‘रेल्वे हाट’, आंतररष्ट्रीय व्यापारमेळा, जागतिक पुस्तक मेळावा, ‘बाल संगम’, गालिब महोत्सव,  ‘गार्डन फेस्टिव्हल’.. गारठवणाऱ्या थंडीत दिल्लीकरांना नोव्हेंबर ते मार्चदरम्यान होणाऱ्या यासारख्या कितीतरी सांस्कृतिक कार्यक्रमांमधून ऊब मिळते. दिल्लीचे सांस्कृतिक दोहन करणाऱ्या या कार्यक्रमांमधून भाषिक सेतू बांधला जातो.  मात्र, दिल्लीकर मराठी माणसाच्या जीवनात मऱ्हाटमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेली सायंकाळ  अत्यंत कमी वेळा येत असते.
दिल्ली म्हणजे कट-कारस्थाने, भ्रष्टाचार, बलात्कार, सत्तेची मग्रुरी. मराठी नेत्यांना सापत्न वागणूक. उत्तर भारतीयांचे वर्चस्व. लाही-लाही करणारं ऊन ते हाडांत शिरणारी थंडी. अधूनमधून भौगोलिक तर बहुधा राजकीय भूकंप. पंजाबी संस्कृतीचा प्रभाव तर इस्लामी संस्कृतीच्या खाणाखुणा. अशा बहुविध वैशिष्टय़ांनी दिल्ली निर्माण झाली, वाढली, विस्तारली. असं म्हणतात की, दिल्ली नऊ वेळा लुटली गेली तर दहादा वसवली गेली. त्याबरोबर दिल्लीची सांस्कृतिक ओळखही बदलली. सत्ताकारण म्हटलं म्हणजे डावपेच, कुरघोडी, राजकीय महत्त्वाकांक्षा व त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची वृत्ती, मदांधता येणारच. या साऱ्याभोवती दिल्लीकरांचं जीवन एकवटलेलं आहे. परंतु यापलीकडेही दिल्लीची ओळख आहे. दिल्लीला कलात्मक बाज आहे. उर्दूप्रचुर भाषेचा लहजा आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.
मागील आठवडय़ात राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयाने आयोजित केलेल्या ‘रेल्वे हाट’मध्ये तर नुसती धम्माल होती. रेल्वेच्या माहितीबरोबरच खाऊगल्ली, कठपुतळीचा खेळ, व्यंगचित्र स्पर्धा, शिवाय फुग्यांनी रेल्वेगाडी तयार करण्याची स्पर्धा, असे कल्पक उपक्रम असल्याने आबालवृद्धांनी हिरिरीने भाग घेतला. उत्तर रेल्वेचे मुख्यालय असलेल्या बडोदा हाऊसमध्ये जानेवारीत पुन्हा रेल्वे मेळावा होईल. इंडिया गेटसमोरच्या या बडोदेप्रासादाच्या एकरभर परिसरात चार डब्यांच्या मॉडेल रेल्वेगाडीत पाच मिनिटांचा प्रवास करता येतो. सोबत उत्तर रेल्वेच्या कार्यकक्षेत येणाऱ्या राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे सोने पे सुहागा. रेल्वे व भारतीयांचं काय नातं आहे, हे प्रत्यक्ष अनुभवण्याचं ठिकाण म्हणजे हा रेल्वे मेळावा.
दिल्लीतील प्रगती मैदान हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. सध्या येथे आंतरराष्ट्रीय व्यापारमेळा सुरू आहे. प्रगती मैदानावर सुरू असलेल्या या मेळाव्यात फिरायला किमान तीन ते चार दिवस लागतात. विविध राज्यांचे स्टॉल, वेगवेगळ्या देशांची उत्पादने, त्याखेरीज विविध देशांच्या खानपानासह अनेक वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी असतात. या मेळाव्याला केवळ व्यावसायिक स्वरूप नसून त्यातून निर्माण होणारा सांस्कृतिक अनुबंध जास्त महत्त्वाचा आहे. सलग ३३ वर्षांची परंपरा असलेल्या या मेळाव्यात यंदा पहिला दिवस ‘महाराष्ट्र दिवस’ म्हणून साजरा केला गेला. या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातून मोठय़ा प्रमाणावर काही दिवसांसाठी का होईना रोजगार निर्माण होतो. स्टॉल उभे राहण्यासाठी विक्री व्यवस्थापकाची गरज असते. अडीच हजारांपासून पाच हजार रुपये रोज युवकांना दिला जातो. हजारो विद्यार्थी व्यापार मेळाव्याच्या निमित्ताने आपला पॉकेटमनी जमवतात. यंदा मात्र मंदीचे सावट जाणवण्याइतपत गडद आहे. गतवर्षी २५ देशांचे ४५० उद्योजक व्यापार मेळाव्यात सहभागी झाले होते. या वर्षी २१ देशांतून २५० उद्योजकांनी सहभाग नोंदविला आहे.
सद्यस्थितीत साहित्य, संस्कृती, कलेच्या प्रसारासाठी लोकजागृती करण्याची गरज आहे. अशा संवर्धनासाठी केवळ फिरत्या वाचनालयाचा उपक्रम पुरेसा नसतो. नव्या पिढीला भाषेचे ‘कॉपरेरेट संवर्धन’ अपेक्षित आहे. तसाच एक प्रयोग गेल्या ४१ वर्षांपासून नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळावा या नावाने केला जातो. नॅशनल बुक ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या या मेळाव्यात भारतीयच नव्हे तर जगभरातील जवळजवळ सर्वच भाषांमधील साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होते. पुस्तकप्रेमी या मेळाव्याची आतुरतेने वाट पाहात असतात. महाराष्ट्र शासनानेदेखील असाच एक चांगला उपक्रम मागील वर्षांपासून सुरू केला आहे. मोजक्याच संख्येने सहभागी होणारे प्रकाशक व तोडक्या संख्येने येणारे मराठी बांधव, ही संख्यात्मक बाब वगळता हा उपक्रम चांगला आहे. दिल्लीत विखुरलेल्या मराठी बांधवांना आत्मीयता वाटेल असा एकही उपक्रम राज्य सरकार राबवत नाही. सार्वजनिक उत्सव समितीच्या माध्यमातून मराठी नाटक, चित्रपट, गणेशोत्सव साजरा केला जातो. वनिता समाजामुळेही मराठी माणसाची सांस्कृतिक गरज काही अंशी पूर्ण होते, पण सरकारदरबारी आनंदच आहे. जे कार्यक्रम होतात ते इतर भाषिक प्रांतांच्या कार्यक्रमांसमोर अत्यंत थिटे वाटतात.
‘उत्तर भारतीय व बिहारचे नागरिक म्हणजे मुंबईची जागतिक समस्या’, असा प्रतिवाद करणाऱ्यांनी बोध घ्यावा असा उपक्रम बिहार सरकार दर दोन महिन्यांनी दिल्लीत आयोजित करते. दिल्लीच्या चारही बाजूंच्या सीमेवर मोठय़ा प्रमाणावर उत्तर भारतातील मैथिली व भोजपुरी भाषा बोलणारे बहुसंख्येने पसरलेले आहेत. त्यांच्यासाठी बिहार सरकारने मैथिली भोजपुरी अकादमी स्थापन केली आहे. त्यातून मैथिली व भोजपुरी भाषेतील नाटक, लोककला, संगीत, कविता संमेलन आयोजित केले जाते. याशिवाय मैलोरंग ही मैथिली भाषेच्या प्रचारासाठी काम करणारी नाटय़ टोली अनेक कार्यक्रम आयोजित करते. ‘सान्निध्या बॅण्ड’ या नावाने भोजपुरी लोकसंगीताच्या अर्वाचीनीकरणासाठी अनेक युवक  झटत असतात. दिल्लीत महाराष्ट्राची नाटय़ संस्कृती जोपासली आहे ती हिंदी भाषकांनी. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या हिंदूी अनुवादित नाटकांवर तीन-तीन दिवस नाटय़ महोत्सव राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात (एनएसडी) आयोजित केले जातात. मात्र सखेद आश्चर्य असे की, एनएसडीच्या संचालकपदावर मराठी माणूस विराजमान असतानादेखील यंदा १४ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या ‘बाल संगम’ या बालकलाकारांच्या कला महोत्सवात एकही मराठी संघ सहभागी झाला नाही. वामन केंद्रे एनएसडीच्या कार्यक्रमांना आकार देताहेत, त्यांचा सहभाग म्हणजे येथील प्रशासनाच्या चौकटीतले वेगळेपण आहे, हे खरे. परंतु एनएसडीचे एक केंद्र नागपूरला असतानाही बाल संगममध्ये मराठी संघाची एकही प्रवेशिका न येणे याला मराठी सांस्कृतिक  संवर्धन करणाऱ्या संघटनांकडे उत्तर नाही.
कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, झारखंड, काश्मीर, उत्तराखंड राज्येही आपापले वेगळेपण जपतात. उत्तराखंडचा माणूस तर तुम्हाला दिल्लीच्या कोणत्याही कोपऱ्यात भेटेल. ८० टक्केमराठी खासदारांकडे किमान एक तरी उत्तराखंडचा माणूस सापडतोच सापडतो. त्यांचाही सांस्कृतिक अनुबंध अत्यंत घट्ट आहे.
मराठी माणूस दिल्लीभर विखुरला असल्याने त्याला भौगोलिकदृष्टय़ा एकत्र आणणे अवघड आहे, हा दावा सारे जण करतात. पण २००५ मध्ये तालकटोरा स्टेडियममध्ये गीतरामायण सुवर्ण महोत्सव       समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पाच हजार मराठी रसिक उपस्थित होते. ज्या दिवशी दिल्लीत रस्त्यांवर शुकशुकाट असतो अशा १५ ऑगस्टला हा कार्यक्रम झाला होता. त्यामुळे मराठी माणसाला एकत्र आणणे अवघड असले तरी अशक्य मात्र नाही. अर्थात इच्छाशक्ती हवी.
दिल्ली म्हटले आणि शेरोशायरीचे कार्यक्रम नाहीत असे होणार नाही. जुन्या दिल्लीत गालिबच्या हवेलीजवळ डिसेंबरमध्ये होणारा गालिब महोत्सव म्हणजे दर्दी रसिकांना पर्वणीच. कवी गुलजार या ठिकाणी दरवर्षी आवर्जून हजेरी लावतात. एखादी नज्म पेश करतात. सलाम-दुआ घेतात, देतात. गुलजारांना प्रत्यक्ष बघणं, ऐकणं म्हणजे श्रवण उत्सवच. त्यात हळूच गुलजार विचारतात, ‘वादा किया था फिर मिलेंगे, मैं पूछने आया हूँ के कहीं भूले तो नहीं!’ गुलजारांना कोणत्याही शहरात ऐकता येऊ शकते, पण पुराण्या दिल्लीच्या अरुंद गल्लीबोळात, जिथे भणंगावस्थेत गालिब वावरले त्या परिसरात गुलजारांचे जणू अत्तराच्या खुशबूमध्ये बुडवलेले अल्फाज ऐकणं हा एक अमृतानुभव आहे. हा अनुभव गालिबच्या बल्लिमारनच्या त्या हवेलीसमोरच घेता येतो. गालिब यांनी अखेरचा श्वास घेतला, तो इथंच.     
नोव्हेंबरपासून दिल्ली बहुरंगी होते. वेगवेगळ्या फुलांनी बहरलेले रस्ते, विस्तीर्ण झाडांवर बागडणारे पक्षी, नॉर्थ अ‍ॅव्हेन्यू, अकबर रोडवर आपल्याच मस्तीत फिरणारी माकडं. हे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे रस्ते जिथं आहेत, त्या ल्यूटन्स झोनमध्ये, इंडिया गेटच्या परिसरात पसरलेली विस्तीर्ण हिरवळ म्हणजे पर्यटकांची मांदियाळीच. मंद झुळूक वगैरे हा प्रकार दिल्लीत फारसा अनुभवायला मिळत नाही. घामांनी निथळलेले असताना आलेल्या गरम हवेच्या लाटेमुळे जाणवला तर गारवा नाही तर थंडीच्या दिवसांत गारठून टाकणारा गार वारा, असे दोनच हंगाम दिल्लीत येऊ शकतात. अशाही परिस्थितीत ल्युटन्स झोनपासून दूरवर दक्षिण दिल्लीत असलेल्या व ज्ञानेंद्रियांना सुखावून टाकणाऱ्या ‘गार्डन ऑफ फाइव्ह सेन्सेस’ने आपले वेगळेपण जपले आहे. दरवर्षी येथे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गार्डन फेस्टिव्हल होतो. ज्ञानेंद्रियांना सुखावून टाकणारा ‘गार्डन फेस्टिव्हल’ म्हणजे दृष्टीचा उत्सव असतो.
गारठवणाऱ्या थंडीत दिल्लीकरांना नोव्हेंबर ते मार्चदरम्यान होणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून ऊब मिळते. दिल्लीचे सांस्कृतिक दोहन करणाऱ्या या कार्यक्रमांमधून भाषिक सेतू बांधला जातो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात दिल्लीकर मराठी माणसाच्या जीवनात मऱ्हाटमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेली सायंकाळ अत्यंत कमी वेळा येते. मराठी खासदार नेत्यांना तर अधिवेशन काळातही घरी जायची घाई होते. १९८३ साली ना. धों. महानोरांची काव्य मैफल यशवंतरावांच्या घरी रंगली होती. त्याच वर्षी झालेल्या खासदारांच्या संगीत मैफलीत वसंत साठे यांनी पोवाडा सादर केला होता. पंतप्रधान इंदिरा गांधी त्या कार्यक्रमात दोन तास उपस्थित राहिल्याची आठवण वसंत साठे कितीदा तरी सांगायचे. हल्ली खासदारांचे असे कार्यक्रम होतच नाहीत. परंतु अद्यापही अन्यत्र, दिल्लीकर मऱ्हाटी माणसाला राजकारणापलीकडची राजधानी सामावून घेते. त्याच्याशी भावनिक बंध निर्माण करते. पुढले काही महिने हा बंध वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने अजूनच घट्ट होत जाईल.