‘समजायला सोपं’  किंवा ‘समजायला कठीण’ असे चित्रांचे सरळ दोन भाग करणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खास इशारा : तुम्हाला जे चित्र समजायला सोपं वाटतंय, ते कठीणही असू शकेल..  त्यातले अनेक संदर्भ तुम्हाला माहीतच नसतील तर मग ‘चित्राचा अर्थ’ जाणून घेण्याच्या जवळपाससुद्धा तुम्ही पोहोचणार नाही. त्याहून वाईट हे की, हे सोपं नाहीये हेसुद्धा  तुम्हाला कळणार नाही! मग यावर उपाय काय?
थेट विषयाला हात घालण्यापूर्वी फक्त एकच खुलासा- शीर्षकात वापरलेला शब्द चित्रकलेशी दूरान्वयानंही संबंधित नसताना तो उधार घेतला आहे, तोही बारावी विज्ञान शाखेकडून! भौतिकशास्त्राचा पेपर कठीण गेल्यावर आणि तो पाठय़पुस्तकावरच आधारित असल्याचं स्पष्ट झाल्यावर प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांच्या ‘काठिण्यपातळी’ची चर्चा गेल्याच आठवडय़ात सुरू झाली होती, तिथला हा शब्द.
पण ‘वर’ (पानाच्या उजवीकडे, शीर्षकाच्या शेजारी) जे म्हटलंय, ते नीट वाचलंत तर चित्राच्या काठिण्यपातळीचं टेन्शन घेण्यात अर्थ नाही, असा निष्कर्ष तुम्हाला काढता आलेलाच असेल. तिथं म्हटल्याप्रमाणे अज्ञानाचं ज्ञानही होणार नसेल, तर मग कसली चिंताच नको की! आपण आपली चित्रं पाहायची.
आधी चित्रं पाहायची. नीट पाहायची.. हे असं केलंत तर मात्र, आपण चित्रात कायकाय पाहायचंय, कशाकशाबद्दल प्रश्न पाडून घ्यायचेत आणि आपल्याच तर्कानं कशी उत्तरं शोधायचीत, हे सगळंच तुम्हाला कळू लागेल किंवा कळत असेलच.
उदाहरणार्थ, ही इथली दोन चित्रं तुम्ही पाहात आहात. एकात चटकन दिसणारं दृश्य आहे ते ‘बाजीगर’ या चित्रपटाच्या पोस्टरसारखं दिसतंय, पण शाहरुख खानऐवजी दुसरंच कुणी तरी आहे. तो स्वत: चित्रकार अतुल दोडियाच आहे, असं त्या वेळच्या त्याच्या फोटोंवरून तुम्हाला कळेलच. त्याच्या गॉगलवर दोन चित्रं काढलीत. खाली काही तरी, पोहणाऱ्या आकृती काढल्यात आणि वरच्या डाव्या बाजूला तुम्हाला, चित्रीकरणादरम्यान वापरतात तशी फटमारपट्टी दिसू शकते आहे. बॉलीवूडची ती खूण आणि ‘बाजीगर’चं पोस्टर हे तर बॉलीवूडमधनंच घेतलेलं, पण त्या गॉगलवर जी दोन चित्रं आहेत, ती पाहिलीत तर तुम्हाला प्रश्न पडू लागतील. चित्रात केलेली ही चित्रं कुणाची? शैली तर निराळीच दिसते आहे आणि त्यापैकी दुसरं- त्या गॉगलधाऱ्याच्या उजव्या डोळ्यावरलं चित्र तर बटबटीत, वेंधळंच दिसतं आहे. ही कुणाची चित्रं? तीच इथे का आहेत? स्वत:च्या डोळ्यांवर मी हा या चित्रांचा चष्मा लावलाय, असं हा चित्रकार धडधडीतपणे का सांगतोय?
गॉगलधारी पुरुषाच्या उजव्या डोळ्यावर ब्रिटिश चित्रकार डेव्हिड हॉकनी, तर डाव्यावर भूपेन खक्कर यांची चित्रं आहेत. योगायोगानं ते दोघेही चित्रकार अविवाहित राहून स्वत:चा पर्यायी लैंगिक जीवनक्रम अबाधित राखणारे होते. ते दोघे दूर असले तरी चित्रकार म्हणून हॉकनीमुळे भूपेन यांना दिलासा मिळाला होता. विषयवासनेची वाट चारचौघांपेक्षा निराळी असणारे हे दोघे, चित्रंदेखील चारचौघांच्या सौंदर्यकल्पनांपेक्षा निराळी काढणारे होते. त्यांच्या पुढल्या पिढीतले अतुल आणि त्यांची पत्नी अंजू दोडिया. त्यापैकी अतुलनं, ही अमुकच माझी चित्रशैली असं बंधन स्वत:वर न घेता फोटोबरहुकूम आणि ‘फोटोरिअ‍ॅलिझम’च्या पाश्चात्त्य चळवळीची आठवण करून देणारी चित्रं काढली. मात्र अतुलच्या अशा फोटोबरहुकूम चित्रांतला फोटो हा त्या पेंटिंगसाठी खास काढवून घेतलेला फोटो, असं कधीही नव्हतं. उलट, ‘सापडलेल्या फोटो-प्रतिमां’वर काम करण्याची नवी वाट अतुल दोडियांनी शोधली. मात्र आपल्याच अवतीभोवतीचं वास्तव कसं पाहायचं किंवा चित्रविषय कसा ठरवायचा, हे शिकण्यासाठी हॉकनी आणि भूपेन यांच्या चित्रांची फारच मदत होऊ शकते, हे अतुलनं ओळखलं होतं. चित्रं पाहून त्यातला विचार जसाच्या तसा न स्वीकारता आपल्या विचारासाठी यातलं काय घेण्यासारखं आहे हे शोधायचं, असा मार्ग सर्वच हुशार- होतकरू चित्रकार स्वीकारतात. त्या मार्गावर अतुल दोडियांना ‘साधेच आजूबाजूचे विषय’ घेणारे हे दोन चित्रकार ठळकपणे दिसले असल्यास नवल नाही, पण मग त्या उमेदवारीच्या कालखंडात ज्येष्ठ वाटलेल्या दोघांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून हे आत्मचित्र (सेल्फ पोट्र्रेट) काढलंय का?
हो आणि नाही. अतुलची बाकीची चित्रं पाहिलीत तर हे कळेल. आत्मपर संदर्भ या सर्व चित्रांमध्ये भरपूर असतात. गेल्या दहा-पंधरा वर्षांत ते थेटपणे चित्रात येत नाहीत इतकंच, पण हे चित्र आत्मपर असलं तरी, केवळ ‘कृतज्ञताचित्र’ नाही. माझी ओळख काय नि माझी दृष्टी काय, हा प्रश्न अतुल दोडिया जेव्हा बाजारप्रिय होऊ लागले, त्याच काळात- वेळच्या वेळीच त्यांनी स्वत:ला या चित्राद्वारे विचारला असावा, असं मानण्यास जागा आहे.
 चित्रातले आत्मपर तपशील अतुल दोडिया सहजपणे सांगतात.. त्यामुळे हॉकनी आणि भूपेनबद्दल ते सांगतात, तसे याच चित्रातल्या प्रत्येक आकृतीच्या आत्मपर बाजूवर ते प्रकाश टाकू शकतात, पण चित्रप्रतिमा याच साऱ्या असण्यामागचा हेतू काय होता किंवा अगदी तपशिलात जायचं तर, शर्टावरल्या चौकोनी रेघांना घडी पडल्यावर स्विमिंग पूलमध्ये पाण्याखाली दिसणाऱ्या टाइल आठवल्या की काय, याचं उत्तर त्यांनी सांगितलेल्या त्या तपशिलांतूनच आपण का म्हणून शोधावं? तसं असेल तर सर्वच चित्रकारांच्या सर्वच शब्दांवर विश्वास ठेवावा लागेल.. तेव्हा कोणत्याही चित्रकाराचा हेतू त्याची चित्रं सांगतातच, हे लक्षात घेऊन अतुल दोडियांची त्या काळातली वा त्या चित्राच्या आसपासची चित्रं पाहिल्यास असं लक्षात येईल की, घडण्याच्या काही पायऱ्या चढून गेल्यानंतर अतुलनं, आपण असेच का घडलो आणि आपल्या लेखी ‘चित्रकार असणं’ याचा अर्थ काय आहे, याचा शोध घेण्यासाठी ही चित्रं काढली असणार. यापैकी काहीच माहीत नसलं, तरी अतुल दोडियांच्या चित्रात जे काही दिसतं आहे, त्याचा आनंद घेता येतो आहेच.
त्याहीपेक्षा, दुसऱ्या चित्रातली पानं आणि चिमण्या हे फारच झटकन आनंद देतंय.. अगदी काही जणांच्या चेहऱ्यावर पाहता क्षणी स्मितरेषा उमटवतंय. ‘डिझाइन’च्या तत्त्वांवर – तोल, लय आणि पुनरावृत्ती यांच्यावर हे चित्र आधारलेलं असल्याचं शाळेत डिझाइन वगैरे शिकलेल्यांना सहज कळतंय.. पण छत्तीसगढहून कोलकाता शहरात आणि तिथून फक्त आठ दिवसांच्या चित्रप्रदर्शनासाठी २०१० साली मुंबईत आलेल्या या चित्रकर्तीचं हे चित्र पाहण्याची एक निराळीही तऱ्हा असू शकते. तद्दन डिझाइनवजा चित्र म्हणून हे चित्र सोडून द्यायचं की प्रश्न पाडून घ्यायचे? लोकचित्रकलेशी या चित्राचं काही नातं आहे का, हा प्रश्न कदाचित त्या चित्रकर्तीचं कौतुक वा दोषदिग्दर्शन करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा ठरेल.. झाडाचं पान ठसठशीतपणे चितारण्याची रीत आणि पानं-चिमण्या यांच्या गुंफणीतून सुटलेल्या मोकळय़ा जागेमध्ये पोतनिर्मितीसाठी आदिवासी कलेत जो लाकडी कंगवा वापरतात, त्याची आठवण करून देणारा रंग-वापर, ही या चित्राची दोन वैशिष्टय़ं आहेत.
‘त्यापेक्षा नुस्तं बघूयात’ असं म्हणून चित्रापासून सुटका करून घेतलीत, तर चित्रांपासून लांबच राहाल. एक चित्र तुम्हाला दुसऱ्या- संबंधित वा असंबद्ध चित्राची आठवण करून देऊ लागले आणि दृश्यातून प्रश्न पडू लागले की मग मात्र चित्रांची भाषा कळू लागते.