ज्ञान या संकल्पनेचा विचार ग्रीक-पाश्चात्त्य परंपरेत आणि भारतीय परंपरेत अतिशय मूलगामी रीतीने झाला. प्लेटोने (इ.स.पू. पाचवे शतक) ज्ञान आणि मत यात फरक केला आणि अधिक विकसित असे ज्ञान म्हणजे समर्थनीय सत्य विश्वास असा सिद्धान्त मांडला. त्याच्या म्हणण्यानुसार मत हे बदलत्या चंचल जगाचे असते तर ज्ञान हे वस्तूंमधील सत्-सामान्यांचे किंवा सद्-रूपांचे  असते.
चेतना, जाणीव आणि स्वजाणीव हा फरक विसाव्या शतकातील एका तत्त्वचिंतकाने केला. स्वजाणीव हे केवळ माणसाचे वैशिष्टय़ आहे. मानवी जाणिवेकडे पाहण्याचा हा एक मार्ग आहे. अर्थातच तो एकमेव मार्ग नाही. जीवशास्त्रीय चेतना आणि ज्ञानशास्त्रीय चेतना हे शब्द आणखी सुलभ करावयाचे तर ‘जैविक चेतना आणि ज्ञानात्मक चेतना’ असे म्हणता येईल.
या तत्त्वचिंतकाच्या मते, शरीर व जैविक चेतना यामध्ये एक मूलभूत फरक आहे. शरीर आणि जैविक चेतना यात फरक करता येतोच. शिवाय शरीर आणि जैविक चेतना एकमेकांपासून अलग होऊ शकतात, असे मानता येते. जैविक चेतना शरीरापासून अलग होणे हा मृत्यू असतो. चेतना, जाणीव आणि स्वजाणीव या तीन प्रकारांमध्ये आपण फरक करू शकतो, पण त्यांना अलग करता येत नाही. ज्ञानात्मक चेतना जैविक चेतनेपेक्षा पूर्णपणे वेगळी, अलग मानता येत नाही. स्वजाणीव ही उत्क्रांतशील संकल्पना आहे.   
स्वजाणिवेची जाणीव ही पुढील पायरी असू शकते. पण इतक्या खोलात जाण्याची इथे आत्ता गरज नाही आणि त्या रीतीची चर्चा करणे, तूर्तास अपेक्षित नाही. दुसरे म्हणजे जैविक चेतना शरीरापासून अलग झाली की शरीर जसे स्वतंत्रपणे अस्तित्वात राहते, तसे जैविक चेतना स्वतंत्रपणे अस्तित्वात राहते व तिचा काही मूलस्रोत आहे. तिलाच आत्मा, ब्रह्म म्हणतात किंवा कसे, याचीही चर्चा करणे तूर्तास अपेक्षित नाही.(ती नंतर कधी तरी येईलच.)    
स्वजाणीव माणसाला ‘मी कोण आहे’ याचे भान देतेच, पण ‘मी कोण नाही’ याचेही भान देते. ज्याला आत्मदुरावा म्हणता येईल, ते जाणिवेचे एक कार्य आहे. जसे की, एखाद्या पुरुषाला ‘आपण स्त्री आहोत’ असे वाटते किंवा उलट. अथवा ‘मी भारतीय असण्यापेक्षा आधी मी अमुक एका जाती-जमातीचा आहे, म्हणून जमातीचेच नियम मी पाळेन’ असे म्हणताना भारतीय नागरिकाची कर्तव्ये दूर सारली जातात आणि जात प्रभावी ठरते. येथे आत्मदुरावा कोणता आत्मपरिचय निर्माण करते आणि कोणता अपेक्षित आहे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठीच्या कोणत्या जाणिवा निर्माण व्हाव्यात, कशा, कुणी कराव्यात हेही प्रश्न येतील.         
 स्वजाणीव पुढे कसे रूप धारण करते, त्यातून काही निष्पन्न होते ते पाहू. स्वजाणिवेचे पक्व आणि परिष्कृत रूप म्हणजे ज्ञान असे मांडता येते. ही व्याख्या नाही, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. ज्ञान या संकल्पनेकडे कसे पाहिले गेले, याकडे लक्ष वेधणे एवढाच मर्यादित हेतू येथे आहे. ज्ञान या संकल्पनेची व्याख्या करण्यातूनच सामाजिक व्यवस्थेचे राजकारण घडते, असेही दाखवून देता येईल. त्यासाठी संयम बाळगणे आवश्यक आहे.   
ज्ञान या संकल्पनेचा विचार ग्रीक-पाश्चात्त्य परंपरेत आणि भारतीय परंपरेत अतिशय मूलगामी रीतीने झाला. प्लेटोने (इ.स.पू. पाचवे शतक) ज्ञान आणि मत यात फरक केला आणि अधिक विकसित असे ज्ञान म्हणजे समर्थनीय सत्य विश्वास असा सिद्धान्त मांडला. त्याच्या म्हणण्यानुसार मत हे बदलत्या चंचल जगाचे असते तर ज्ञान हे वस्तूंमधील सत्-सामान्यांचे किंवा सद्-रूपांचे (आयडियाज किंवा फॉम्र्स) असते. ‘सुंदर’, ‘त्रिकोण’, ‘घोडा’ विशिष्ट वस्तू इंद्रियगोचर आहेत, पण ‘सुंदर’, ‘घोडा’ यांसारख्या सामान्य पदांनी जे व्यक्त होते – म्हणजे सौंदर्य, घोडेपणा – ती विशिष्ट वस्तू नसते;  तर ते एक सत्-सामान्य, सद्-रूप असते. ते केवळ विवेकशक्ती जाणू शकते. वस्तूंची स्वरूपे बदलत जातात. पण सत्-सामान्ये स्थिर, अपरिवर्तनीय, नित्य, दिव्य आणि चिरंतन असतात. मत हे वस्तूबद्दल असते, ते वस्तूबरोबरच सतत बदलते. ते स्वीकारता येत नाही.  
 प्लेटोच्या म्हणण्यानुसार आत्म्याचे स्वरूप सत्-सामान्यांसारखे दिव्य असते व म्हणून आत्मा अमर असतो. आत्मा सत्-सामान्यांचे बौद्धिक दर्शन घेत असतो, ते ज्ञान असते. प्लेटोने हे सत्-सामान्यांचे ज्ञान व्यवहारात कसे लागू करावे, याचे दिलेले सूत्र म्हणजे साधकाचे जीवन.  
 प्लेटोचा ज्ञानसिद्धान्त इतका मौलिक आहे की सबंध युरोपियन तत्त्वज्ञान म्हणजे प्लेटोच्या तत्त्वज्ञानाला दिलेल्या केवळ तळटिपा आहेत, असा गौरव व्हाइटहेड हा तत्त्ववेत्ता करतो. प्लेटोचे विचार ही एक मोहिनी आहे. तिच्यातून सुटणे अवघड आहे. प्लेटोच्या या भूमिकेवर विद्यमान अ‍ॅँग्लो-अमेरिकन तत्त्ववेत्ता एडमंड  गेटीअर याने केलेल्या टीकेने मात्र चांगलीच खळबळ माजली.
 भारतात ‘ज्ञान’ ही संकल्पना धर्म आणि अध्यात्माच्या दिशेने गेली खरी, पण ती समाज व्यवस्थेचे नियामक तत्त्व म्हणून उपयोगात आणली गेली. मुळात विद्या आणि ज्ञान यात फरक झाला. जशा की चौसष्ट विद्या किंवा कला. विद्या ही स्वरूपाने तांत्रिक मानली गेली तर ज्ञान हे त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे, असा समज दृढ होता. विद्या बुद्धीशी संबंधित असते हे खरे, तथापि ती पढिक असू शकते, तर ज्ञान मात्र आत्मसात केलेले असते. ज्ञानाचा प्रत्यक्ष शिक्षणाशी संबंध असतोच असे नाही, अशिक्षित माणूसही ज्ञानवान असू शकतो. पढतमूर्ख आणि ज्ञानी यातील फरक त्यामुळेच कळतो. विद्य्ोचा जाणिवेशी संबंध नाही. पण ज्ञान हीच जाणीव आहे, असे मानण्याची परंपरा होती. वेद म्हणजे ज्ञान, (विद्- जाणणे) असे समीकरण होते.    
वेद म्हणजे ज्ञान या मूलाधाराच्या आधारे भारतीय परंपरेत सर्व विद्या व ज्ञान दोन प्रकारात विभागल्या होत्या. पराविद्या आणि अपराविद्या. पराविद्या म्हणजे ब्रह्मविद्या तर अपराविद्या म्हणजे भौतिक जगताचे ज्ञान. यात पराविद्येला प्राथम्य होते तर अपराविद्य्ोला दुय्यम स्थान मिळाले. हा भेद कधी झाला हे सुस्पष्ट नाही. पण तो प्रभावी ठरला. प्रत्यक्ष समाजव्यवस्थेत हा भेद काटेकोरपणे अमलात आला. पराविद्य्ोशी निगडित वेदोपासना, यज्ञ उच्च आणि श्रमजीवी मात्र नीच समजले गेले. म्हणजे सामान्य जीवनासाठी आवश्यक शेती, व्यापार  इत्यादी कौशल्ये असणारे शूद्र, सर्वात नीच ठरले. न्याय, समता इत्यादी मूल्यव्यवस्थाच या ज्ञान कल्पनेशी जोडली होती.    
आता एक नवी मांडणी पुढे आली आहे, तिचा विचार केला तर वेगळे चित्र मिळेल. या मांडणीनुसार  वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान असा नसून अग्नी असा आहे आणि वेद हा शब्द संस्कृतात रुळल्यानंतर त्याला ज्ञान असा अर्थ दिला गेला. म्हणून वेदसूक्ते म्हणजे अग्निसूक्ते, त्यांच्या संकलनाला वेद हे नाव मिळाले. अग्नीला आहुती देणे म्हणजे यज्ञ करणे हाच धर्म झाला, तेव्हा वेदसूक्तांचे पठन हा मुख्य धर्माचार होऊन तो करणाऱ्या वर्णाला श्रेष्ठत्व मिळाले. ते अबाधित राखण्यासाठी ‘सारे ज्ञान वेद या संकलनात आहे’ अशी स्वतची आणि इतरांची समजूत करून देण्यासाठी वेद म्हणजे ज्ञान असे सांगण्यात येऊ लागले. हे संशोधन विश्वनाथ खैरे (नवभारत, सप्टेंबर २००४) यांनी मांडले आहे. ते परंपरेला मान्य होईलच असे नाही. ही मांडणी किंवा असा नवा विचार सुरू केला तर कुंठित झालेली भारतीय परंपरा किमान पातळीवर प्रवाही होण्याचे मार्ग तर मोकळे होतील. तसे झाले तर इतर जगाचे योग्य आणि चांगले ते घेण्याचा आणि आपले त्यांना देण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.
६ लेखक संगमनेर महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक आणि तत्त्वज्ञान विभागप्रमुख आहेत. ई-मेल : madshri@hotmail.com

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?