scorecardresearch

देश-काल : आता भगतसिंग?

पंजाबात सर्व राज्य सरकारी आस्थापनांत डॉ.आंबेडकरांचे छायाचित्र लावले जाणार, यात आश्चर्य नाही.

योगेन्द्र यादव

म. गांधी, पं. नेहरू यांच्या निव्वळ प्रतिमांचा सुळसुळाट करून, त्यांच्या जयंत्यामयंत्या ‘साजऱ्या’ करून आपण त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष केले. आता या जागी भगतसिंग येणार का? भगतसिंगांचे समग्र वाङ्मय वाचणार कोण?

भगतसिंग यांना स्वातंत्र्यलढय़ातील सहभागासाठी ज्या दिवशी देहदंड दिला गेला, तो २३ मार्च हा दिवस देशभर अनेक जण ‘शहीद दिन’ म्हणून पाळतात. यंदाच्या बुधवारी तो दिवस साजरा होत असताना जे काही घडत होते त्याने जुने प्रश्न पुन्हा पडले, शिवाय नवेही प्रश्न पडले. जुन्या प्रश्नांबद्दल नंतर सांगेनच, पण आधी नवे प्रश्न. ते असे की, या तरुण क्रांतिकारकाच्या निव्वळ प्रतिमा लावण्याचे राजकारण करून ‘राजकीय आपलेसेकरणा’चा खेळच आपण खेळणार का आणि जे खेळताहेत त्यांना कसे रोखणार? महात्मा गांधींचे जे झाले तेच इथेही होणार का?

हे प्रश्न आज पडण्याचे निमित्त सर्वाना माहीतच असेल. पंजाबातील ‘आम आदमी पक्षा’च्या नवस्थापित सरकारने भगतसिंग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या(च) प्रतिमा राज्यभरच्या सरकारी कार्यालयांत लावण्याचा इरादा व्यक्त केला असून त्याची सुरुवात मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वत:च्या कार्यालयापासून केली. ‘पिवळी पगडी’ही जणू मान यांची ओळख गेल्या काही वर्षांत ठरली आहे. त्यांचा शपथविधी खटकर कलाँ येथे झाला, तेव्हा उपस्थितांना पिवळय़ा पगडय़ा घालूनच येण्याचे आवाहन त्यांनी केले होते. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत विराजमान झालेल्या मान यांच्यामागे असलेल्या दोन तसबिरींपैकी भगतसिंगसुद्धा पिवळय़ाच पगडीतले होते! या ‘बसंती’ (म्हणजे पंजाबीमध्ये पिवळा) रंगाचा उल्लेख भगतसिंगांशी संबंधित कथा-कविता वा गीतांतून येतो हे खरेच, पण ‘मी नास्तिक का आहे?’ लिहिणाऱ्या भगतसिंग यांचे वैशिष्टय़ असे की, त्यांनी धर्मलक्षण ठरणारी ही पगडीसुद्धा सोडून दिली. डोके झाकायचेच असेल तर पाश्चात्त्य टोपीसुद्धा चालेल- विरोध पोशाखाला नव्हे तर त्यामागच्या कल्पनांना असायला हवा, हे त्यांना माहीत होते. भगतसिंगांचे समग्र लिखित साहित्य संपादित करणारे, भगतसिंगांचा इतिहास अभ्यासणारे चमन लाल यांनी भगतसिंग यांच्या उपलब्ध छायाचित्रांशी अत्यंत विसंगत अशा प्रतिमेचा प्रसार भगवंत मान करीत असल्याचा आक्षेप घेतला. मग हा सूर वाढू लागला आणि भगतसिंगांचे काही नातलगही आक्षेप घेऊ लागले.

दुसऱ्या बाजूने विचार केल्यास, मान यांनी काही भगतसिंगांचा अवमान केलेला नाही. पंजाबातील कॅलेंडरांवर वगैरे कधीमधी भगतसिंग म्हणून दिसलेलीच प्रतिमा त्यांनी कार्यालयात वापरली. पाश्चात्त्य हॅटवाल्या भगतसिंगांपेक्षा मान यांना पगडीवाले भगतसिंग जवळचे वाटले, पुन्हा ही पगडी पिवळीच दिसत असल्याने, ‘मेरा रंग दे बसंती चोला’सारखे स्फूर्तिदायी क्रांतिगीतही सार्थक झाले. त्याहीपुढे असाही युक्तिवाद करता येईल की, ऐतिहासिक व्यक्तींचे रूपांकन आज आपापल्या पद्धतीने समजा कुणी केले, तर आक्षेप कशाला घ्यायला हवा? मला ती ऐतिहासिक व्यक्ती अशी प्रतीत होते म्हणून रूपांकन असे केले, एवढे स्वातंत्र्य आज नाही की काय (मोत्यांच्या भरपूर माळा ल्यालेले, गुलाबी-गोऱ्या चेहऱ्याचे छत्रपती शिवाजी महाराज पूर्वी अनेक कार्यालयांत दिसत. ते कसे चालले?)

या वादावर, भगतसिंग यांच्या नातलगांपैकी एक असलेले प्राध्यापक जगमोहन सिंग यांनी सम्यक भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते, हा झगडा भगतसिंगांचा कोणता फोटो वापरला, कोणते चित्र/ कोणती प्रतिमा वापरली एवढय़ापुरताच नसून भगतसिंगांचे कोणते विचार तुम्हाला हवे आहेत याचा आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिक सखोल आहे आणि तुमच्या राजकीय उद्दिष्टांपुरतेच भगतसिंग तुम्हाला हवेत हे योग्य नव्हे.

भगतसिंग (जन्म १९०७, हौतात्म्य १९३१) यांच्याबद्दल भारतभरात आदराची भावना असली तरी अवघ्या २४ व्या वर्षी शहीद झालेल्या तरुणाचा उल्लेख आदरार्थी बहुवचनी (अहोजाहो) होत नाही आणि तरीही ‘या क्रांतिकारक तरुणा’विषयीचा आदर कमी होत नाही, इथपासूनच भगतसिंगच्या वेगळेपणाची सुरुवात होते. महत्त्वाचे वेगळेपण हे की, आपण आजवर अनेक थोर ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा पराभव केलेला आहे तसे भगतसिंगांबाबत झालेले नाही. नेहरूंवर अनेक दोषारोप करून वा कंडय़ा पिकवून, गांधीजींवरही हेत्वारोप करून त्यांच्या विचारांचा पराभव साध्य झालेला आहे, तर दुसरीकडे ‘स्वातंत्र्यवीर’ या सावरकरांच्या ख्यातीच्या मर्यादाही पुरेशा स्पष्ट आहेत. इतकेच कशाला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही ‘एका समाजाचे नेते’ ठरवून मोकळे होण्याचा प्रकार अगदी आतापर्यंत सुरू होता, ते चित्र आता कुठे बदलू लागले आहे. पंजाबात सर्व राज्य सरकारी आस्थापनांत डॉ.आंबेडकरांचे छायाचित्र लावले जाणार, यात आश्चर्य नाही.

अशा वेळी भगतसिंग आपण पुरेसे समजून तरी घेतले का, हा प्रश्न पडतो. आपण भगतसिंगांचे विचार समजून घेतले नाहीत, तर कुणीही उठेल आणि राजकीय हेतूंसाठी त्याचा वापर करील, कालांतराने तीच प्रतिमा लोकांवर ठसेल आणि मग याही थोर व्यक्तिमत्त्वावर शिक्का बसेल, अशी रास्त शंकाही येते. गांधीजींच्या अहिंसावादापासून फटकून असणाऱ्या ‘जहालवादी, सशस्त्र राष्ट्रवादा’चा प्रणेता म्हणून भगतसिंग माहीत असतो. पण या ‘सशस्त्र’ तरुणाची वैचारिक धार साम्यवादी (कम्युनिस्ट) होती, तो नास्तिक होता आणि अखेपर्यंतही लेनिनचे विचार वाचत होता, हे सांगण्यात तर आपले डावे पक्षसुद्धा कमी पडले (भगतसिंगांचे ‘समग्र वाङ्मय’ हल्लीच पुस्तकरूपाने मराठीत आले आहे असे ऐकतो. पण याआधी मराठीत होते का असे पुस्तक?).

संज्ञाहीन प्रतीके

वैचारिक- तात्त्विक समजुतीविनाच एखाद्याबद्दल आदर बाळगल्यास देव्हारे माजवण्याकडे कल होतो. तसे होऊ नये. भगतसिंगांचा उल्लेख ‘जाज्वल्य राष्ट्रवादी’, ‘समर्पित राष्ट्रभक्त’ असा आज लोकांनी कितीही केला तरीही त्याला कसे राष्ट्र हवे होते याबद्दल जर हे लोक अनभिज्ञ असतील तर उद्या कुणीही ‘आम्ही सांगतो तसेच राष्ट्र’ असेही म्हणू शकते! युवकांपुढे एक आदर्श म्हणून ठेवला जाणारा भगतसिंग हा काही फक्त जोषपूर्ण, बेफाम तरुण नव्हता. भगतसिंगांचा उल्लेख क्रांतिकारक म्हणून करताना, कोणती ‘क्रांती’ आपल्याला अभिप्रेत असते? भगतसिंग दहा वर्षे वयाचा असताना रशियात साम्यवादी क्रांती झाली, त्या क्रांतीने भारलेल्या काळात तो वाढला आणि पुढे त्याने लेनिनचा अभ्यासही केला. पण आज सारेच पक्ष ‘भगतसिंग आमचाच’ म्हणतात तेव्हा अहिंसेवरचे त्याचे आक्षेप काँग्रेस लक्षात घेत नाही, त्याच्या नास्तिकपणाला भिडणे अकाली दलासारखे पक्ष टाळतात आणि भाजप तर, भगतसिंगला धर्माच्या- प्रामुख्याने हिंदू धर्माच्या- नावाने राजकारण करणाऱ्यांविषयी असलेला संताप झाकून, पुसून टाकू पाहाते.

 या राजकीय चढाओढीत आता ‘आप’ आणखी जोमाने सामील झाला आहे, प्रत्येक राज्य सरकारी कचेरीत भगतसिंगची प्रतिमा लावण्याची योजना आहे. याचा एक विचित्र परिणाम संभवतो. आजवर गांधीजींच्या तसबिरीखाली सरकारी कचेऱ्यांत जे-जे सुरू असे, तेच सारे आता भगतसिंगच्या तसबिरीखाली सुरू राहील. काही तरी बदल हवा, बरोबरच.. पण काय बदलायचे? फक्त तसबिरीच? आदर्शवादी, क्रांतिकारक, तत्त्वनिष्ठेसाठी मरण स्वीकारणारा म्हणून माहीत असलेला भगतसिंग आता केवळ ‘तसबिरीपुरता’ ठेवायचा? अशा तसबिरीखाली पंजाबातल्या पोलीस ठाण्यांत कायकाय होऊ शकेल, जरा कल्पना करा.

थोडक्यात, भगतसिंगदेखील आता एक ‘प्रतीक’ म्हणून उरणार, असा धोका आहे. संज्ञाहीन प्रतीक. म्हणजे ते ज्याचे प्रतीक असते, ती तत्त्वेच कुणी समजून घेत नाही, ते विचारही कुणी समजून घेत नाही. म्हणूनच मग, भगतसिंगने विचारपूर्वक उतरवलेली पगडी त्याला पुन्हा चढवतो आहोत, तीही ‘बसंती पगडी’! नेहरू कोण तर ‘टाळी देणारे’, गांधी कोण तर चष्म्यातून नुसते स्मित करणारे, तसेच यापुढे भगतसिंग ‘बसंती पगडीवाले’ ठरू नयेत हो.. राजकीय लाभांसाठी थोरांवर असे शिक्के मारणे का स्वीकारतो आहोत आपण?

विचारांचे सामर्थ्य

भगतसिंग हे ‘विचारवंत कार्यकर्ता’ होते, म्हणून ते थोर ठरले आणि ‘तो भगतसिंग’ किंवा ‘ते भगतसिंग’ या वादाच्या पलीकडे गेले. निव्वळ बंदूक पाहून ‘रक्त सळसळते, बाहु फुरफुरतात’ असल्यांपैकी नव्हते भगतसिंग. भगतसिंग हा तरुण व्यापक वाचन करणारा होता. वाचलेल्यावर विचार करणारा, केवळ टिपून ठेवणाराच नव्हे तर स्वत:चे विचार लिहून काढणारा आणि त्या विचारांप्रमाणे वागणारा – तशा वर्तनाची पूर्ण जबाबदारी घेऊन, त्याचे परिणामसुद्धा स्वीकारणारा तरुण. त्याच्या ‘समग्र वाङ्मया’च्या डोळस वाचनातून कुणाही सजग वाचकाला तीन तत्त्वांची पार्श्वभूमी निश्चितपणे दिसून येईल :  राष्ट्रवाद, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ही ती तत्त्वांची त्रिसूत्री. त्याचे ‘राष्ट्रवादी’ विचार हे ‘माझी पुण्यभूच सर्वाहून श्रेष्ठ’ असे नव्हते आणि ते व्यापक होते, कारण वसाहतवाद म्हणजे काय, भारतीयांचे एकीकरण म्हणजे काय याविषयीच्या त्याच्या चिंतनाला धर्मनिरपेक्षतेच्या आग्रहाची पार्श्वभूमी होती. केवळ प्रदेशांचे नव्हे तर वर्गीय एकीकरण हवे, त्यासाठी समाजवाद हवा हे त्याला पटत होते. वर्गभेदाप्रमाणेच वर्णभेदाचा, म्हणजे आर्थिक आणि सामाजिक विषमतेचा उल्लेख त्याच्या लिखाणात येतो. हे सारे लिखाण आजही अमीट आहे, पुस्तकरूपाने अनेक भाषांत उपलब्धही आहे. 

दरवर्षी २३ मार्चला केवळ ‘शहीद दिवस’च पाळणारे विचारवंत नेते डॉ. राममनोहर लोहिया यांचा जन्मदिवसही २३ मार्च हाच असे. मला या दिवशी त्यांचीही आठवण होते. ज्यांचे विचार लोकांना पुरेसे माहीत नाहीत, असा हा आणखी एक नेता. नेत्यांच्या प्रतिमांपेक्षा त्यांचे विचार समजून घेण्याचे महत्त्व जर हा मजकूर वाचणाऱ्यांच्या लक्षात आले तर निश्चितपणे भगतसिंग आणि लोहिया यांची थोरवी कळेल. मी ही दोन नावे एकत्र घेण्याचे धारिष्टय़ कसे करू शकतो, हेही उमगेल.

लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत. yyopinion@gmail.com

मराठीतील सर्व देशकाल ( Deshkal ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shaheed diwas freedom fighter bhagat singh photos of bhagat singh by aam aadmi party zws

ताज्या बातम्या