डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार का केला, दलित-अस्पृश्य समाजाला बुद्धाच्या वाटेवर का आणून सोडले, यावर गेली ५७ वर्षे बरीच चर्चा झाली, समीक्षा झाली, विरोध झाला, अनेक ग्रंथांचे लेखन झाले, अजूनही त्यावर वाद-विवाद झडत आहेत. कारण धर्मातराची ती घटना एक इतिहास होऊन बसली आहे. परंतु ज्यांच्यासाठी त्यांनी ती ऐतिहासिक सांस्कृतिक क्रांती घडवून आणली, त्या नवबौद्ध समाजाला किंवा स्वत:ला आंबेडकरी अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांना बाबासाहेबांचा धम्म पचनी पडला का, असा प्रश्न पडावा, अशी विदारक परिस्थिती आजही आहे. हातात, दंडात, गळ्यात गंडेदोरे घालणे सुरू ठेवून, अजूनही जुनाट मानसिकतेतून बाहेर पडलेलो नाही, असेच या समाजातील अनेक जण दाखवून देत असतात. बाबासाहेबांनी फार विचार करून बुद्ध तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला. भारतातील दलित वा अस्पृश्य समाज हा जातिव्यवस्थेचा बळी ठरला होता. त्याला आधार धर्माचा होता. ईश्वर वा जगाचा कुणी तरी निर्माता आहे, यावर धर्म ही संकल्पना उभी असते. ईश्वर आला की त्याभोवती कर्मकांड आले. कर्मकांड आले की, तिथे बुद्धिवाद वा विवेकवाद संपुष्टात येतो. आम्ही गरीब वा अस्पृश्य का आहोत, तर हे पूर्वजन्मीचे संचित किंवा विधिलिखित अथवा दैवात-नशिबात होते म्हणून आम्ही अस्पृश्य, ही कल्पना अणूरेणूत भिनलेली. दैवावर हवाला ठेवून निमूटपणे सहन करणे, एवढेच त्यांच्या हातात. बंडाचा विचारसुद्धा मनाला शिवणार नाही. हा सखोल विचार करून, बाबासाहेबांनी ईश्वर, आत्मा आणि पुनर्जन्म नाकारणारा बुद्ध स्वीकारला. त्या वेळी भारतात अनेक धर्मापैकी बौद्धही एक धर्म आहे, अशीच कल्पना रूढ झाली होती. मात्र ईश्वराचे अस्तित्व नाकारणारा बुद्धविचार हा धर्म कसा काय असू शकतो, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी धर्माऐवजी धम्म असा शब्द वापरला. धम्माला ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म मान्य नाही, तर मग आंबेडकरी अनुयायी हातात, दंडात, गळ्यात कसले गंडेदोरे घालतात, हा प्रश्न आहे. तर धम्माच्या स्वीकारानंतरही त्यांची धार्मिकतेवर किंवा जुन्या रूढी-परंपरांवर पोसलेली मानसिकता बदललेली नाही, हेच त्याचे द्योतक आहे. २२ प्रतिज्ञा अभियानचे अरविंद सोनटक्के किंवा त्यांच्यासारख्या काही डोळस अनुयायांना त्याविरोधात हातात २२ प्रतिज्ञांचा फलक घेऊन चळवळ करावी लागत आहे, ती याच मानसिकतेशी लढण्यासाठी. अर्थात याला राजकीय नेतृत्वही तेवढेच जबाबदार आहे. आता अलीकडे तर दलित वस्त्यांमध्ये निळ्या दहीहंडी फुटू लागल्या आहेत, निळ्या आराशीचे गणपती बसू लागले आहेत. दलितांसाठीच्या आरक्षणामुळे शिक्षण घेऊन सरकारी नोकऱ्या करणाऱ्या वा निवृत्त झालेल्या सधन वर्गापैकी काहींना तर शिर्डी, तिरुपती किंवा अष्टविनायकाच्या दर्शनाला जाणे प्रतिष्ठेचे वाटू लागले आहे. धर्माधिष्ठित सामाजिक विषमता दूर व्हावी व दलित समाज अंधश्रद्धेतून मुक्त व्हावा, यासाठीच बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा विचार दिला. परंतु आजचे चित्र फारच विदारक आणि चिंताजनक आहे. बुद्धानंतर त्यांच्याच अनुयायांनी भ्रष्ट आचरण करून त्यांचा पराभव केला. आंबेडकरी अनुयायीही अजूनही धर्माच्याच वाटेने जात आहेत. त्यातच धम्माच्या म्हणजे पर्यायाने आंबेडकरांच्या पराभवाचाही धोका आहे.