स्वत:शी अप्रामाणिक राहून मला लिहिता येत नाही, ते जमणारही नाही. रशियन राज्यक्रांतीची शताब्दी ७ नोव्हेंबरला झाली. या क्रांतीतून यूएसएसआर म्हणजे पूर्वाश्रमीचा सोव्हिएत रशिया जन्माला आला. त्यानंतर ७० वर्षांनी सोव्हिएत रशियाने प्राण सोडले व त्याचे विघटन झाले. जगात अमर्त्य कुणीच नसते म्हणा. यात साम्यवादाचा प्रयोग अपयशी ठरला हाच केवळ एक प्रश्न नाही, कारण कुठल्याही गोष्टीतील यशानेच तिचे मूल्यमापन करणे अन्यायाचे असते. या क्रांतीमागचे नकोसे वाटणारे कुरूप सत्य हा खरा प्रश्न आहे. त्या क्रांतीनंतर हा देश कसा वाढला, कसा जगला यावरून त्या क्रांतीचे मूल्यमापन करायला हवे असे मला वाटते.

ज्यातून ‘फ्रँकस्टीन’सारखा राक्षसच निर्माण झाला, ती क्रांती आपण कशी साजरी करतो, हा प्रश्न मला पडला. १९१७ ते १९२१ दरम्यानचा घटनाक्रम बघितला, तर अगदी लेनिनसह अनेकांचे आपण दैवतीकरण का करतो.. आपण शेतकरी व कामगारांचा विजय कसा साजरा करू शकतो.. मी हे म्हणण्याचे कारण असे, की या क्रांतीनंतर जो सोव्हिएत रशिया म्हणजे एकसंध रशिया जन्माला आला, त्या देशात शेतकरी व कामगारांची हत्याकांडे झालीत याची आपल्याला माहिती आहे किंवा असायला हवी. ‘सोल्झेनित्सिन’ वाचल्यानंतर या क्रांतीनंतर पर्यायी लोकशाही दिली गेली, असा दावा गांभीर्याने घेता येईल का.. या क्रांतीनंतर वसाहतवादविरोधी विजय साजरे करण्यात आले; पण पूर्व युरोपात सोव्हिएत रशियाच्या वसाहतींचा विचार केला तर आपणास असे विजय साजरे करण्याचा अधिकार तरी काय, या प्रश्नाला आपण काय उत्तर देणार आहोत? तत्कालीन रशियाच्या आर्थिक प्रारूपाचा आदर्श तरी कसा घ्यावा? कारण त्यात नोकरशाहीने दुर्दशा केली व विकासाचे पश्चिमी प्रारूप त्या वेळी राबवताना त्यामुळे रशियातील समाजाचे काय भले झाले होते, असाही प्रश्न आहे.

model code of conduct for general elections by central election commission
पहिली बाजू : आचारसंहिता : रोखठोक तरीही मानवी!
loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

सोव्हिएत रशियाच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेल्या रशियन राज्यक्रांतीचा उत्सव वगैरे साजरा करावा असे त्यातील काही अपवादात्मक तत्त्वे वगळता मला वाटत नाही. निदान मी तरी सोव्हिएत साम्यवादाचा भाबडा प्रशंसक बनून त्याचा विजयी डंका पिटायला तयार नाही. रशियात १९१७ मध्ये राज्यक्रांती झाली, त्यात सगळेच वाईट होते, असे मी म्हणणार नाही. त्यातील काही गोष्टी निश्चितच साजऱ्या करण्यालायक होत्या. त्यात क्रांतीची कल्पना हीच महत्त्वाची होती. ही क्रांती कशी उलगडत गेली हा भाग अलाहिदा; पण रशियन राज्यक्रांतीने क्रांतीची कल्पना यशस्वी केली, माणसेच त्यांची नियती यापुढे घडवतील हे दाखवून दिले. रशियन राज्यक्रांतीची शताब्दी ही त्यातील प्रेरणा व विसाव्या शतकाला नवा आकार देण्याची त्या क्रांतीतील ताकद या दृष्टीने साजरी करावी अशी घटना आहे. विसाव्या शतकाचा इतिहास पाहिला, तर या क्रांतीतील काही वेगळी वैशिष्टय़े सामोरी येतात.

आश्चर्याची बाब म्हणजे क्रांतीची कल्पना ही मूळ राजकारणातली नाही, तर भौतिकशास्त्रातील आहे. अठराव्या शतकात पृथ्वीच्या अक्षाभोवती फिरण्याच्या संकल्पनेपासून (रेव्होल्यूशन ऑफ अर्थ ऑन इट्स अ‍ॅक्सिस) ते माणसाच्या विशिष्ट सामूहिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या क्रांतीपर्यंत, असे क्रांतीच्या संकल्पनेत स्थित्यंतर झाले. १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली, तेव्हा क्रांतीची नवी संकल्पना पुढे आली. त्यात चार कल्पनांचा समुच्चय होता. कुठलीही सामाजिक-आर्थिक व्यवस्था कायम तशीच राहू शकत नाही. ती बदलू शकते किंवा बदलली पाहिजे, त्याचे मूलभूत मार्ग बदलले पाहिजेत किंवा बदलू शकतात. जुनी व्यवस्था एक दिवस कोसळते, नव्या व्यवस्थेसाठी कोरी पाटी तयार करणे आवश्यक असते; पण असे बदल आपोआप घडत नसतात. माणसांच्या माध्यमातूनच हे बदल घडवावे लागतात. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर माणसे गोळा करावी लागतात व सामूहिक कृती करावी लागते. या बदलासाठी काही तरी हिंसक कृती करून सत्ताकेंद्र ताब्यात घ्यावे लागते; पण यात एक गोष्ट अशी, की प्रत्येक माणूस बदल घडवण्यासाठी बंडखोरीचे रूप धारण करू शकतोच असे नाही. त्यासाठी बिनीचे शिलेदार लागतात. कामगारवर्ग, सामान्य जनता पाठीशी असावी लागते. त्यांना एखाद्या क्रांतिकारी राजकीय पक्षाचे नेतृत्व लाभावे लागते.

रशियन राज्यक्रांतीत खऱ्या क्रांतीची ही सगळी तत्त्वे भरलेली होती. अठरावे शतक व एकोणिसाव्या शतकातील युरोपातून ती विकसित झाली होती. विसाव्या शतकातील रशियन, क्युबन, व्हिएतनामी, कंबोडियन क्रांतीचा वास्तव जीवनानुभव सतत बदलत्या स्वरूपाचा होता. या क्रांतींच्या भिंगातून पाहताना आपण फ्रेंच राज्यक्रांतीबाबत काही धडे शिकू शकतो. क्रांतिकारक स्थित्यंतरात कुठलाही बदल एकमितीय नसतो. मार्क्‍सवादी तत्त्वज्ञानाप्रमाणे विचार करता क्रांतिकारी स्थित्यंतराचा हेतू हा आर्थिक पातळीवरील बदल हा असतो. विसाव्या शतकात यामध्ये अधिक व्यापकता आली. त्यानुसार राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक बदलही यात आवश्यक मानले जाऊ लागले. जयप्रकाश नारायण यांनी या सर्वव्यापी उद्दिष्टांसाठी पेटून उठण्याच्या कृतीला ‘संपूर्ण क्रांती’ असे नाव दिले. ही संकल्पना मानवी जीवनाच्या सर्व अंगांना व्यापणारी होती.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे क्रांती ही संकल्पना म्हणजे काही तरी अचानक, नाटय़मय व उखडून टाकणारे.. हा समज चुकीचा आहे. कारण जगात अचानक काही घडत नसते. मूलभूत बदल हे एका रात्रीत होत नाहीत. कुठलाही टिकाऊ बदल हा टप्प्याटप्प्याने होतो. व्यवस्था चिऱ्याचिऱ्याने बदलावी लागते. त्यासाठी एकेक वीट नव्याने रचावी लागते.

तिसरे म्हणजे क्रांती हिंसकच असली पाहिजे हा अनुभव विसाव्या शतकाने खोटा ठरवला. क्रांतिकारी बदल सहजपणे घडवता येतात. क्रांतिकारकाला किंवा क्रांतिकारक विचारांना हितसंबंधीयांकडून विरोध होतच असतो. त्यातून संघर्ष होतोच, पण हा संघर्ष हिंसक बनला तर तो ज्यांच्या नावाने क्रांतीची प्रक्रिया सुरू असते, त्यांच्याविरोधातील संघर्ष असतो. कुठल्याही क्रांतीमागे एखादी संघटना, पक्ष, बिनीचे शिलेदार असलेच पाहिजेत हाही एक समजच आहे, कारण जेव्हा क्रांती एखाद्या पक्षाच्या मुठीत जाते तेव्हा तो विनाशाचा प्रारंभ असतो.

युरोप हाच जगातील क्रांतिकारी घटनांचा रंगमंच आहे, या समजापासून आपल्याला विसाव्या शतकाने दूर नेले. आधुनिक क्रांतीची संकल्पना युरोपने जगाला दिली; पण नंतर इतर ठिकाणीही त्याची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे युरोपात आधुनिक क्रांती जन्मली व नंतर इतर ठिकाणी त्याच्या आवृत्त्या निघाल्या. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणखी एक समज गळून पडला. युद्धोत्तर जगात युरोपमध्ये क्रांतीचे फारसे अस्तित्व दिसले नाही. आता आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका हे क्रांतीचे नवे रंगमंच आहेत. विसाव्या शतकातील क्रांतीच्या आवृत्त्यांनी ‘क्रांती’ या संकल्पनेवर काही वेगळी छाप टाकली का, असा प्रश्न आहे. माझ्या मते याचे उत्तर ‘होय’ असेच आहे. राजकीय विचारसरणीचा मुद्दा घटकाभर बाजूला ठेवला तर क्रांतीच्या संकल्पनेत मूळ गाभा कायम आहे. बदल शक्य आहे व तो आपण घडवू शकतो, ही मूलभूत संकल्पना रशियन राज्यक्रांतीने एकविसाव्या शतकाच्या हातात दिली. मग आता क्रांतीच्या या सुधारित संकल्पनेत आपले योगदान काय? तर माझ्या मते एकविसाव्या शतकात क्रांतीची संकल्पना तीन दिशांनी बदलता येईल. एक म्हणजे आपले गंतव्य स्थान किंवा विहित उद्दिष्टे आधीच ठरवण्याचा मोह टाळता येईल. क्रांतीची प्रक्रिया ही शोधाची असली पाहिजे, त्यातून उत्क्रांत होत आपल्याला कुठे जायचे आहे हे ठरवले पाहिजे. दुसरे म्हणजे क्रांती ही राजकारणावर अवलंबून असते असे समजले जाते. आता यापासून दूर जाण्याची गरज आहे, त्यामुळे राजकीय पक्ष व आधुनिक राज्यव्यवस्था ही क्रांतीची साधने आहेत, असे आग्रही मत आहे ते खोटे ठरवणारी परिस्थिती निर्माण करावी लागेल. यात आपण राजकारणाशिवाय बदल घडवून आणण्याची इतर साधने शोधली पाहिजेत; पण त्यासाठी आधी राजकारणही समजून घेतले पाहिजे.

शेवटचा मुद्दा म्हणजे क्रांतीची युरोपीय संकल्पना ही प्रामुख्याने बाह्य़ बदलांवर आधारित आहे. आपण माणसाला माणूस म्हणून महत्त्व दिले पाहिजे. प्रत्येक माणसाच्या मनात एक आंतरिक ‘स्व’ असतो. ते क्रांतीचे नवे मैदान ठरू शकते. त्याची मशागत करणे हा नवा मार्ग आहे. माझे हे विचार कदाचित मूलगामी, नेहमीच्या विचारांना छेद देणारे वाटतील, पण त्यालाच तर क्रांती म्हणतात. क्रांतीच्या संकल्पनेतील क्रांती हेच रशियन राज्यक्रांतीचे खरे संस्मरण ठरेल.

योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com