वयाचे अठरावे वर्ष गाठण्याआधीच गेल्या तीन वर्षांत १५ हजार मुली माता झाल्या, ही आकडेवारी बालविवाहांचेही वास्तव उघड करते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राच्या आदिवासी भागात बालविवाहांचे प्रमाण वाढल्यामुळे अल्पवयीन मातांची संख्या गेल्या तीन वर्षांत १५ हजार २६३ असल्याची माहिती खुद्द महिला व बालविकासमंत्र्यांनीच विधानसभेत दिली असून ती धक्कादायक आहे. अस्वस्थ करणारी बाब म्हणजे ही आकडेवारी केवळ बालविवाहांची नसून १५ ते १८ या वयात माता झालेल्या मुलींची आहे. ही उघड झालेली आकडेवारी असेल तर अशा उघडच होऊ न शकलेल्या घटना किती असतील? ही तर आदिवासी भागामधली आकडेवारी असे म्हणून कोणत्याच घटकाला त्यापासून पळ काढता येणार नाही. कारण त्याव्यतिरिक्त ग्रामीण भागातच नाही, तर अगदी शहरी भागातही बालविवाह होत नाहीत, असे कुणीच छातीठोकपणे सांगू शकणार नाही. आपल्याकडे २००६ साली बालविवाह प्रतिबंध कायदा झालेला असला तरी त्यानंतरही आपल्या समाजात बालविवाह होतात, हे अगदी ढळढळीत सत्य आहे आणि ते नाकारण्यात काहीच हशील नाही. पण आत्ता पुढे आलेल्या आकडेवारीला वेगळा संदर्भ आहे. तो आहे करोनाकहराचा. बरोबर तीन वर्षांपूर्वी याच महिन्यात भारतातही पसरू लागलेल्या करोनाच्या महासाथीने जगभरात ज्या काही उलथापालथी घडवल्या त्याचे सामाजिक परिणाम अद्यापही समजून घेतले जात आहेत. वाढलेले बालविवाह हा त्यातलाच एक परिणाम असू शकतो. मुलींना घरात ठेवण्याची जोखीम घेण्यापेक्षा त्यांचा विवाह लावून देण्याचा पर्याय या काळात निवडला गेलेला असू शकतो. मुलींचे लग्नाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर नेण्याची चर्चा सुरू असताना लहान वयातच त्यांचे हात पिवळे करून त्यांच्यावर मातृत्व लादले जाण्यात वाढ होणे हे व्यक्ती म्हणून त्यांच्याच नाही तर एकूण समाजाच्या देखील अजिबातच हिताचे नाही.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15263 minor girl become mothers in maharashtra tribal districts in three years zws