पहिल्या महायुद्धाच्या वातावरणामध्ये जन्मलेल्या ‘टारझन’ या एडगर राइस बरोज यांच्या साहित्यपुत्राच्या प्रकाशनाचे यंदाचे शताब्दी वर्ष आहे. पंचविसाहून अधिक रिमेक, कॉमिक्स, चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका, कैक साहित्यकृतींची प्रेरणा आणि पोर्न उद्योगातील रूपांतरे यांनी शतकवयीन असूनही सगळ्याच पिढय़ांनी टारझनला मदमस्त शरीरयष्टी, अचाट बचाव कौशल्य आणि अफाट ताकदीचे प्रतीक म्हणून पाहिले. या वर्णनांतील टारझनला हॉलीवुडी रूपांतरातून पहिल्यांदा साजेसा चेहरा देणारा अभिनेता डेनी मिलर यांचे टारझन पुस्तकाचे शताब्दी वर्ष सुरू असतानाच नुकतेच निधन झाले.
जन्मापासून जंगलात वास्तव्य करणाऱ्या टारझनचे पात्र अतिशय बळकट शरीरयष्टीचे, गोरेपान आणि देखणे होते. बरोज यांच्या वर्णनाबरहुकूम पडद्यावरचा रांगडा नायक तयार करणे अनेक वर्षे हॉलीवूडला जमले नव्हते. या व्यक्तिरेखेच्या वाढत गेलेल्या लोकप्रियतेने टारझन या नामोच्चारणातच अजस्र शक्ती मनात प्रगट होत असे. हॉलीवूडचा शोध संपला तो एका टॅलंट एजंटने कॅलिफोर्नियातच, लॉस एंजलिस विद्यापीठामध्ये डेनी मिलर यांना पाहिले तेव्हा. डोळ्यात भरावी अशी शरीरयष्टी आणि तब्बल साडेसहा फूट उंचीच्या या नरपुंगवाला तेथे काम करीत असतानाच चित्रपटासाठी आर्जवे करण्यात आली. अभिनयाची काडीचीही ओळख नाही, चित्रपट क्षेत्राशी अंमळही संबंध नाही, असे असतानाही डेनी मिलर यांनी टारझन बनण्याचे स्वीकारले आणि ‘टारझन अॅण्ड एपमॅन’द्वारे सिनेमाचा मोठा पडदा या विशालकाय देहाला टारझन म्हणून ओळखू लागला. जंगलातील, मानवरहित जगात जगणाऱ्या टारझनला देह, शक्ती यांचे पुरेपूर प्रदर्शन करण्याची मुभा होती. नसलेल्याच अभिनयाला सुधारण्याइतपत वेळही त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे एमजीएमने केलेल्या सात वर्षांच्या करारानंतर, कधीकाळी बास्केटबॉल प्रशिक्षक होण्याचे मनसुबे आखणाऱ्या या अभिनेत्याने अभिनयाची बाराखडी काम करता करताच गिरविली आणि पुढे अनेक चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये हा टारझनी देह लोकप्रिय अभिनेत्याच्या रूपात दिसू लागला. आपल्या महाकाय शरीराद्वारे हॉलीवूड गाजवून सोडण्याची गुरुकिल्लीच त्यांना मिळाली.
‘वॅगन ट्रेन’, ‘गिलिगन आयलण्ड’, ‘रॉकफोर्ड फाइल्स’, ‘डलास’ आणि पीटर सेलरच्या ‘पार्टी’ आदी चित्रपट, मालिकांमधील त्यांची अभिनय उपस्थिती ही ‘डोळ्यात भरणे’ वाक्प्रचाराला विस्तारात स्पष्ट करणारी होती. गेल्या काही वर्षांमध्ये अलिप्त जीवन जगणाऱ्या मिलर यांना गेल्या वर्षभरापासून आजाराने ग्रासले होते. ८० व्या वर्षी त्यांचा जीवनलढा संपुष्टात आला. टारझन हे पात्र पुढल्या शतकापर्यंतही जिवंत राहील आणि पडद्याला पहिल्यांदा टारझन दाखविणाऱ्या डेनी मिलर यांच्या चित्रस्मृतीही.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2014 रोजी प्रकाशित
डेनी मिलर
पहिल्या महायुद्धाच्या वातावरणामध्ये जन्मलेल्या ‘टारझन’ या एडगर राइस बरोज यांच्या साहित्यपुत्राच्या प्रकाशनाचे यंदाचे शताब्दी वर्ष आहे.

First published on: 17-09-2014 at 12:42 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Denny miller