अमेरिकेत ‘कालशी’ नावाची एक खासगी ‘ऑनलाईन प्रेडिक्शन मार्केट’ कंपनी आहे. या कंपनीच्या संकेतस्थळावर मुख्यतः अमेरिकेशी संबंधित घटनांवर किंव्हा गोष्टींवर ऑनलाईन सट्टा लावता येतो. ज्यावर सट्टा लावता येतो, त्यात अपेक्षित तशाच आश्चर्यकारक गोष्टींचा समावेश आहे. उदा. अमुक एक ‘रिॲलिटी शो’मधून आज कोणाची हकालपट्टी होणार; अमुक एक सिनेमाच्या पहिल्या दिवशी १०० कोटींची उलाढाल होणार की नाही; यावर्षी टेक कंपन्यांमध्ये गेल्या वर्षीच्या पेक्षा जास्त नोकऱ्या जातील की नाही; विशिष्ट खटल्यात अमेरिकन सुप्रीम कोर्ट अर्जदाराच्या वतीने निर्णय देईल की, नाही, इत्यादी! ‘फिफा आंतरराष्ट्रीय फुटबॉल चषक’ स्पर्धा हा तर ‘कालशी’चा सुवर्णकाळ ठरला, कारण सामन्यांच्या निकालांवर सट्टा लावणे जोरात सुरू होणार, हे लक्षात घेऊन खुद्द ‘फिफा’ नेच ‘कालशी’सह यासाठी भागीदारी केली होती! पण मुद्दा तो नाही…

अमेरिकेच्या वायदेबाजाराचे नियमन करणारी ‘कमोडिटी फ्यूचर्स ट्रेडिंग कमिशन (सीटीएफसी)’ ही केंद्रीय स्वायत्त संस्था अशा सट्टेबाजाराचेही नियमन करते. या यंत्रणेच्या तपासकर्त्यांना असे आढळून आले आहे की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या दीर्घकाळापासून ‘टेलिप्रॉम्प्टर ऑपरेटर’ म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने ‘कालशी’त ट्रम्प ह्यांच्या डझनहून अधिक भाषणांवर सट्टा लावून एक लाख डॉलर कमावले आहेत.

गॅब्रिएल पेरेझ हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे तांत्रिक सहाय्यक असून २०१६ पासून ते ट्रम्प यांचे टेलिप्रॉम्प्टर चालवत आहेत. वक्ता जरी समोरच्या पडद्यावर (मोठ्या, ठळक) अक्षरांतील भाषण वाचत असतो, तरी ‘टेलिप्रॉम्प्टर’ मुळे प्रेक्षकांना असा आभास होतो की वक्ता उत्स्फूर्तपणे, न वाचता, भाषण देत आहे. राष्ट्राध्यक्षांच्या भाषणांबाबतच्या अंतर्गत माहितीचा वापर करून १,००,००० डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम जिंकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि या आरोपांसंबंधी तडजोड करण्यासाठी ते वरील नियामकांशी चर्चा करत आहेत.

हेही वाचा

‘कालशी’ ने आपल्या ‘मेन्शन्स मार्केट’मधील संशयास्पद हालचालींबाबत ‘सीएफटीसी’ला सावध केले होते. या मार्केटमध्ये वापरकर्ते एखाद्या जाहीर भाषणादरम्यान विशिष्ट शब्द, वाक्प्रचार किंवा विषय उच्चारले जातील की नाही, यावर सट्टा लावू शकतात. उदा., ‘बायडेन’, ‘कमला’, ‘कतार’, ‘इलेक्शन करप्शन’, ‘पाकिस्तान’, ‘ब्लॉकेड’ यांसारख्या प्रत्येक शब्दाचा उल्लेख ट्रम्प ह्यांच्या होऊ-घातलेल्या/ चालू/ उर्वरित भाषणात होणार की नाही, यावर हे पेरेझ ‘कालशी’ वर सट्टा लावत होते. ते स्वतःच टेलिप्रॉम्प्टर चालवणार असल्याने त्यांना अध्यक्षीय भाषणाची प्रत आधीच मिळत असे; त्याचा ते फायदा घेत होते.

गंमत अशी की, ट्रम्प हे ठरलेला मसुदा सोडून अनेकदा भरकटत जात. त्यावेळीदेखील ‘चक्षुर्वै सत्यम’ अर्थात ‘आंखों देखा हाल’चा उपयोग करून पेरेझ ऐनवेळी आपल्या सट्ट्यात जरूर तो बदलही करत असत असे लक्षात आले आहे. अशा प्रकारे सट्टा खेळणे म्हणजे ‘इनसाइडर ट्रेडिंग’ (अंतर्गत माहितीचा गैरवापर करून समभाग बाजार वा समकक्ष बाजारपेठेत व्यवहार करणे) या प्रकारच्या गुन्ह्यात मोडते, कारण पेरेझ ह्यांना त्यांच्या विशिष्ट पदामुळे ही माहिती प्राप्त झाली होती; इतरांना ती उपलब्ध असणे शक्य नव्हते.

यापूर्वी अशाच स्वरूपाची दोन प्रकरणे अमेरिकेत उघडकीला आली. यातील एका प्रकरणात व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मदुरो यांना पकडण्यास गेलेल्या अमेरिकेच्या ‘स्पेशल फोर्सेस’ मधील एका सैनिकानेच मदुरोंबाबतच्या मोहिमेवर सट्टा लावून मोठी रक्कम जिंकली होती. दुसऱ्या एका प्रकरणात, कंपनीच्या अंतर्गत विदेचा वापर करून वापरकर्त्यांच्या शोधांवर (म्हणजे सर्च इंजिनवर कोणते शब्द जास्तीत जास्त शोधले जातील यावर) कथितपणे सट्टा लावणाऱ्या खुद्द ‘गूगल’च्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. ही प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत.

‘कालशी’ची स्थापना २०१८ मध्ये लेबनीज-अमेरिकन तारेक मन्सूर आणि ब्राझिलियन-अमेरिकन लुआना लोपेस लारा यांनी केली होती. हे दोन्ही सह-संस्थापक ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)’ मध्ये शिक्षण घेत असताना एकमेकांना भेटले आणि नंतर त्यांनी अमेरिकेतील ‘वाय कॉम्बिनेटर स्टार्टअप ॲक्सिलरेटर’ कार्यक्रमातून मदत मिळवून ‘कालशी’ प्लॅटफॉर्मचा विस्तार केला. हे नाव ‘कुल शे’ (किंवा ‘किलशी’) या अरबी शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ ‘सर्व काही’ असा होतो. वापरकर्त्यांना भविष्यातील जवळपास कोणत्याही घटनेवर सट्ट्याचा (कॉन्ट्रॅक्ट्स) व्यापार करण्याची संधी देणे हे कंपनीचे ध्येय वरील नावात अभिप्रेत आहे.

भारतातही अनेक नेते आपल्या ‘अमोघ’ वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. मध्यंतरी, एका पक्षाच्या अति उत्साही कार्यकर्त्याने एका कार्यक्रमाची छायाचित्रे प्रसिद्ध केलीत, त्यात अनवधानाने ‘टेलिप्रॉम्प्टर’ वरील मजकूर ठळक असल्याने दिसत होता. असे ऐकिवात आहे, की नंतर कार्यकर्त्याला कडक कानउघाडणीला सामोरे जावे लागले. सध्या तरी, भारतीय कायद्यानुसार भारतीय नागरिक ‘कालशी’ सारख्या परदेशी ऑनलाईन सट्टाबाजारांवर सट्टा लावू शकत नाहीत आणि सध्या तरी भारतात असल्या सट्टेबाज स्टार्टअपना परवानगी नाही.

मुळात ‘कालशी’ वर नोंदणी करताना, वापरकर्त्याला आपण कोणत्या देशात राहात आहोत हे जाहीर करावे लागते. तसेच ’आपण आपल्या पदामुळे प्राप्त झालेल्या माहितीचा सट्ट्यासाठी वापर करणार नाही’ अशी ग्वाही द्यावी लागते. ट्रम्प यांना चौकशा, खटले व विशेषतः नियामक कारवाया (रेग्युलेटरी एन्फोर्समेंट) यातले काहीच आवडत नाही (त्याचा काहीसा फायदा अदानींवरील अमेरिकेतील दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्येही झाला असावा). त्यातून पेरेझ हे दीर्घ काळ ट्रम्प यांच्या सेवेत असून, मर्जीतले आहेत. त्यामुळे, पेरेझ यांच्यावर झालीच तर नाममात्र कारवाई होण्याची शक्यता आहे.
baw_h1@yahoo.com