आणीबाणीचा वेध ४० वर्षांनी घेताना, नेतृत्व आणि त्यांचे निर्णय यांच्या पलीकडे जाऊन, हे असेच का वागले याबद्दल नेमके प्रश्न विचारणाऱ्या नव्या  पुस्तकाचे अंश..  
आणीबाणी लादली गेली, तेव्हा कूमी कपूर या ‘द इंडियन एक्स्प्रेस’साठी दिल्लीत बातमीदारी करीत. म्हणजेच, आणीबाणीपूर्वीही संजय गांधी यांनी दिल्लीत चालविलेल्या दमनशाहीच्या त्या जवळच्या साक्षीदार होत्या. याच एक्स्प्रेस समूहासह त्या वाढल्या, देशातील अव्वल राजकीय पत्रकारांपैकी एक ठरल्या आणि आजही त्यांचा स्तंभ याच वृत्तपत्रात असतो. मात्र त्यांचे ‘द इमर्जन्सी- अ पर्सनल हिस्टरी’ हे पुस्तक एक्स्प्रेसमध्ये केलेल्या लिखाणाचे संकलन नव्हे. पुस्तकाच्या नावात ‘पर्सनल हिस्टरी’ असल्यामुळे ते आत्मकथनपर वाटेल, पण तसेही हे लिखाण नाही. आणीबाणीशी लढताना लोक कसे वागले, नेत्यांनी काय केले, देशाच्या मोठय़ा भागात जी आणीबाणीविरोधी लाट पुढे मतपेटीतून दिसली तिची बीजे कशी रोवली गेली, याचा पट लेखिकेने अतिशय जाणकारीने मांडला आहे. त्याचबरोबर, आणीबाणी लादताना इंदिरा गांधी कोणत्या परिस्थितीत होत्या, त्यांचे सल्लागार कोण होते आणि ते कसे वागले, हेही लेखिकेने टिपले आहे.
यात भर आहे तो, कोण कसे वागले- कोणी काय केले- यावर! अर्थात अनुभवी पत्रकार एकेका राजकारण्याच्या कृतीच केवळ सांगण्यावर थांबत नाही, तर त्या कृतींमागची कारणपरंपराही सांगतो. कूमी कपूर यांनीही हे केले आहेच. सुब्रमण्यम स्वामींचा उदय आणीबाणीच्या काळातला, तर मोरारजी देसाईंसारख्या अनेकांचे नेतृत्व पक्षभेदांपल्याड मान्य होण्याचाही हाच काळ. तो लेखिकेने उभा केला आहे. सत्ता-वर्तुळाभोवतीच हे निवेदन फिरते हे खरे, पण म्हणून ते एकाही नेत्याची कड घेत नाही. उलट, आणीबाणीशी लढलेल्यांबद्दल आणि लादणाऱ्यांबद्दलही नेमके प्रश्न लेखिका उपस्थित करते. आणीबाणीपुढे न झुकल्याबद्दल ज्या ‘द इंडियन एक्स्प्रेस समूहा’ची आजही प्रशंसा होते, त्याचे प्रमुख रामनाथजी गोएंका यांना काहीच त्रास झाला नसेल का, याचे उत्तरही लेखिका शोधते आणि त्यातून वाचकाला समजतो एक फर्मास किस्सा- कुलदीप नय्यर यांच्या मदतीने खुशवंतसिंगांचा ‘कात्रज’ कसा केला गेला, याचा! तो मुळातूनच वाचण्यासारखा आहे, तसेच ‘सिद्धार्थ शंकर रे यांचे आणीबाणीची योजना मांडणारे पत्र’सुद्धा.  ‘बुकमार्क’च्या वाचकांसाठी लेखिकेच्या परवानगीने, इथे पहिल्या आणि आठव्या प्रकरणाच्या निवडक भागाचा अनुवाद देत आहोत..