एका राज्याचे मुख्यमंत्री दूरचित्रवाणीवरील मुलाखतीत, आपल्याच देशातील काही नागरिकांना परके समजत असल्याच्या मनोभूमिकेतून बोलत राहतात. इशारे देतात. फेसबुकवर याबद्दल खेद आणि संताप व्यक्तकेला तर, बहुतेक उत्तरे ही मुद्दा नसलेली आणि शिवीगाळ करणारी असतात. ‘आपली संस्कृती सहिष्णूच’ असे शिव्या घालत, आक्रस्ताळी भाषेत सुनावण्यात अनेकांना धन्यता वाटते आणि आपणच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ऐकण्यात असे लोक बहुतेकदा तयार नसतात.. अशा द्वेषमूलकतेचा सामना करीत या देशाची धर्मनिरपेक्ष संस्कृती टिकवायची, तर या संस्कृतीची चिंता असलेल्यांनाच भाषा बदलावी लागेल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका महिन्यात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सोमवारी दुसऱ्यांदा आपल्याला सहिष्णुतेची जाणीव करून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात दादरी येथे अखलाख याची हत्या झाल्याबाबत दु:ख व्यक्त केले आहे. शिवाय, भाजपच्या वाचाळवीर नेत्यांच्या वक्तव्यांनंतर फुंकर घालण्याचा प्रयत्न म्हणून, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी अशा काही नेत्यांना बोलावून समजही दिली आहे. काही लोकांना असे वाटेल, सरकारने एवढे केले, मग आता काय हवे.. दादरीचा हा मुद्दा आता संपवून टाका. दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या वार्ता कक्षांतदेखील कदाचित एव्हाना, या घटनेवर अखेरचा पडदा टाकण्याचा विचार सुरू झाला असेल.
त्यामुळे असे होऊ शकते की, येत्या काही दिवसांत दादरीमध्ये अखलाख या मुस्लिमाची गाईचे मांस फ्रिजमध्ये ठेवल्याच्या संशयावरून जमावाने जी ठेचून हत्या केली, त्याचा पाठपुरावा करणाऱ्या बातम्या वृत्तपत्रांत यापुढे दिसणारही नाहीत. अखलाखच्या कुटुंबीयांना ‘सानुग्रह अनुदान’ या नावाखाली भरपाई मिळेल, साहित्य अकादमी पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांची यादीही आता पुढे वाढणार नाही. बाकी घटनांवरचे प्रसारमाध्यमांचे लक्ष विचलित होईल व बिहारचा निवडणूकज्वर उतरताच देशात क्रिकेटचा ज्वर चढेल. (म्हणजेच, तेव्हा देशभरातील दुष्काळ बातम्यांत राहणारही नाही). प्रसारमाध्यमांतून हद्दपार झालेला हा मुद्दा पुन्हा आपल्या अगदी गल्लीपर्यंत येईल, आपल्या मनात, डोक्यात भुंग्यासारखा रुंजी घालत राहील.

त्याने दादरीचे दु:ख संपणार नाही. हा प्रश्न लोकांच्या मनात किती खोलवर गेलेला आहे, त्याची जाणीव मला क्षणोक्षणी होते. माझ्या राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची मुलाखत वाचून मला इतके वाईट वाटले की, त्याच दिवशी मी फेसबुकवर प्रतिक्रिया लिहिली. खट्टर यांच्या मुलाखतीतील मते खरोखर त्यांची ‘मन की बात’ होती याचे वाईट वाटते. खट्टर मुसलमानांना चिथावण्यासाठी जाणूनबुजून नवीन काही करीत आहेत, असे नाही. त्यांना हे माहिती होते की, ते मुलाखत देत आहेत व त्यात काय भान ठेवायला हवे. मला त्यात घातक म्हणावीशी एक बाब वाटली ती अशी की, एका घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीच्या मनात इतके विष असू शकते? मनात रुजलेल्या विषामुळेच ती व्यक्ती, देशातील नागरिक त्यांच्या पूर्वजांच्या भूमीत राहत असताना त्यांच्यावर तो एक उपकारच आहे असे चित्र निर्माण करते. त्यांना धमकावणीच्या भाषेत दहशत बसवण्याचा प्रयत्न करते. ‘गोमांस खायचे सोडणार असतील, तरच मुस्लिमांनी देशात राहावे अन्यथा त्यांनी देशातून चालते व्हावे,’ असे खट्टर यांनी सांगितले. मी माझ्या फेसबुक पानावर ( https://www.facebook.com/YogendraY) ) १७ ऑक्टोबरला असे लिहिले होते की, खट्टर, मोदी किंवा त्यांच्या (संघ) परिवारातील लोक असोत. ते मूलभूत तथ्ये समजून घेण्यास तयार नाहीत. मुस्लीम व अन्य अल्पसंख्याक हे या देशातील भाडेकरू नाहीत. त्यांचा या देशावर तितकाच हक्क आहे, जितका खट्टर व मोदी यांचा आहे. या अल्पसंख्याकांच्या पूर्वजांच्या अस्थी वा राख याच देशाच्या मातीत मिसळलेली आहे, ते मोदी/ खट्टर यांच्याइतकेच या देशाचे मालक आहेत. त्यांना हा हक्क कुणा सरकारने दिलेला नाही तर भारताच्या राज्यघटनेने दिला आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनाने तो दिला आहे, हजारो वर्षांच्या सांस्कृतिक वारशाने त्यांना तो मिळाला आहे.

संघ परिवार या देशाच्या राज्यघटनेलाच मानायला तयार नाही. त्यांचे स्वप्न भारताला पाकिस्तानसारखे एककल्ली बनवण्याचे आहे. बहुसंख्याकांचे वर्चस्व असलेल्या ‘हिंदू पाकिस्तान’ची निर्मिती त्यांना करायची आहे. थोडक्यात, धर्मावर आधारित देशाची त्यांची संकल्पना आहे. त्यांचे स्वप्न देशाची सांस्कृतिक विविधता नष्ट करून ‘एक धर्म, एक भाषा, एक संस्कृती’ यांचे वर्चस्व स्थापित करण्याचे आहे. हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली रंगवल्या जाणाऱ्या या स्वप्नात आपला देश, त्याची खरी संस्कृती व हिंदू धर्म यांचा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादाची ही मांडणी त्यांनी जर्मनीकडून उधारीने घेतलेली आहे. युरोपातील ही बीजे आपल्या मातीत उगवू शकणार नाहीत.
माझ्या फेसबुक पोस्टवर एरवी फार प्रतिक्रिया येत नाहीत, पण या पोस्टवर तुलनेने खूप प्रतिक्रिया आल्या. पाच लाख लोकांनी माझे म्हणणे वाचले. ७५०० लोकांनी लाइक केले तर १५०० लोकांनी ते शेअर करून इतरांनाही पाठवले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावर आतापर्यंत १३६३ उत्तरेही आली आहेत. यात आत्मप्रौढी मिरवण्याचा माझा हेतू आहे असे तुम्हाला वाटेल; पण मी ही गोष्ट यासाठी सांगतो आहे, की त्यातील अनेक उत्तरे नकारात्मक आहेत.

गोष्ट केवळ वैचारिक मतभेदांची किंवा टीकेपुरती मर्यादित नाही. अनेक उत्तरांचा मजकूर माझ्याविरोधात निव्वळ गरळ ओकणारा आहे. मुद्दा नाहीच. शिवीगाळही केली आहे. अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या येथे जाहीरपणे सांगताही येत नाहीत, त्यामुळे तुम्हीच माझ्या फेसबुक पानावर जाऊन ते वाचा.

आता या विषावर उतारा काय, असा प्रश्न पडतो, खरे तर या सगळ्याकडे दुर्लक्ष करणेही सोपे आहे. माझे मित्र सांगतात, की हे फेसबुकवाले लोक भारताचा खरा आरसा नाहीत. त्यात अधिक लोक हे शहरी, मध्यमवर्गीय व खाऊन-पिऊन सुखी आहेत व ते भाजपचे मतदार आहेत. फेसबुकवर अनिवासी भारतीयांचीही मोठी संख्या आहे. माझ्या मित्रांचा सल्ला असा, की त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करा.. अनिवासी भारतीय हे काही भारताचा खरा आवाज नाहीत.

म्हटल्यास मी त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू शकतो.. इतकी आक्रमक भाषा वापरून आणि शिव्या देऊन ‘आपली संस्कृती उदार व सहिष्णू आहे’ असे कुणी सांगत असेल, तर त्या म्हणण्यावर हसावे नाही तर काय करावे! त्यांना हात जोडून इतके सांगू शकतो, की आपण आपले हे पुष्पगुच्छ आपल्याजवळच ठेवा. कारण ही भाषा तुम्हाला शोभते, मला नाही.
नाही तर या आक्रमक प्रश्नांना एकेक करून मीही उत्तरे देऊ शकतो. ‘आपण काश्मिरी हिंदूंच्या वेदनांवर गप्प का?’ या अभिनिवेशाला ‘त्यावर मी कधीच मौन पाळलेले नाही’ हे तथ्य मी सांगू शकतो. ‘मानवाधिकारांच्या गोष्टी करणारे लोक पाकिस्तान व बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीवर का बोलत नाहीत?’ असे काहींचे म्हणणे आहे, पण मी त्यांना आठवण देऊ शकेन की, या दोन्ही देशांतील मानवाधिकार संघटनांनी अतिशय प्रामाणिकपणे या मुद्दय़ांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘मुसलमानांची लोकसंख्या किती वाढते आहे माहितेय का?’ असेही काहींनी मला उद्देशून लिहिले आहे. याच्या उत्तरादाखल मी अनेक खरे आकडे दाखवून या लोकांच्या चिंता दूर करू शकतो. ‘फाळणीत मुसलमानांना त्यांचा देश मिळाला, मग आता ते भारतात वाटा का मागतात?’, असेही काहींचे म्हणणे आहे; त्यावर उत्तर देताना मी- किंवा कुणीही सुजाण माणूस- फाळणीचा खरा इतिहास सांगू शकतो. म्हणजे, आपण एकेका प्रश्नाला उत्तरे देऊ शकतो. ज्यांना हे प्रश्न निरुत्तर करणारे वाटतात, त्यांना ते तसे अजिबात नाहीत याची जाणीव आपण देऊ शकतो.

पण हे सगळे केले तरी हे विष उतरणार नाही. उत्तर ऐकण्याची तयारीच नसणाऱ्या लोकांना त्यांच्या एकेक प्रश्नाचे उत्तर देणे चुकीचेच ठरेल.. अर्थात, या प्रवृत्तींकडे हसत-हसत दुर्लक्ष करणे, हेही खरे तर तितकेच चुकीचे आहे. पण माझ्या मते धर्मनिरपेक्ष आंदोलनाची आतापर्यंत हीच चूक झाली आहे की, त्यांनी मला जे प्रश्न विचारले आहेत त्यांसारख्या प्रश्नांकडे साऱ्यांनी दुर्लक्ष केले.
हे प्रश्न आणि अपशब्द, शिवीगाळ, आक्रमक भाषा याच्यामागे खरी चिंता आणखी निराळी आहे, आपल्याच देशात आपल्या संस्कृतीपासून वंचित होण्याची ती भीती आहे. आपली भाषा, वेशभूषा, सण-परंपरा यांच्यापासून दूर जाण्याची एक चिंता दिसते आहे. आमच्या धर्मनिरपेक्ष बुद्धिवंतांनी ती समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, उलट त्यांना अभिमान वाटणाऱ्या इंग्रजी भाषेतून त्या चिंतेची खिल्ली उडवली. त्यामुळे संघ परिवाराने या चिंतेला धर्माची झूल चढवून द्वेषमूलकतेचे राजकारण सुरू केले. त्याचा सामना करायचा असेल, तर धर्मनिरपेक्षतावादाला आपली भाषा बदलावी लागेल. आपल्या परंपरांशी नव्या पद्धतीने नाते जोडावे लागेल.
नाही तर दादरीची खोल जखम आतून चिघळेल.. त्या वेदना आपल्या सगळ्या शरीरात पसरत जातील व पुढची वाटचालही अवघड होईल.

मराठीतील सर्व देशकाल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pain of dadri incident
First published on: 21-10-2015 at 01:18 IST