दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा उत्साहात साजरा होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 'विचारांचे सोने' लुटण्यासाठी कानाकोपऱ्यातील शिवसैनिक या मेळाव्यासाठी येत असत. शिवसेनेत विचारालाही महत्व आहे, याची ग्वाही देणारा हा दिवस! अलीकडे मात्र, यावर कोणाचा, अगदी वैचारिक युती असलेल्या भाजपचाही विश्वास राहिलेला नसावा. कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनसमयी आणि क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर व शहरियार खान यांच्या बैठकीच्या वेळी सैनिकांनी बळाचा वापर केला आणि भाजपचे अरुण जेटली यांनी विचारांच्या मुद्द्यावरून सेनेला फटकारले. गेल्या आठवडाभरात घडून गेलेल्या या या घटनांमागेही 'विचार' होता, असे शिवसेनेचे नेते वारंवार सांगत असले तरी भाजपला ते मान्य नाही, असे दिसते. या मुद्द्यावरच सेना आणि भाजप यांच्यातील दरी आता रुंदावलेली असताना, आज शस्त्रपूजेचे निमित्त साधत, दादरच्या शिवसेना भवनासमोर एक झणझणीत फलक लावून शिवसेनेने एक नवे हत्यार भाजपविरोधात परजलेले दिसते. बाळासाहेबांसमोर माना झुकविणाऱ्यांना त्या दिवसांचा विसर पडला का, असा सवाल करणाऱ्या या फलकावर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील बाळासाहेबाना आदराने अभिवादन करत असल्याची छायाचित्रे आहेत. त्या दिवसांची आठवण आज भाजपला करून देण्यामागील शिवसेनेच्या नेमक्या उद्दिष्टाबाबत आज तर्कवितर्क लढविले जात आहेत. बाळासाहेबांप्रमाणे, आताचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची छायाचित्रेही या फलकावर आहेत. भूतकाळातील त्या घटनांचा वर्तमानाशी संबंध जोडणारा तो एक सांकेतिक धागा मानून भाजपमध्ये त्यावर प्रतिक्रिया उमटणे साहजिक होते. तसेच घडले. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व आदरणीय होते, म्हणून त्यांच्यासमोर झुकणाऱ्यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासमोरही झुकावे अशी अपेक्षा असेल तर ते गैर आहे, अशा शेलक्या शब्दांत भाजपने त्याची खिल्लीही उडविली आहे. एकंदरीत, शिवसेनेच्या कोणत्याच हत्याराचा वार अंगावर न घेताच परतवून लावायचा असा चंगच भाजपने बांधलेला दिसतो. आजचे हे हत्यार धार लावून परजल्यानंतरही बूमरँगच ठरणार असे दिसू लागल्याने, उद्याच्या दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटताना शब्दांच्या परजलेल्या तलवारींचे घाव भाजपवर बरसणार असे मानण्यास भरपूर वाव आहे. उद्याच्या मेळाव्यात पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे हे आपल्या विचारांचे सोने शिवसैनिकांच्या मनावर उधळणार आहेत. त्यासोबतच, वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी रावण दहनाचा भव्य कार्यक्रमही करण्यात येणार आहे. या दहनानंतरचे चटके नेमके कुणाला बसणार आणि त्याची धग लागल्यानंतर कोणत्या प्रवृत्ती जाग्या होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शब्दांचे वार उद्या भाजपला झेलावे लागणार, हे स्पष्टच असल्याने, भाजपने शमीच्या झाडावर ठेवलेली हत्यारे पुजण्यास आज सुरुवातही केली असेल. एकंदरीत, राजकारणाच्या मैदानावर एका नव्या युद्धाची नांदी झाली आहे. वैचारिक धाग्याने एकमेकांशी बांधल्याच्या वल्गना करणाऱ्या या सोयीस्कर मित्रांचे खरे चेहरे उघड होण्याची वेळ आता जवळ आली आहे, एवढे खरे!