्यात ही समस्त राजकीय मंडळी मशगूल आहेत.
आगामी निवडणुकांच्या निमित्ताने या दरीची जाणीव संबंधितांना करून देणे अधिक गरजेचे. उद्धव ठाकरे यांचे लंडन हे आवडते ठिकाण. अर्थात त्या शहरात भुयारी रेल्वेच्या सार्वजनिक वाहतुकीतून कधी प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसणार. त्यामुळे तेथे रेल्वे आणि फलाट यांच्यातील दरीबाबत दिल्या जाणाऱ्या इशाऱ्याबाबत ते अनभिज्ञ असतील. तेव्हा तो इशारा येथे देणे सर्वासाठीच गरजेचे. खेरीज तो इंग्रजीतून असल्यामुळे उद्धव आणि अन्य नेत्यांना समजण्यासही सोपा. तेव्हा.. माइंड द गॅप.