रंजन दाणी
भांडवली चौकटीतील सत्तास्थाने भूषवत असताना ज्यांचे सार्वजनिक चारित्र्य वादातीत राहिले असे बहुसंख्य नेते कार्यकर्ते ज्या पक्षात आहेत आणि असतात तो पक्ष म्हणजे आपल्या देशातील कम्युनिस्ट पक्ष! सत्ता, संपत्ती आणि तत्वनिष्ठता यामध्ये जे सदैव तत्त्वाच्या बाजूने राहिले, त्यासाठी वाटेल तो त्याग समर्पण कुठलाही देखावा, प्रसिद्धी स्टंट किंवा गाजवाजा न करता सहज स्थायीभावाने केले अशा त्या पक्षातील नेत्यांची अनेक नावे सांगता येतील.

मग त्यामध्ये ज्यांनी शेकडो एकर वडिलोपार्जित जमीन शेतमुजरांमध्ये वाटून टाकली ते ईएमएस नंबूद्रीपाद असोत, कमानी ट्यूब्स प्रकरणात मुलाचे नुसते नाव घेतले गेले तरी त्याच्याशी कौटुंबिक संबध तोडणारे ज्योती बसू असोत, किंवा अनेक वर्षे मुख्यमंत्री राहूनही हजार रुपयापेक्षा अधिक बँक बॅलन्स नसलेले त्रिपुराचे माणिक सरकार असोत सगळेच अगदी आदर्शवत! कोणताच संसदीय पक्ष या बाबतीत त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही. त्यांचे कट्टर विरोधकसुद्धा टीका करताना ‘ते देव मानत नाहीत, धर्म विरोधी असतात, लोकशाही मानत नाहीत, स्वप्नाळू आदर्शवादी असतात, त्यांना भारतीय समाजवास्तव कळत नाही…’ वगैरे अनेक खरेखोटे आरोप करतील पण ते भ्रष्टाचारी आहेत असे चुकूनही म्हणणार नाहीत. बावनकशी सोने म्हणतात ते हेच! मागे खूप वर्षापूर्वी एकदा मुंबईतील एक कम्युनिस्ट नगरसेवक लाच घेताना पकडल्याची बातमी वाचल्याचे आठवते. त्यावेळी भांडवली पेपरांनी सुद्धा अग्रलेख लिहून हा माणूस असे करू शकत नाही, त्याला अडकवले गेले असावे अशी निसंदिग्ध ग्वाही दिल्याचे सुद्धा आठवते.

पण काळ खूप बदलला… सत्तेवर आलेल्या नव्या सरकारने सर्व मार्ग लोकशाही संस्थांचा (गैर)वापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचे धोरण राबवले. प्रामुख्याने ईडी, सीबीआय इत्यादी तपास यंत्रणांमार्फत छोट्या मोठ्या पक्षांना या सरकारने जेरीस आणले, पक्ष फुटले, नेते सुटले… सगळी दाणादाण उडाली. पण याही वावटळीत कम्युनिस्ट मात्र सुरक्षित राहिले. त्यांच्याबद्दल अशी फुशारकी मारता येऊ लागली की, बघा… इडी फिडी यांचे काहीच वाकडे करू शकत नाही. कारण त्यांच्याकडे असली काही भानगड नसतेच! कर नाही त्याला डर कसली?

बाकी विरोधकांचे खच्चीकरण करून केंद्रातले सरकार संघराज्यीय प्रणालीचा गळा घोटत असून संविधान मोडीत काढत आहे आणि फॅसिझम राजवट राबवत आहे अशी ठोस आणि रास्त भूमिका घेऊन कम्युनिस्ट पक्षाने विरोधी आघाडीत सुद्धा जीव ओतण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यात त्यांच्या पक्षाला यश मिळाले नाही. प्रचंड बेरोजगारी, शिक्षणाचा बाजार, कंत्राटदारांचा उच्छाद, दारिद्र्य आणि महागाईचे चटके, शेतकऱ्यांच्या आत्महत्या इतकी सगळी संकट असूनही त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रात तर जेमतेम एक आमदार निवडून आला.

काळ आणखी पुढे सरकला एकेकाळी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेला बंगाल आणि सत्ता हाती असलेला केरळ या दोन्ही राज्यात निवडणुका लागल्या. दोन्हीकडे विरोधी पक्ष म्हणून आव्हान होते ते केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे नव्हे तर विरोधकांच्या आघाडीतल्याच प्रादेशिक पक्ष किंवा काँग्रेस पक्षाचे! मग तिरंगी लढती झाल्या. जे होऊ नये तेच घडले. २५ वर्ष ज्या राज्यात कम्युनिस्ट पक्षाने लोकाभिमुख धर्मनिरपेक्ष रीतीने सत्ता राबवली त्या प्रदेशात जातीयवादी धर्मांध पक्षाने सत्ता मिळवली. केरळमध्ये मात्र दर पंचवार्षिक निवडणुकीत आलटून पालटून सत्ता येण्याची जी प्रथा मागच्या वेळी बंद पडली होती ती केरळच्या जनतेने पुन्हा प्रस्थापित केली. तिथे कांग्रेस आघाडीचे सरकार आले.

आज काळाने आणखी पुढचे पाऊल टाकले…

केरळचे मुख्यमंत्री कॉम्रेड ओ. व्ही. विजयन यांच्या (भाड्याच्या) घरी ईडी ची धाड पडल्याचे वृत्त वाचले आणि हसूच आले. ‘ईडी’ आणि कम्युनिस्टांच्या घरी? आरोप तरी केवढा? तर म्हणे एक कोटी सत्तर लाखाची रक्कम मुख्यमंत्र्यांच्या कन्येला दिली गेली. खरे म्हणजे एवढी रक्कम आपल्याकडे एखाद्या नगरसेवकाकडेही पडून असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याकडचे मंत्री पुत्रतर म्हणे शे दोनशे कोटींचे हॉटेल खरेदी करतात… आणि दहा वर्ष सलग मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाची चौकशी ती कशावरून तर १ कोटी सत्तर लाखावरून!

पण प्रश्न रकमेचा नाही, तो आहे पदाचा दुरुपयोग करून गैरमार्गाने कमावल्याचा.

वास्तविक, या बाबतची साधी नोटीस जरी कॉ. विजयन त्यांना पाठवली असती तरी त्यांनी यातले सत्य काय ते प्रांजळपणे स्पष्ट केले असते. पण सक्रिय राजकारणात राहून आमच्यासारखे का नाहीत? वेगळे कसे? हे ज्यांना ज्यांना खटकले असेल त्यांनी ‘ईडी’ला हाताशी धरून हे कुभांड रचले असणार… चांगल्या माणसाची बदनामी करण्याची नामी संधी आजकालच्या काळात कोण सोडणार? सत्ताधारी तर नाहीच नाही!

तरीही… किंवा म्हणूनच,

सामान्य माणूस म्हणून मनात प्रश्न असा येतो की ‘ईडी’ची धाड इतर कुठल्या पक्ष नेत्यांवर पडली आणि कम्युनिस्ट पक्ष नेत्यावर पडली तर येणारी प्रतिक्रिया एकसारखीच कशी?

म्हणजे धाड पडल्यावर आक्रस्ताळेपणा, अधिकाऱ्यांच्या गाडीची अडवणूक, धाडीच्या निषेधार्थ निदर्शने इत्यादी इत्यादी!

शिवाय राहुल गांधी यांच्या निवडणूक प्रचारातील एखादे विधान घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कुणी खासदार ‘भाजपने ही कारवाई काँग्रेसच्या मूक संमतीने केली आहे’ अशी आगपाखड करतात तेव्हा अशा प्रगल्भ तत्त्वनिष्ठ पक्षाच्या प्रतिमेला तडा जाण्याचा आणि केंद्र सरकारच्या जनविरोधी लोकशाही विरोधी धोरणास विरोध करणाऱ्या शक्ती कमजोर होण्याचा धोका संभवतो हे या थोर नेत्याच्या लक्षात येत नसेल का?

त्यापेक्षा झालेल्या आरोपा बाबत स्वयंस्पष्ट आणि जाहीर खुलासा करावा, सर्व प्रकारच्या चौकशीस सामोरे जाण्याची हिंमत ठेवावी आणि ‘ईडी’ला आणि त्यांच्या मालकाला थोबाडावर पाडून कष्टकरी राजकारणातला लखलखीत कारभार पुन्हा जनतेसमोर आणावा आणि भांडवली राजकारणापासून असलेले आपले शुभ्र वेगळेपण दाखवून द्यावे हेच योग्य नाही का?

मागे एकदा आपल्याकडे शरद पवार यांना अशीच ‘ईडी’ची नोटीस आली; तेव्हा त्यांनीच फोन करून स्वतः ‘ईडी’ कार्यालयात जाऊन सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि मग ते सगळे थांबले. अशीच सडेतोड भूमिका घेऊन आपली पारदर्शकता जपण्याचा तत्त्वनिष्ठपणा कॉम्रेड मंडळींनी दाखवायला काय हरकत आहे?

लोकांचा विवेक अजूनही शाबूत आहे. खऱ्या खोट्याची चाड असणारे असंख्य लोक आहेत. ज्यांनी कष्टकऱ्यांची शोषण मुक्ती हे आपले जीवित कार्य मानून आयुष्यभर संघर्षाचे राजकारण केले त्यांनी असल्या ‘ईडी’च्या पीडेने विचलित होण्याचे कारण नाही. वाईटात वाईट असेही गृहीत धरले की तुम्हाला खोट्या प्रकरणात अडकवून गुन्हेगार ठरवतील, तरीदेखील घाबरण्याचे कारण नाही. तुमचा तेजस्वी वारसा, अव्यभिचारी सार्वजनिक नैतिकता आणि बावनकशी लोकशाही निष्ठा यामुळे देशातील तमाम प्रगल्भ,प्रबुद्ध जनमत आणि ज्यासाठी तुम्ही जिवाचे रान करता ते संघटित असंघटित जनमत निसंदिग्धपणे तुमच्याच बाजूला उभे असेल!

‘ईडी’बद्दल कॉम्रेड मंडळींची आणि ममता दीदींची प्रतिक्रिया यांमध्ये फरक असायला हवा एवढीच माफक अपेक्षा!

rgdani14@gmail.com

((समाप्त))