काँग्रेसच्या क्षुद्र राजकारणातून तीन दशकांपूर्वी भिंद्रनवाले या भस्मासुराचा उदय झाला होता आणि त्यात शीख समाज मोठय़ा प्रमाणावर होरपळला गेला. आताही याच समाजाच्या वाटय़ास सरकारचे नाकर्तेपण आले आहे. सज्जनकुमार आणि सरबजित हे सरकारने शीख समाजास केलेल्या जखमांचे ओरखडे आहेत.

अखेर सरबजित सिंग गेला. त्याला पाकिस्तानी तुरुंगात सामान्य गुंडांकडून दुर्दैवी मरण आले. त्याच्या निधनानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सरबजित हा भारताचा शूर सुपुत्र होता अशा शब्दांत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी श्रद्धांजली वाहिली. हे एक आपले खास वैशिष्टय़. एक संस्कृती म्हणून आपण oद्धांजली वाहण्यात अत्यंत उत्साहाने आघाडीवर असतो. ज्याला श्रद्धांजली वाहिली जाते ती व्यक्ती जिवंत असताना पूर्ण दुर्लक्षित केली गेली असेल. पण तिच्या निधनानंतर मात्र त्या व्यक्तीचे गुणगान आपल्याकडे अहमहमिकेने केले जाते. सरबजितच्या कुटुंबीयांना आता त्याचा अनुभव येत असेल. पंतप्रधान सिंग यांना सरबजितविषयी इतकाच जर आदर आणि प्रेम होते तर त्याच्या सुटकेसाठी सरकारने किती प्रयत्न केले, असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांना आणि अन्य देशवासीयांनाही पडल्यावाचून राहणार नाही. राहुलबाबांनीही काल सरबजित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. याआधी कधी त्यांनी सरबजितच्या सुटकेची मागणी केल्याचे ऐकिवात नाही. इतकेच काय, सरबजितवर हल्ला झाल्याचे प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्या उपचारावर वा सुटकेवर आपल्या देशवासीयांना मौलिक असे राहुलभाष्य ऐकावयास मिळाले नाही. सरबजितच्या निधनानंतर संसद वा अन्यत्रही सर्वपक्षीय दु:ख व्यक्त केले जात आहे. परंतु हे सर्वपक्षीय सरबजितची सुटका व्हावी यासाठी कधीही एकजुटीने उभे राहिले नाहीत, हेदेखील वास्तव नाकारण्यात अर्थ नाही.
सरबजितच्या निधनामुळे काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित व्हावयास हवेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग हा की सरबजितच्या निधनामागे केवळ पाकिस्तानी कैदीच होते, असे मानणे हा भाबडेपणाचा अतिरेक ठरेल. पाकिस्तान सरकार आणि अल् काईदा, तालिबान आदी कट्टर अतिरेकी इस्लामी संघटना यांच्यात फार अंतर नाही. पाकिस्तानी सरकारातील एक मोठा घटक अधिकृतपणे या दहशतवादी संघटनांशी संधान बांधून आहे आणि त्यांचा समर्थकही आहे. या दहशतवादी लागेबांध्यांमुळेच कोणत्याही महत्त्वाच्या कारवाईत अमेरिका पाकिस्तानला सहभागी करून घेत नाही. मग १९९३ साली वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील बॉम्बस्फोटाला जबाबदार असलेला युसुफ रामझी याची अटक असो वा वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या २००१ सालातील हल्ल्यास जबाबदार असणाऱ्या ओसामा बिन लादेन याच्या हत्येची कारवाई असो. पाकिस्तानवर अमेरिकेने नेहमीच अविश्वास दाखवलेला आहे. या पाश्र्वभूमीवर सरबजितवर पाकिस्तानी तुरुंगात हल्ला करणारे हे साधे कैदी होते, यावर विश्वास ठेवता नये. याचे कारण असे की २६/११च्या मुंबई हल्ल्यातील अजमल कसाब यास फासावर लटकावले गेल्यानंतर आणि २००१ साली संसदेवर झालेल्या हल्ल्यातील अफझल गुरू यासही फाशी दिल्यानंतर त्याचा बदला घेण्याचा इशारा किमान दोन दहशतवादी संघटनांनी दिला होता. लष्कर-ए-तय्यबा आणि तालिबान या संघटनांची नावे या संदर्भात घेतली गेली. तेव्हा या बदल्याचा सोपा मार्ग म्हणून सरबजित यास लक्ष्य केले जाईल, अशीही भीती भारतीय गुप्तचरांना होती. ती खरी ठरली. त्यात सरबजितवर हल्ला करणारे मुदस्सर आणि आफताब नावाचे दोन कैदी हे लष्कर-ए-तय्यबा या संघटनेशी संबंधित होते, असेही प्रकाशित झाले आहे. याचा अर्थ सरबजितवर हल्ला करणारे साधे कैदी होते असे मानून चालणार नाही. त्याच्या जिवास धोका होता याचा अंदाज असूनही सरकार त्याला वाचवू शकले नाही. आता पाकिस्तानची कृती निंदनीय असल्याची प्रतिक्रिया सरकारच्या वतीने सलमान खुर्शिद, मनीष तिवारी आदींनी व्यक्त केली आहे. ती अगदीच पोकळ आणि पोरकट आहे. याचे कारण पाकिस्तानची कृती निंदनीय नव्हती कधी? एखाद्या कृतीबद्दल पाकिस्तानचे आभार मानावेत अशी घटना गेल्या ६५ वर्षांत एक तरी दाखवता येईल काय? याउलट भारतीय तुरुंगात २० वर्षे खितपत पडलेले खलिल चिस्ती यांची आपण गेल्या वर्षी न्यायालयाच्या आदेशानंतर का होईना सुटका केली आणि मायदेशी जाऊ दिले. इतका उमदेपणा पाकिस्तानकडून अपेक्षित नसला तरी त्या देशाने किमान माणुसकी दाखवण्यास हरकत नव्हती. परंतु तेवढेही पाकिस्तानला करता आले नाही. कारण तो देश आणि तेथील व्यवस्था पार रसातळाला गेली असून त्या देशाशी मैत्री करण्याची हाक देणारे भंपक वगळता सर्वानाच याची जाणीव आहे.
एका बाजूला सरबजित सिंग या शीख कैद्याची पाकिस्तानी तुरुंगात हत्या होत असताना शीख बांधवांविरोधात याच देशात दंगली घडवून आणण्याचा आरोप असलेले सज्जनकुमार यांची न्यायालयातून सुटका होते आणि सरकार त्यास आव्हान देत नाही, हे सरकारविषयी चांगले मत निर्माण करणारे नक्कीच नाही. १९८४ साली इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर शिखांचे दिल्लीत शिरकाण झाले. त्यास तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा आशीर्वाद होता असे म्हणता नाही आले तरी हे शिरकाण थांबवण्यासाठी राजीव गांधी यांनी प्रयत्न केले असेही म्हणता येणार नाही. जगदीश टायटलर आणि सज्जनकुमार हे दोन काँग्रेसचे गणंग शिखांविरोधात चिथावणी देण्यात आघाडीवर होते, असा आरोप होता. एखादा मोठा वृक्ष कोसळला की त्याखालच्या लहानसहान झुडपांना त्रास होतोच अशा अर्थाचे विधान करून राजीव गांधी यांनी एका अर्थाने जे काही झाले त्याची भलामणच केली होती. परंतु पुढेही टायटलर, सज्जनकुमार आणि त्यांचे सहकारी एच.के.एल. भगत आदींना वाचवण्याचाच प्रयत्न झाला. शीख दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमल्या गेलेल्या न्या. जी. टी. नानावटी यांच्या आयोगानेही टायटलर यांच्यावर ठपका ठेवला. तरीही त्यांना मंत्रिपदी बसवण्याचे पुण्यकर्म काँग्रेस सरकारने केले. अखेर गेल्या वर्षी न्यायालयाने टायटलर यांची पुन्हा चौकशी करावी असा आदेश दिल्याने सरकारला चपराक बसली. या पाश्र्वभूमीवर दिल्लीतील शहर न्यायालयाने पाच शिखांच्या हत्येप्रकरणी सज्जनकुमार यांची मुक्तता केल्यावर काँग्रेस सरकारने त्याविरोधात अपील करण्याची तयारी दाखवण्यास हरकत नव्हती. याचे कारण असे की याचप्रकरणी सज्जनकुमार यांच्यासमवेतच्या पाच जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सज्जनकुमार यांची सुटका झाली ती पुरेशा पुराव्याअभावी. याचा अर्थ याप्रकरणी पुरेसा पुरावा सरकारी पक्षाने सादर केला नाही. या प्रश्नावर शीखबांधवांत असलेल्या भावनांची तीव्रता लक्षात घेऊन तरी सरकारने अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली असती तरी पुढचा जनक्षोभ टळला असता. सज्जनकुमार यांच्याविरोधात शीख असलेल्या संतापाचे प्रदर्शन गेले दोन दिवस राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर आणि रेल्वेमार्गावर होत आहे. काल या निदर्शकांनी थेट काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानीच धडक दिली. अर्थात याबाबतही पुरेसा जनक्षोभ दाटून आल्यावर आपण या सगळय़ाचे तारणहार आहोत असे दाखवत काँग्रेसाध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आणि प्रक्षुब्धांना चुचकारायचे, असा विचार काँग्रेसजनांनी केला असल्यास त्याचे नवल वाटणार नाही.
याचे कारण तीन दशकांपूर्वी याच क्षुद्र राजकारणातून भिंद्रनवाले या भस्मासुराचा उदय झाला होता, याचा विसर पडून चालणार नाही. त्यात शीख समाज मोठय़ा प्रमाणावर होरपळला गेला होता. आताही याच समाजाच्या वाटय़ास सरकारचे नाकर्तेपण आले आहे. सज्जनकुमार आणि सरबजित हे सरकारने शीख समाजास केलेल्या जखमांचे ओरखडे आहेत. ते लवकरात लवकर पुसले जाणे देशाच्या हिताचे आहे.