राजकीय व्यासपीठांवरून नास्तिकतेची हिणवणी आणि पुण्यात ठरलेला नास्तिक मेळावा बिनबोभाट रद्दच होणे, ही कशाची लक्षणे आहेत?

एकमेकांना धर्मद्रोही, पाखंडी ठरवून खून पाडणारा धर्म किंवा सलमान रश्दी ते तस्लीमा नसरीन यांच्या शिरच्छेदाचे फतवे काढणारा धर्म आणि ‘आपल्या’ धर्माचे हे नवे राजकारणप्रणीत स्वरूप, यांमध्ये फरक असायला हवा..

beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
The Vietnam War Guided Missiles chip cold wars
संविधानभान: सकारात्मक भेदभाव म्हणजे काय?
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा
falgun purnima 2024
फाल्गुन पोर्णिमेला निर्माण होतेय दुर्मिळ युती! या ३ राशींच्या लोकांचे भाग्य सोन्यासारखे चमकेल! प्रगतीसह मिळेल बक्कळ पैसा

एखादा शब्द अचानक चर्चेत येतो. तसा गेल्या आठवडय़ात चर्चेमध्ये आलेला शब्द म्हणजे ‘नास्तिक’! ‘देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इन्सान’ हे कोणत्याही काळास लागू पडणारे गाणे १९५४ सालच्या ज्या ‘नास्तिक’ या चित्रपटात होते, त्याची आठवणही आज कुणाला नसेल, पण माणसे बदलतात म्हणजे किती, हे या आठवडय़ात नास्तिकपणाच्या चर्चेमुळे उघड झाले. हल्लीचे राजकारण- आणि हल्ली जणू राजकारणाच्याच मागे फरफटत गेल्यासारखे चालणारे समाजकारणही-  भलतेच आस्तिकतावादी. त्यात हा शब्द उपटला आणि नास्तिक असणाऱ्यांना नेते मानायचे की नाही, हा अदृश्य प्रश्नही उद्भवला. ‘देव आहे की नाही’, ‘देव मानायचा की नाही’ हे मुद्दे आपल्या समाजात शतकानुशतके वैयक्तिक आणि उंबरठय़ाच्या आत राहिले होते, तेव्हाची गोष्टच वेगळी होती. पण व्यक्तिगत पैस ओलांडून उंबरठय़ाच्या बाहेर हे मुद्दे आले, संसदेच्या सभागृहातल्या घोषणांनाही धार्मिक रंग चढू लागले, त्यानंतर नास्तिकपणाचा उल्लेख हा नालस्तीपरच असणार, हेही उघड होते. त्याबद्दल खंत कुठवर बाळगणार? परंतु खुद्द स्वत:ला नास्तिक म्हणवणाऱ्यांची, नास्तिकतेच्या वैचारिक आदानप्रदानासाठी मेळावा भरवू पाहणाऱ्यांची जी काही गत गेल्याच आठवडय़ात झाली, ती अधिक शोचनीय, म्हणून अधिक दखलपात्र.

ही घटना नुकतीच पुण्यात घडलेली आहे. ती म्हणजे हकनाक पुढे ढकलला गेलेला नास्तिक मेळावा. शहीद भगतसिंग विचार मंचाकडून २०१४ पासून घेतल्या जाणाऱ्या नास्तिक मेळाव्याचे यंदाचे हे सातवे वर्ष. ‘आयोजकांनी भाषणांचे तपशील दिले नाहीत’ असे कारण दाखवत पोलिसांनी दोन दिवस आधी मेळाव्याला परवानगी नाकारली. काही हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांकडे ‘आमच्या भावना दुखावण्यासाठी रामनवमी दिवशी मुद्दाम हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे’ असा आक्षेप नोंदवल्यामुळे पुढचा अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांनी हे – भाषणांचा तपशील नाही म्हणून परवानगी नाकारण्याचे- पाऊल उचलल्याचे सांगितले जाते आहे. हा संभाव्य अनर्थ कोणाकडून होणार होता? मेळाव्याशी संबंधित जी काही थोडीफार (ती नेहमीच थोडकीच असणार हे उघडच आहे) नास्तिक मंडळी असतील ती जशी या सगळय़ात आपली बाजू रेटण्यास कमी पडली, तशीच त्यांच्या बाजूने बोलण्यासाठीदेखील चारदोन शहाणी माणसे उभी राहिली नाहीत आणि झाले हे चुकीचे आहे, असे म्हणून त्यांनी कुणाची कानउघाडणी केली नाही, हे वेदनादायक वास्तवही नाकारता येत नाही. लोकशाहीऐवजी बहुसंख्याकवादाची जिथे चलती असते, तिथे कोणत्याही प्रकारचे अल्पसंख्य समाज नेहमीच भयाच्या सावटाखाली, साध्यासुध्या हक्कांनाही पारखे झालेले जिणे जगत असतात. नास्तिक म्हणून एकत्र येऊ पाहणाऱ्यांचीही गत अशीच झाली की काय, हा प्रश्न या न झालेल्या मेळाव्यामुळे  अधिकच टोकदार झाला.

नास्तिकता धारण करणारे, नास्तिक असण्याची भीड न बाळगणारे लोक संख्येने अल्पच होते आणि आहेत, यात नवल नाही. हे थोडेथोडके लोक बुजले असतील, तर तो बहुसंख्याकवादाचा आणखी एक विजय. पण असा विजय अधोरेखित होण्यातून आणखी एक प्रश्न पडतो. तो म्हणजे, नास्तिकता ही चैन आहे का? प्रश्न मेळावा रद्द होण्यापुरता नाही. नास्तिकतेला काहीएक नीतिमत्ता असते, मूल्यचौकट असते, तत्त्वनिष्ठा असते.. ती बांधिलकी निभावणे हेच यापुढे चैनीचे ठरणार का?  कायद्यापुढे समानता, मूलभूत हक्कांची हमी आणि आचार- विचारांचे स्वातंत्र्य ही राज्यघटनेतील तत्त्वे तर सर्वच नास्तिकांना मान्य असणार, मग ‘भाषणाचा तपशील द्या’ या मागणीलाच विरोध करण्याचे कुणाला कसे सुचले नाही? ज्येष्ठ अभिनेते- दिग्दर्शक अमोल पालेकर हे नाटक वा चित्रपटांनाही ‘सेन्सॉर’ – परिनिरीक्षण मंडळ- नकोच, अशा मताचे आहेत आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देत आहेत. ‘नेते भाषणे करतात त्यांना सेन्सॉर नाही; मग कलावंत जे शब्द सादर करतात, त्यांच्यावर नजर का?’ असा सवाल पालेकरांनी केला होता. या पार्श्वभूमीवर वैचारिक आदानप्रदानाच्या मेळाव्यामधील भाषणांच्या प्रती वा तपशील मागवणे हे कितपत कायदेशीर?

मुळात पोलिसांकडे या मेळाव्याची तक्रार झाली ती, ‘आमच्या सणाच्या दिवशीच या मेळाव्याचा घाट कशाला?’ अशा सुरात. सण आहे म्हणून अनेकांना येणे जमणार नाही, इतपत ठीक. रविदास जयंतीसाठी पंजाबातील मतदानाची तारीख पुढे ढकलल्याचे उदाहरण अलीकडलेच आहे. पण जे रामनवमीसारखा सण साजरा करणार होते किंवा जे रमजानचा रोजा पाळणार त्यांचा या नास्तिक मेळाव्याशी संबंध काय? आणि नास्तिक आहोत म्हणून वैचारिक चर्चेसाठी एकत्र येऊ, असे ठरवणाऱ्यांचा या श्रद्धांशी संबंध का असायला हवा? विचारी नास्तिक माणसे इतरांच्या श्रद्धेचा अनादर करत नाहीत, हे खरे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीनेही कधी श्रद्धांचा अनादर केलेला नाही. मग कुणा सश्रद्धांना या नास्तिक मेळाव्याबद्दल वाटणारी तथाकथित भयशंका खरी मानायची की निव्वळ कुरापतखोर?

देव न मानणाऱ्याला देवाच्या नावावर सामान्यांची फसवणूक करणारे भोंदू बुवा जसे लख्खपणे दिसू शकतात तसेच देवाच्या नावावर राजकारण करणारे भोंदू राजकारणीही पटकन समजून येतात. म्हणून ही नास्तिक माणसे धोकादायक, अशी वातावरणनिर्मिती आधीच करून ठेवली जात आहे का? तशीही बुद्धीच्या बळावर एखादी गोष्ट ठामपणे नाकारणारी, न पटणाऱ्या गोष्टींबाबत प्रश्न विचारणारी माणसे कुणाला हवी असतात? ती तशी नकोच आहेत आणि त्यांना आम्ही गप्प बसवणार आहोत, असेच यापुढच्या काळातील वातावरण असेल याची झलक या घटनेतून मिळाली.  हा गप्प बसवण्याचा प्रयत्न २०१३ पासून डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्यांचा जो काही तपास न्यायालयासमोर आला आहे, त्यातून दिसलाच होता. पण आता हे प्रयत्न अधिक वाढले आहेत. आहार- पेहराव- व्यवसाय यांवरून सतत निर्माण केला जाणारा विद्वेष कमी होता की काय म्हणून आता हा आस्तिक- नास्तिकतेचा मुद्दा पुढे आणला जातो आहे का, याची शंकाही बळावते ती यामुळेच. एरवी,   शरद पवार नास्तिक आहेत असे राज ठाकरे यांनी जाहीर सभेत ‘लाव रे तो व्हीडिओ’च्या थाटात सांगणे हे हास्यास्पद ठरले असते. पण तसे ते न ठरता, पवारांचे राजकारण पसंत नसलेल्यांनीही त्या विधानावर टीका केली. नास्तिकतेचा जाहीर उल्लेख गांभीर्याने घेतला गेला. ही राज्यघटनाधारित राजकारणाच्या पीछेहाटीची लक्षणे तर नव्हेत? 

नास्तिकता किंवा धार्मिकता हे भारतीय राज्यघटनेने दिलेल्या आचार, विचार आणि उपासना स्वातंत्र्याचे पैलू आहेत. कोणता पैलू कुणाला महत्त्वाचा वाटावा याची सक्ती नाही. अशा विचारवैविध्याचा द्वेष करण्याची परंपरा भारतीय भूमीची नाही.  कुणाच्या नास्तिकतेबद्दल हिंदू धर्माने शिक्षा दिल्याचा इतिहास नाही.  मध्ययुगात एकमेकांना धर्मद्रोही, पाखंडी ठरवून  जिवंत जाळणारा धर्म किंवा सलमान रश्दी ते तस्लीमा नसरीन यांच्या शिरच्छेदाचे फतवे काढणारा धर्म आणि ‘आपला’ धर्म यांमध्ये फरक असायला हवा, याचे भान  आजही बहुसंख्याकांपैकी अनेकांना आहे.

तरीही नास्तिकांची नालस्ती केली जात असेल आणि त्यातून राजकीय लाभ घेतले जात असतील, तर ती चिंतेची बाब ठरते. राजकीय लाभांसाठी माणसांच्या खासगी जीवनावर अतिक्रमण करण्याचा परवाना कुणालाही नाही, हे लक्षात न घेणाऱ्या समाजाची योग्य ती नालस्ती करण्यास आधुनिक जगाचा इतिहास समर्थ आहेच.