चंद्रकांत बच्छाव
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांची ओळख एखाद्या पदाने, पक्षाने किंवा एका चळवळीने पूर्ण होत नाही. ती व्यक्ती काळाच्या पलीकडे जाते आणि स्वतःच एक विचारपरंपरा बनते. डॉ. कुमार गणेश सप्तर्षी हे असेच एक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने केवळ एका ज्येष्ठ समाजवादी नेत्याचा अंत झालेला नाही; तर महाराष्ट्राच्या वैचारिक जीवनातील अस्वस्थ विवेकाचा, सत्याग्रही संघर्षाचा आणि नैतिक राजकारणाच्या आग्रहाचा एक महत्त्वाचा आवाज कायमचा शांत झाला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ही केवळ राजकीय नाही, तर बौद्धिक, नैतिक आणि सांस्कृतिकही आहे.

आजच्या काळात राजकारणाचा अर्थ सत्तेभोवती फिरताना दिसतो; समाजकारणाचा अर्थ प्रसारमाध्यमांतील उपस्थितीमध्ये हरवताना दिसतो; तर विचारांची चर्चा अनेकदा घोषणांमध्ये आणि सामाजिक माध्यमांवरील प्रतिक्रिया यांमध्ये सीमित होताना दिसते. अशा काळात डॉ. कुमार सप्तर्षी यांचे आयुष्य हे एका वेगळ्या परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे होते. त्यांनी सत्ता शोधली नाही, प्रसिद्धीचा पाठलाग केला नाही आणि लोकप्रियतेसाठी आपल्या विचारांशी तडजोडही केली नाही. त्यांनी आयुष्यभर एकाच गोष्टीचा आग्रह धरला— लोकशाही ही केवळ मतदानाची प्रक्रिया नसून ती समाजाच्या नैतिकतेची, विवेकाची आणि सतत प्रश्न विचारण्याच्या क्षमतेची जिवंत अभिव्यक्ती आहे.

महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेत महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, ग. प्र. प्रधान, बाबा आढाव, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यापासून पुढे येणाऱ्या विचारधारेचा एक सशक्त दुवा म्हणजे डॉ. कुमार सप्तर्षी. त्यांनी या परंपरेचा वारसा केवळ भाषणांत मांडला नाही; तर तो प्रत्यक्ष आयुष्यात जगून दाखविला. त्यांच्यासाठी गांधी म्हणजे केवळ चरखा नव्हता, समाजवाद म्हणजे केवळ आर्थिक सिद्धान्त नव्हता आणि संविधान म्हणजे केवळ कायद्याचे पुस्तक नव्हते. या तिन्ही गोष्टी त्यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी होत्या.

डॉ. कुमार सप्तर्षी यांचा जन्म २१ ऑगस्ट १९४१ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथे झाला. ग्रामीण महाराष्ट्रातील विषमता, दारिद्र्य, जातीय वास्तव आणि सामाजिक संघर्ष यांचे अनुभव त्यांच्या बालपणातच त्यांच्या संवेदनशील मनावर कोरले गेले. घरातून मिळालेले संस्कार, शिक्षणातून मिळालेली वैज्ञानिक दृष्टी आणि समाजातील विषमतेने निर्माण केलेली अस्वस्थता या तिन्हींचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर झाला. पुढे त्यांनी पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केले. डॉक्टर म्हणून त्यांच्यासमोर प्रतिष्ठेची आणि आर्थिक स्थैर्याची वाट खुली होती. पण त्यांनी स्वतःसाठी सुरक्षित आयुष्य निवडले नाही. पुढे अनेक दशकांनंतर त्यांनी एका संवादात म्हटले होते की, ‘रुग्णांची चिकित्सा महत्त्वाची आहे; पण समाज आजारी असेल तर व्यक्तीचे आरोग्यही टिकत नाही.’ या एका विचारात त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास सामावलेला आहे.

साठच्या दशकात भारत नव्या स्वप्नांनी भरलेला देश होता. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीला विकासाची मोठी आशा होती; परंतु त्याचवेळी दुष्काळ, बेरोजगारी, ग्रामीण दारिद्र्य, जातीय विषमता आणि प्रशासनातील भ्रष्टाचारही डोके वर काढत होता. युवकांमध्ये अस्वस्थता वाढत होती. अनेकांना बदल हवा होता; पण तो कसा घडवायचा, याची दिशा नव्हती. याच काळात कुमार सप्तर्षी यांच्या विचारविश्वावर लोकनायक जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा खोल परिणाम झाला. विशेषतः जयप्रकाश नारायण यांनी मांडलेली ‘संपूर्ण क्रांती’ ही संकल्पना त्यांना केवळ राजकीय घोषवाक्य वाटली नाही; ती समाजव्यवस्थेच्या सर्वांगीण परिवर्तनाची दिशा वाटली.

त्यांनी बिहारमधील दुष्काळग्रस्त भागात जाऊन मदतकार्य केले. महाराष्ट्रातील कोयना भूकंपानंतरही त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्यात सहभाग घेतला. संकटात सापडलेल्या माणसांसोबत राहणे, त्यांच्या वेदना समजून घेणे आणि त्यातून समाजपरिवर्तनाचा मार्ग शोधणे, ही त्यांची कार्यपद्धती होती. पुस्तकातील समाजवाद आणि प्रत्यक्ष समाजातील वेदना यांमधील अंतर त्यांनी अशा अनुभवांतून भरून काढले. याच काळात त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, भारतातील परिवर्तनाची खरी शक्ती युवकांमध्ये आहे. पण त्या शक्तीला वैचारिक दिशा देणारी संघटना आवश्यक आहे. त्या जाणिवेतून १९६७ मध्ये युवक क्रांती दल (युक्रांद) या ऐतिहासिक संघटनेचा जन्म झाला.

युक्रांद हा फक्त एक विद्यार्थी संघ नव्हता. ती महाराष्ट्रातील युवकांच्या मनात निर्माण झालेल्या अस्वस्थतेची संघटित अभिव्यक्ती होती. जात, धर्म, भाषा, पक्षीय निष्ठा यांपलीकडे जाऊन युवकांनी संविधान, सामाजिक न्याय, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लोकशाही यांसाठी संघटित व्हावे, हा युक्रांदचा मूलभूत विचार होता. त्या काळात अनेक विद्यार्थी संघटना पक्षीय राजकारणाशी जोडल्या जात असताना, युक्रांदने विचारकेंद्रित आणि मूल्याधिष्ठित राजकारणाचा आग्रह धरला.

कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर युवक शिबिरे, अभ्यासवर्ग, श्रमसंस्कार छावण्या, ग्रामविकास उपक्रम, दुष्काळ निवारण मोहिमा आणि अन्यायाविरोधातील सत्याग्रह उभे राहिले. हजारो युवकांना त्यांनी भाषणांनी नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून घडवले. त्यांच्या सहवासातून पुढे पत्रकार, प्राध्यापक, वकील, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी नेते, स्त्रीवादी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी घडले. महाराष्ट्रातील अनेक वैचारिक चळवळींच्या मागे दिसणारी कार्यकर्त्यांची पिढी ही थेट किंवा अप्रत्यक्षपणे कुमार सप्तर्षी यांच्या संस्कारातून तयार झालेली होती.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांत मोठा गुण म्हणजे त्यांनी कधीही अनुयायी निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही; त्यांनी विचार करणारे नागरिक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते नेहमी म्हणत, ‘माझ्यावर विश्वास ठेवू नका; विचारांवर विश्वास ठेवा. व्यक्ती चुकीची ठरू शकते, पण सत्याचा शोध कधीच चुकीचा नसतो.’ ही भूमिका त्यांना इतर अनेक राजकीय नेत्यांपासून वेगळे ठरवते.

पुढील काही वर्षांत येणारी आणीबाणी त्यांच्या आयुष्यालाच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या लोकशाही इतिहासालाही निर्णायक वळण देणार होती… १९७४ मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी बिहारमधून सुरू केलेल्या ‘संपूर्ण क्रांती’ च्या आंदोलनाने देशभरातील युवकांना नवी दिशा दिली. या आंदोलनाचा महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी प्रतिसाद युवक क्रांती दलाच्या माध्यमातून उमटला. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी हजारो युवकांना या आंदोलनाशी जोडले. परंतु त्यांनी युवकांना केवळ शासनाविरोधात उभे केले नाही; तर त्यांनी त्यांना स्वतःच्या जीवनाचेही परीक्षण करायला शिकवले.

भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्याने स्वतःचे जीवनही पारदर्शक ठेवले पाहिजे, सामाजिक न्यायाची भाषा करणाऱ्याने स्वतःच्या वर्तनात जातिभेदाला स्थान देता कामा नये, लोकशाहीची मागणी करणाऱ्याने मतभिन्नतेचा आदर केला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे त्यांची चळवळ ही केवळ राजकीय न राहता नैतिक चळवळ बनली. १९७७ मध्ये आणीबाणी संपली आणि देशात लोकसभा निवडणुका झाल्या. भारतीय जनतेने लोकशाहीचा विजय घडवून आणला. या परिवर्तनात कुमार सप्तर्षी यांच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांच्या त्यागाचा मोठा वाटा होता. लोकशाही वाचविण्याचा संघर्ष हा केवळ संसदेत नव्हे, तर रस्त्यावर, तुरुंगात आणि सामान्य जनतेच्या मनात लढला गेला होता.

या बदलानंतर डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. १९७८ मध्ये ते अहमदनगर शहर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. अनेकांसाठी हा सत्तेच्या केंद्रात पोहोचण्याचा क्षण असता; पण त्यांच्या दृष्टीने तो जनतेच्या संघर्षाला विधानसभेच्या व्यासपीठावर नेण्याचा मार्ग होता. त्यांनी कधीही आमदारकीचा वापर वैयक्तिक प्रतिष्ठा किंवा आर्थिक लाभासाठी केला नाही. विधानसभेत त्यांची शैली वेगळी होती. आवाज चढवून लोकप्रिय होण्याऐवजी ते अभ्यासपूर्ण मांडणी करत. प्रशासनातील त्रुटी दाखवताना ते पर्यायही सुचवत. विरोधकांवर टीका करताना वैयक्तिक पातळीवर न जाता धोरणांवर भाष्य करत. त्यांना विश्वास होता की लोकशाहीची गुणवत्ता ही विरोधी मतांचा आदर करण्यावर अवलंबून असते. तथापि, सत्तेतील राजकारणाने त्यांना फार काळ आकर्षित केले नाही. त्यांनी लवकरच ओळखले की निवडणूक राजकारणाच्या मर्यादा आहेत. निवडणुका जिंकणे म्हणजे समाजपरिवर्तन नव्हे. परिवर्तनाची खरी प्रक्रिया समाजात, शिक्षणात, युवकांमध्ये आणि विचारविश्वात घडत असते. म्हणूनच त्यांनी पुन्हा आपले लक्ष सामाजिक चळवळी, युवकांचे संघटन आणि वैचारिक कार्य यांकडे केंद्रित केले.

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी गांधीवाद आणि समाजवाद यांच्यात कोणताही विरोध पाहिला नाही. अनेकांना हे दोन विचार वेगळे वाटतात; पण सप्तर्षी यांच्या मते गांधींची नैतिकता आणि लोहियांचा समाजवाद हे भारतीय वास्तवात एकमेकांना पूरक आहेत. गांधींकडून त्यांनी सत्य, अहिंसा आणि ग्रामस्वराज्याचा आग्रह घेतला; तर समाजवादी परंपरेकडून समता, आर्थिक न्याय आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा स्वीकारली.

याच विचारातून पुढे त्यांनी ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ या संस्थेला नवजीवन दिले. अनेकांसाठी गांधी भवन ही केवळ एक संस्था होती; पण कुमार सप्तर्षी यांनी तिला विचारांचे मुक्त विद्यापीठ बनवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक आणि सामान्य नागरिक यांच्यासाठी गांधी भवन हे मुक्त संवादाचे व्यासपीठ बनले. विविध विषयांवरील चर्चासत्रे, संविधानावरील व्याख्याने, गांधीवादी विचारांचे अभ्यासक्रम, युवक शिबिरे आणि सामाजिक प्रश्नांवरील संवाद यामुळे गांधी भवन पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या वैचारिक नकाशावर ठळकपणे उभे राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली गांधी भवनाने गांधींना इतिहासात बंदिस्त ठेवण्याऐवजी वर्तमानाशी जोडण्याचा प्रयत्न केला. ते वारंवार म्हणत, ‘गांधींचा विचार संग्रहालयात ठेवण्यासाठी नाही; तो समाजाच्या विचारांत, आचरणात आणि प्रगतीत जिवंत राहण्यासाठी आहे.’

आणीबाणीचा संघर्ष, विधायक राजकारण आणि युवक चळवळीचे नेतृत्व या सर्व अनुभवांनंतर त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट ओळखली होती, समाजाचा चेहरा केवळ निवडणुकांनी बदलत नाही; तो विचारांनी बदलतो. त्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध वैचारिक पुनर्जागरणासाठी अर्पण केला. त्यांना माहीत होते की आंदोलने क्षणभंगुर असतात; पण विचार टिकून राहतात. म्हणूनच त्यांनी लेखणीला आंदोलनाइतकेच प्रभावी शस्त्र बनवले.

१९९० च्या दशकात त्यांनी ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे संपादन सुरू केले. हे मासिक महाराष्ट्रातील पुरोगामी, समाजवादी, गांधीवादी आणि संविधानवादी विचारांचे एक मुक्त व्यासपीठ बनले. त्यामध्ये राजकारण, समाज, शिक्षण, अर्थव्यवस्था, ग्रामीण प्रश्न, स्त्री-पुरुष समता, धर्मनिरपेक्षता, पर्यावरण, विज्ञाननिष्ठा आणि संविधान यांवर सातत्याने गंभीर लेख प्रकाशित होत राहिले.

डॉ. सप्तर्षी यांची लेखनशैली विशेष होती. ते विद्वान होते; पण अवघड भाषा वापरत नसत. त्यांचे लेख आक्रमक असत; पण द्वेषपूर्ण नसत. ते कठोर टीका करत; पण व्यक्तीचा अवमान कधी करत नसत. विचारांचा प्रतिवाद विचारांनीच केला पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या लेखांमध्ये गांधींचा संयम, लोहियांची सामाजिक अस्वस्थता आणि जयप्रकाश नारायणांचा लोकशाहीवरील विश्वास यांचा अद्भुत संगम दिसून येतो.

त्यांनी लिहिलेली पुस्तके आजही सामाजिक आणि राजकीय अभ्यासकांसाठी महत्त्वाची संदर्भसामग्री आहेत. ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ हे पुस्तक आणीबाणीच्या काळाचा मानवी आणि वैचारिक दस्तावेज आहे. ‘स्वप्नांच्या सापळ्यांचा देश – अमेरिका’ या प्रवासवर्णनातून त्यांनी अमेरिकन समाजाचे अंधानुकरण न करता चिकित्सक परीक्षण केले. विविध लेखसंग्रह, भाषणे आणि चिंतनपर लिखाणातून त्यांनी सतत एकच प्रश्न विचारला, ‘भारतीय लोकशाही अधिक न्याय्य, अधिक समताधिष्ठित आणि अधिक मानवी कशी होईल?’

त्यांच्या सार्वजनिक जीवनातील आणखी एक महत्त्वाचा अध्याय म्हणजे महाराष्ट्र गांधी स्मारक निधी. पुण्यातील गांधी भवनाला त्यांनी केवळ स्मृतीस्थळ राहू दिले नाही. ते विचारांच्या सतत चालणाऱ्या विद्यापीठात रूपांतरित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विविध विषयांवरील परिसंवाद, संविधान अभ्यास, युवक प्रशिक्षण, सामाजिक प्रश्नांवरील संवाद आणि गांधीवादी मूल्यांची नव्याने मांडणी या माध्यमातून त्यांनी गांधी भवनाला नवसंजीवनी दिली.

आज गांधींचा उल्लेख अनेकदा प्रतीकापुरता मर्यादित राहतो; परंतु डॉ. कुमार सप्तर्षी यांनी गांधींना वर्तमानाशी जोडले. त्यांच्या मते गांधी म्हणजे भूतकाळातील महापुरुष नव्हते; ते भविष्याचा नैतिक मार्गदर्शक होते. म्हणूनच ते वारंवार सांगत असत की, ‘गांधी समजून घ्यायचे असतील, तर त्यांचे छायाचित्र भिंतीवर लावण्यापेक्षा त्यांचे मूल्य जीवनात उतरवावे लागेल.’

डॉ. कुमार सप्तर्षी यांचा आणखी एक मोठा गुण म्हणजे त्यांनी कोणत्याही विचारधारेची अंधभक्ती केली नाही. ते समाजवादी होते; पण समाजवादातील त्रुटींवरही बोलत. ते गांधीवादी होते; पण गांधींचे चिकित्सक वाचन करायला शिकवत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अत्यंत आदर करत आणि भारतीय लोकशाहीच्या पायाभूत रचनेत संविधानाचे सर्वोच्च स्थान मान्य करत. सामाजिक न्याय, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, धर्मनिरपेक्षता आणि घटनात्मक मूल्ये यांवर त्यांचा अढळ विश्वास होता.

त्यामुळेच त्यांच्या सभांमध्ये वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र बसत. त्यांच्याशी असहमती असणारेही त्यांचा आदर करत. कारण ते व्यक्तीवर नव्हे, तर विचारांवर चर्चा करत. आजच्या ध्रुवीकरणाच्या वातावरणात ही भूमिका अधिक मौल्यवान वाटते.

काही व्यक्तींचे मूल्यमापन त्यांच्या अनुयायांच्या संख्येवर होते; डॉ. कुमार सप्तर्षी यांचे मूल्यमापन त्यांनी घडवलेल्या नागरिकांवर झाले पाहिजे. महाराष्ट्रातील असंख्य सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, विद्यार्थी आणि युवक त्यांच्या विचारांनी प्रेरित झाले. त्यांनी अनेकांना पक्षनिष्ठ कार्यकर्ते बनवले नाही; तर संविधाननिष्ठ नागरिक बनवले. हा त्यांच्या आयुष्याचा सर्वांत मोठा वारसा आहे.

२०२४ मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, मुंबई यांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या प्रदीर्घ सामाजिक, वैचारिक आणि गांधीवादी कार्याची दखल घेत त्यांना ‘कर्मवीर भूषण पुरस्कारा’ने सन्मानित केले. केंद्राचे अध्यक्ष आयु. विजय जाधव यांच्या हस्ते त्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान सत्याग्रह, समाजपरिवर्तन, लोकशाही मूल्ये आणि संविधाननिष्ठ सामाजिक बांधिलकी यांचा आयुष्यभर अखंड पुरस्कार करणाऱ्या एका तपस्वी कार्यकर्त्याला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राने वाहिलेला आदराचा मुजरा होता. आज त्यांच्या निधनानंतर या सन्मानाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. तो केवळ पुरस्कार नव्हता; तर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या समतावादी परंपरेतून एका निष्ठावान समाजपुरुषाला अर्पण करण्यात आलेली कृतज्ञ अभिवादनाची मानवंदना होती.

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्याबद्दल लिहिताना केवळ त्यांच्या कार्याची स्तुती करून थांबणे योग्य ठरणार नाही. त्यांनी स्वतः आयुष्यभर प्रश्न विचारण्याची संस्कृती जोपासली. त्यामुळे त्यांच्याबद्दलही चिकित्सक चर्चा होत राहिली पाहिजे. त्यांनीही कधी स्वतःला अंतिम सत्य मानले नाही. उलट ते म्हणत, ‘मतभेद ही लोकशाहीची ताकद आहे; मतभंग ही तिची शोकांतिका आहे.’ हीच त्यांची बौद्धिक प्रामाणिकता होती. डॉ. कुमार सप्तर्षी यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ चळवळीचे नेते नव्हते; ते विचार घडविणारे मार्गदर्शक होते. त्यांच्या सभांमध्ये किंवा अभ्यासवर्गांमध्ये उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असे. मतभेदांना ते कधीही वैयक्तिक विरोध मानत नसत; उलट चिकित्सक चर्चा हीच लोकशाहीची खरी ताकद आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. ते समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकत, तर्काने उत्तर देत आणि विचारांच्या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे त्यांच्या सहवासातून बाहेर पडणारे कार्यकर्ते केवळ एखाद्या संघटनेचे सदस्य राहत नसत; ते विवेकशील, संविधाननिष्ठ आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव असलेले नागरिक बनत. हीच त्यांच्या नेतृत्वाची सर्वात मोठी ओळख होती.

आज महाराष्ट्र एका विचित्र वळणावर उभा आहे. सार्वजनिक संवादात संयम कमी होत आहे; मतभेदांना वैराचे रूप दिले जात आहे; विचारांची जागा प्रचाराने घेतली आहे; संविधानावरील चर्चा अनेकदा राजकीय सोयीपुरती मर्यादित राहते. अशा काळात कुमार सप्तर्षी यांची आठवण केवळ श्रद्धांजली म्हणून न राहता, ती आत्मपरीक्षणाची संधी ठरली पाहिजे. त्यांनी आपल्याला शिकवले की, लोकशाही मतदानाने जिंकली जाते; पण ती टिकते विवेकाने. समाजवाद घोषणांनी येत नाही; तो समान संधी निर्माण करण्यातून येतो. गांधीवाद म्हणजे भूतकाळाची पूजा नव्हे; तर वर्तमानातील हिंसा, द्वेष आणि असमानतेविरुद्ध उभे राहण्याचे नैतिक धैर्य आहे. संविधान हे न्यायालयात ठेवण्याचे पुस्तक नाही; तर समाजाच्या दैनंदिन आचरणाचे मूल्यपुस्तक आहे.

डॉ. कुमार सप्तर्षी हे आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत; परंतु महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारविश्वात, युवकांच्या विवेकात, संविधाननिष्ठ संघर्षात आणि लोकशाहीच्या नैतिक इतिहासात त्यांचे स्थान कायम राहील. त्यांना भावपूर्ण विनम्र अभिवादन.

लेखक मुंबई-स्थित ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रा’चे सरचिटणीस आहेत.