‘हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे’ हे स्फूर्तिगीत लिहिताना ग. दि. माडगूळकर यांच्यासारख्या द्रष्टय़ा कविश्रेष्ठासमोर आजचा आपला थोर भारतदेशच असावा, याबद्दल आम्हांस अणुमात्र शंका नाही. भवताली केवळ एक कटाक्ष टाकला, तरी कोणासही हे पटेल की हे राष्ट्र खरोखरच देवतांचे आहे आणि येथे गल्लोगल्ली प्रेषित आहेत! आता आम्ही अद्याप ‘आरटीआय’ टाकलेली नसल्याने त्यांचा नेमका आकडा आम्हांस माहीत नाही, परंतु एका अंदाजानुसार तो नक्कीच ३६ कोटी असेल. ही संख्या अर्थातच किरकोळातील किरकोळ गावपीर आणि नगरदैवते वगरे धरून झाली. झेडसुरक्षाधारी, सत्तासिंहासनारूढ, लालबत्तीमंडित अशा थोर जागृत देवतांची संख्या मात्र अगदीच कमी आहे आणि ते स्वाभाविकच आहे. सगळेच भारतभाग्यविधाते कसे असणार? आणि म्हणूनच या मोजक्या जागृत देवतांचा सुयोग्य मानमरातब ठेवणे, हे एका लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. याचा अर्थ आपण त्यात कसूर करतो असे नाही. नाना राजकीय पक्षांतील आमचे बंधू-भगिनी सदासर्वदा योग तुझा घडावा म्हणून त्यांस येताजाता शिरसाष्टांग लोटांगणे घालीतच असतात, हे का आम्हांस माहीत नाही? आमचे म्हणणे एकच आहे की अजूनही आपण आपल्या थोर लोकशाहीतील या जनगणमन अधिनायकांसाठी खूप काही करणे लागतो आहोत. त्यांस वास्तव्यासाठी उत्तमोत्तम प्रासाद दिले, प्रवासाकरिता पुष्पक विमानादी वाहने दिली, त्यांस पळाचाही विलंब होऊ नये म्हणून ते जातील ते मार्ग जनसामान्यांसाठी बंद केले, त्यांस फलपुष्पपत्रतोय म्हणून मुबलक मानधन आणिक भत्ते दिले, म्हणजे आपले कर्तव्य संपत नाही. वस्तुत त्यांच्या पदकमलांवर बारशापासूनच सर्व आलिशान सुविधा अर्पण करणे आवश्यक आहे. परंतु गांधी, ठाकरे यांसारख्या काही महान घराण्यांचा अपवाद वगळला, तर अशी दैवते कधी आणि कोठे टँहा करतात याचे गुह्य़ज्ञान आपणांस नसल्याने ते शक्य नाही. पण बारशाचा नाही, तर निदान त्यांचा महानिर्वाण सोहळा तरी आपल्या हातात असतो, त्याचे काय? गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे हस्तिनापुरातील  (पक्षी : दिल्ली) सर्व घाट ‘जामपॅक’ झाल्यापासून केंद्र सरकारप्रमाणेच आमच्याही मनी हीच चिंता होती, की या पुढील महामहिमांचे काय? त्यांचे अंत्यविधी काय सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे करणार? एक तर मुळात अनेक सामान्यांचे जगणे आणि मरणे यात तसा काही फरक नसतो. त्यामुळे त्यांच्या जगण्याचे सोयर आणि मरणाचे सुतक पाळण्यात तसे काहीही हशील नसते. जॉर्जऑर्वेली भाषेत सांगावयाचे, तर लोकशाहीत सारेच मरतात, परंतु काही जण अधिक मरतात! तेव्हा हे सत्ताधीश जे ईश सर्व गुणांचे असतात, त्यांचा अंत्यविधी कसा प्रेक्षणीय व स्मरणीयच झाला पाहिजे! त्यासाठी स्वतंत्र घाट पाहिजे. मग तेथे त्यांचे स्मृतिस्थल स्थापन झालेच पाहिजे. त्यात किमान पाच-पन्नास कोटींचा खुर्दा झालाच पाहिजे. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचे पोिशदे मात्र अमरच झाले पाहिजेत! सुदैवाने या गोष्टीची जाणीव आपल्या प्रिय केंद्र सरकारास झाली होती. दिल्लीमध्ये यमुनातीरी अतिविशेष राजकीय व्यक्तींसाठी स्वतंत्र घाटाची व्यवस्था करण्याचा प्रस्तावही गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर आला. परंतु कळविण्यास अत्यंत दुख होत आहे, की तो प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. पण याचा अर्थ असा नाही, की तो कधी मंजूर होणारच नाही. ते काहीही असो. हा प्रस्ताव ज्यांनी कोणी आणला त्यांना आमचा सलाम!

Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया
lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
political parties candidates celebrated rang panchami
रंग जल्लोष रामाचा अन् प्रणितीचा..
rupali chakankar jitendra awhad
“रुपाली चाकणकरांच्या बुद्धीची कीव येते”, सुप्रिया सुळेंवरील ‘त्या’ टीकेला आव्हाडांचं उत्तर; म्हणाले, “बुरसटलेले विचार…”