‘कॉर्पोरेट’ लैंगिक छळवणूक

लैंगिक छळवणुकीचे प्रकरण असे म्हटल्यावर कुणाच्याही डोळ्यासमोर जे उभे राहील त्यापेक्षाही आयगेट कापरेरेशन या अमेरिकी आऊटसोर्सिग कंपनीने हकालपट्टी केलेल्या फणीश मूर्ती यांच्या प्रकरणात किती तरी अधिक गुंतागुंत आहे.

लैंगिक छळवणुकीचे प्रकरण असे म्हटल्यावर कुणाच्याही डोळ्यासमोर जे उभे राहील त्यापेक्षाही आयगेट कापरेरेशन या अमेरिकी आऊटसोर्सिग कंपनीने हकालपट्टी केलेल्या फणीश मूर्ती यांच्या प्रकरणात किती तरी अधिक गुंतागुंत आहे. एक तर ते आहे बडय़ा कॉपरेरेट कंपनीमधले प्रकरण. त्यामुळेच अब्जावधींची उलाढाल, तिच्याशी संबंधित प्रचंड स्पर्धा, सत्तेची गणितं, त्या गणितांभोवती फिरणाऱ्या माणसांच्या महत्त्वाकांक्षा या सगळ्यांमधून घडणाऱ्या कॉपरेरेट क्षेत्रातल्या प्रकरणांकडे ब्लॅक अँड व्हाइट अशा दृष्टीने बघताच येणार नाही. प्रत्येकाचा आपल्याला हवी तीच बाजू पुढे आणण्याचा प्रयत्न असणार आणि त्यामुळे फणीश मूर्ती यांना इन्फोसिसच्या नोकरीमध्ये महिला सहकाऱ्याच्या लैंगिक शोषणाच्या मुद्दय़ावर नोकरी गमावण्याचा, प्रचंड मोठी आर्थिक नुकसानभरपाई द्यावी लागण्याचा अनुभव असताना त्यांनी पुन्हा तसेच कसे केले. महिला सहकाऱ्याबरोबरच्या लैंगिक संबंधांची पूर्वकल्पना त्यांनी कंपनीला दिली होती म्हणजे काय या प्रश्नांची उत्तरे वरवर दिसणाऱ्या नैतिक प्रश्नांपेक्षा कंपनीच्या अंतर्गत गोष्टींमध्येच असण्याचीच शक्यता अधिक आहे. वरवर पाहता फणीश मूर्ती यांनी कनिष्ठ महिला सहकाऱ्याबरोबर असलेल्या लैंगिक संबंधांची माहिती कंपनीला दिली नाही, त्यामुळे त्यांच्या कंत्राटी कराराचा भंग झाला म्हणून त्यांची हकालपट्टी केली. तर आपण या संबंधांची माहिती कंपनीला दिली होती, असे फणीश मूर्ती यांचे म्हणणे आहे. यापूर्वी म्हणजे फणीश मूर्ती इन्फोसिसमध्ये असताना त्यांना महिला सहकाऱ्याच्या लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणातच नोकरी सोडावी लागली होती आणि ३० लाख अमेरिकन डॉलर्स एवढी नुकसानभरपाई द्यावी लागली होती. दुसरीकडे फणीश मूर्ती यांनी काम केले त्या सगळ्याच कंपन्यांना त्यांनी भरपूर फायदा करून दिला आहे. त्यामुळे त्यांच्या हकालपट्टीमागे आणखीही काही कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे म्हणून कुणीही केलेल्या लैंगिक छळवणुकीचे समर्थन होऊ शकत नाही. पण आपल्याला फायदा करून देणाऱ्या माणसाला बाजूला करून लैंगिक छळवणुकीला जास्त प्राधान्य दिले जाईल इतके  कॉपरेरेट विश्व सरळसाधे, नैतिक आहे यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही. आपल्याला नको असलेल्या माणसाला बाजूला करतानादेखील स्त्रियांच्या लैंगिकतेचा वापर करण्याचे धारिष्टय़ येथे नक्कीच असू शकते. फणीश मूर्तीनी, कंपनीने आणि संबंधित स्त्रीने एकमेकांचा आपापल्या कारणांसाठी वापर केला नसेल कशावरून? अशा प्रकरणांमुळे लैंगिक शोषणाच्या खऱ्या, गंभीर तक्रारींकडे मात्र डोळेझाक होऊ शकते त्याचे काय?  दुसरीकडे स्त्रियांकडूनही सुरुवातीच्या काळात सहमतीने संबंध आणि नंतर त्यांचा इन्कार करत आपली लैंगिक छळवणूक झाल्याचा आरोप करणे ही अशी उदाहरणे गेल्या काही काळात पुढे आली आहेत. या प्रकरणातही तसे झालेले नसेल कशावरून? फक्त मुद्दा एवढाच आहे की आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हवे ते मार्ग हाताळताना आपले पारंपरिक पद्धतीनेच वस्तुकरण होते, वापर होतो, हे अगदी कॉपरेरेट क्षेत्रातल्या, उच्चविद्याविभूषित स्त्रियांनाही समजू नये? की ते समजूनही त्या ते नजरेआड करतात?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corporate sexual harrasment

ताज्या बातम्या