मुहम्मद शकील औज

‘असल्या विद्वानांची समाजाला गरज नाही’ हे पाकिस्तानात झटपट ठरवून टाकले जाते आणि तितक्याच चटकन त्याची अंमलबजावणीसुद्धा होते, हेच गुरुवारी प्राध्यापक डॉ. मुहम्मद शकील औज यांच्या हत्येमुळे दिसून आले.

‘असल्या विद्वानांची समाजाला गरज नाही’ हे पाकिस्तानात झटपट ठरवून टाकले जाते आणि तितक्याच चटकन त्याची अंमलबजावणीसुद्धा होते, हेच गुरुवारी प्राध्यापक डॉ. मुहम्मद शकील औज यांच्या हत्येमुळे दिसून आले. कराची विद्यापीठाच्या इस्लाम अभ्यास विभागाचे ते अधिष्ठाता. गेली १४ वर्षे याच विभागात त्यांनी अध्यापन केले, इस्लामच्या सद्य स्वरूपाविषयी १५ पुस्तके लिहिली, ७७ शोधनिबंध आणि ६९ संकीर्ण लेख लिहिले. आपल्या या पांडित्याला चिकित्सक वृत्तीची जोड आहेच, हेही त्यांनी वारंवार सिद्ध केले आणि या चिकित्सक वृत्तीनेच अखेर त्यांचा बळी घेतला.
याच कराची विद्यापीठातील एक इस्लामी विद्वान ‘महिलांनी नेलपॉलिश अथवा लिपस्टिक लावून नमाज पढू नये’ यासारखे फतवे काढत होता, ते कसे अविचारीच आहेत याविषयी डॉ. औज यांनी रान उठवले होते. हे त्यांच्या हत्येचे तात्कालिक कारण असावे, असे मानण्यास जागा आहे. हाच वाद सुरू असताना, ‘माझ्या जिवास धोका आहे’ असे विद्यापीठाच्या कुलगुरूंना डॉ. औज यांनी कळविले होते. मात्र, ‘आमचे ते धर्मशास्त्रच.. त्याची चिकित्सा स्वबुद्धीने होऊच शकणार नाही’ असे मानणाऱ्या कट्टर धर्माभिमान्यांना यापूर्वीही डॉ. औज यांनी दुखावले होतेच. त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषयही, मूळ अरबी कुराणाची आठ विविध उर्दू भाषांतरे कसकशी निरनिराळी आहेत आणि यातून आपण आजच्या समाजाविषयी काय निष्कर्ष काढणार, हे तपासून पाहणारा होता. त्यानंतरही संधी मिळेल तेथे हे चिकित्सक विचार मांडण्याचे धाडस डॉ. औज दाखवत राहिले. त्यासाठी कोणतेही निमंत्रण ते स्वीकारत. अगदी एखाद्या चित्रवाणी वाहिनीवर रमजानच्या पहाटेची प्रवचनेही द्यायला जात.. पण धर्मावर अंधविश्वास ठेवा, असे त्यांनी कधीही म्हटले नाही. आजच्या समाजघडीला मागे नेण्याचे काम धर्म करत नसतो, हे नेमस्त सुधारणावादी मत त्यांनी अनेकदा मांडले. साधनशुचिता हा अशा नेमस्तांचा गुणही डॉ. औज यांनी जपला होता. स्वत:कडे   पीएच.डी. व एम.फिल.चे २१ विद्यार्थी असूनही त्यांनी, डॉ. नूर या अन्य प्राध्यापकाच्या संशोधनचौर्याचे प्रकरण धसाला लावण्यात अन्य चौघा प्राध्यापकांचे नेतृत्व केले होते. त्या डॉ. नूर यांना नोकरीस मुकावे लागले; परंतु विद्यापीठाची प्रतिष्ठा जपली गेली.
ते मूळचेच कराचीचे. जन्म १९६० सालचा आणि कराची विद्यापीठातूनच बीए (१९८३), पत्रकारितेत एमए (१९९०), पुढे एलएल.बी. (१९९२) आणि मग इस्लामिक स्टडीजमध्ये एमए (१९८६) आणि पीएच.डी. (२०००) अशा पदव्या त्यांनी मिळवल्या. यापैकी इस्लाम अभ्यास शाखेच्या एमए परीक्षेत ते पहिले आले होते. तेथपासून सुरू झालेला चिकित्सेचा प्रवास अवघ्या तीन पिस्तूल गोळ्यांनी संपवला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dean of islamic studies faculty at the university of karachi prof dr muhammad shakil auj shot dead