प्रदूषण टाळण्यासाठी पेट्रोल/डिझेलऐवजी वीज वापरायची आणि ती वीज दुसरीकडे अत्यंत प्रदूषणकारी कोळसा जाळून तयार करायची हा दुटप्पीपणाच..

तीन वर्षांच्या खंडानंतर राजधानी दिल्लीत ‘ऑटो एक्स्पो’ हे वाहन उद्योगाचे भव्य प्रदर्शन नुकतेच सुरू झाले. एकाआड एक वर्षांत भरणाऱ्या या प्रदर्शनाकडे मोटारप्रेमींचे तसेच उद्योग म्हणून या क्षेत्रात रस घेणाऱ्या सर्वाचे लक्ष असते. करोनामुळे हे प्रदर्शन दोन वर्षे झाले नाही. विविध मोटार कंपन्यांच्या नवनव्या मोटारी, त्यांची प्रारूपे, त्यातील नवनवीन संशोधन, गुंतवणूक अशा विविध अंगांचे दर्शन या वार्षिक प्रदर्शनात होते. सर्वसामान्य मोटारप्रेमींसही या प्रदर्शनास भेट देण्याची संधी असल्याने गर्दी जमवण्यासाठी नेहमीच्या क्लृप्त्याही मुबलक वापरल्या जातात. विविध कंपन्यांचे प्रमुख, वाहनांचे आरेखन करणारे आदींचा या प्रदर्शनात मोठा सहभाग यात असतो. त्यामुळे मोटारनिर्मिती उद्योगाची आगामी दिशा सहजपणे या प्रदर्शनात लक्षात येते. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी वाहन उद्योगाची गती अत्यंत महत्त्वाची. याचे कारण असे की गृहबांधणी क्षेत्राखालोखाल वाहन उद्योग हे असे क्षेत्र आहे की ज्यात वेगवेगळ्या अनेक क्षेत्रांचा संगम होतो. पोलाद, प्लास्टिक, मोटार साचेनिर्मिती, रबर, इलेक्ट्रॉनिक सामग्री आदी अनेक क्षेत्रांची मागणी एका मोटार उद्योगामुळे वाढते. हे सत्य लक्षात घेता दिल्लीत सुरू झालेल्या ‘ऑटो एक्स्पो’कडे पाहिल्यास काय दिसते? या प्रदर्शनाकडे वरवर पाहिले तरी ठसठशीतपणे समोर येणारी बाब म्हणजे विजेवर चालणाऱ्या मोटारींचा या प्रदर्शनात झालेला सुळसुळाट. यंदाचे ‘ऑटो एक्स्पो’ हे त्यामुळे विद्युत वाहननिर्मितीचे प्रदर्शन केंद्र बनले असून जवळपास सर्वच कंपन्यांनी आपापल्या विजेवर चालणाऱ्या मोटारी सादर केल्या आहेत. ते पाहिल्यावर पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या मोटारींस जणू काही भवितव्यच नाही, असा प्रश्न पडावा. पर्यावरण रक्षणाच्या हेतूने विजेवर चालणाऱ्या मोटारींचा सुळसुळाट होणार हे यावरून सहज लक्षात येत असले तरी या सगळय़ात सुझुकी मोटार कंपनीचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांचे म्हणणे भानावर आणणारे ठरावे.

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
India, Manufacturing Sector, Surges, 16 Year High, in March, HSBC PMI, production sector, finance, finance knowledge, financial decision,
निर्मिती क्षेत्राचा १६ वर्षांचा उच्चांकी जोम; मार्चचा ‘पीएमआय’ निर्देशांक विक्रमी ५९.१ गुणांवर
mumbai pune share 51 percent of total sales in housing market
घरांच्या बाजारपेठेत मुंबई, पुण्याचा ५१ टक्के वाटा; तिमाहीत सात महानगरांत १.३० लाख घरांची विक्री

‘‘पर्यावरण रक्षणार्थ आणि कर्ब उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी भारताने फक्त विजेवर चालणाऱ्या मोटारनिर्मितीवर लक्ष केंद्रित करू नये,’’ असे सुझुकी म्हणाले. त्यांचे हे विधान भानावर आणणारे आहे. कारण सध्या विजेवर चालणाऱ्या मोटारींबाबत जो काही अतिउत्साह दाखवला जातो आहे, तो एकाच वेळी हास्यास्पद आणि चिंताजनक ठरतो. याचे कारण या सर्व वीज-उत्साहात अत्यंत महत्त्वाच्या अर्थकारणाकडे दुर्लक्ष होते. म्हणून त्याबाबतच्या काही मुद्दय़ांचा येथे आढावा घेणे समयोचित ठरावे. यात सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी आवश्यक बॅटरीतील मूलभूत घटक लिथियम. त्याचे साठे जगातच मर्यादित आहेत आणि त्यांवरील मालकीसाठी देश आणि ‘टेस्ला’सारख्या कंपन्यांत आधीच जीवघेणी स्पर्धा सुरू झालेली आहे. याचा परिणाम दिसतो तो अर्थातच लिथियमच्या दरवाढीत. जे लिथियम अवघ्या तीन वर्षांपूर्वी, २०१९ साली, ५०० डॉलर प्रति टन अशा दरात उपलब्ध होते. आता त्याचा दर दहापट वाढून पाच हजार डॉलर्स प्रति टन इतका झाला आहे. ‘क्रिसिल’सारख्या वित्तसंस्थेच्या पाहणीनुसार पुढील सात वर्षांत, २०३० पर्यंत, लिथियमच्या मागणीत तब्बल १०० पट वाढ होण्याची शक्यता आहे. इतकी मागणी वाढणार असेल तर दरवाढही आलीच. लिथियमचे आव्हान हा यातील एक भाग झाला.

आणखी वाचा – Auto Expo 2023: LML ची धमाकेदार एंट्री, सादर केला देशातील पहिला 360 डिग्री व्यू कॅमेरावाला Star Electric Scooter

तांबे या धातूचीही तितकीच गरज या बॅटऱ्यांत असते. त्याचीही आपल्याकडे टंचाई आहे. ‘वेदांत’चा तांबे प्रकल्प वादात सापडल्यापासून वर्षांला जवळपास चार लाख टन तांब्याची कमतरता आपणास भासू लागली आहे. यावर उतारा एकच. तो म्हणजे आयात. ती आपल्याकडे वाढू लागली असून त्याचाही परिणाम किमतीवर होणार हे उघड आहे. २०३० सालापर्यंत २०० गिगावॅट इतकी वीज केवळ मोटारींसाठी लागेल असा आपला अंदाज आहे. सर्व उभारणी आहे ती त्या दिशेने. हे उद्दिष्ट साध्य करावयाचे असेल तर बॅटऱ्यांची मागणी वाढणार आणि लिथियम, तांबे यांच्याप्रमाणे निकेल, मँगनीज, कोबाल्ट आदींच्या मागणीतही वाढ होणार. एका अंदाजानुसार तोपर्यंत आपणास ३५ हजार टन निकेल आणि ११ हजार टन मँगनीज आणि तितक्याच कोबाल्टची गरज लागेल. हे सर्व अर्थातच आयात करावे लागणार आहे. यावर नैसर्गिक प्रश्न असा की या सर्वास काही पर्याय आहे किंवा नाही? सोडियम-आधारित बॅटऱ्या हा यासाठी एक पर्याय. जगभरात आताच लिथियम या तुलनेने दुष्प्राप्य मूलद्रव्यास पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू असून सोडियम-आधारित बॅटऱ्या हे याचे उत्तर दिसते. लिथियमच्या तुलनेत सोडियम-आधारित बॅटऱ्या कमी खर्चीक मानल्या जातात आणि त्यासाठीचे अन्य घटकही सहज उपलब्ध आहेत. आपल्याकडे ‘रिलायन्स’सारख्या उद्योगसमूहांनी सोडियम-आधारित बॅटऱ्या निर्मितीसाठी मोठी आघाडी घेतली आहे. गतसाली ‘रिलायन्स’ने सुमारे १२ कोटी डॉलर्स खर्चून या क्षेत्रातील इंग्लंड-स्थित कंपनी खरेदी केली. सोडियम-आधारित बॅटऱ्या निर्मितीत ही कंपनी अन्यांच्या तुलनेत बरीच पुढे असल्याचे मानले जाते. पण याबाबतचे दावे व्यावहारिक पातळीवर अद्याप तरी सिद्ध व्हायचे आहेत.

आणखी वाचा – Auto Expo 2023: 300 किमी रेंज असलेली जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक सादर; पाहा भन्नाट फीचर्स आणि किंमत…

तेव्हा सुझुकी म्हणतात त्याप्रमाणे विजेवर चालणाऱ्या बॅटऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून राहता येणारे नाही. अलीकडेच केंद्र सरकारने आपले हायड्रोजन धोरण जाहीर केले. ‘हायड्रोजनला ऑक्सिजन’ या संपादकीयातून (६ जानेवारी ’२३) ‘लोकसत्ता’ने त्यावरील चर्चा केली. त्यातही हाच मुद्दा होता. एखादे विशिष्ट इंधन हे प्रचलित इंधनास पर्याय ठरते असे होत नाही. मुळात ऊर्जा ही अनेक मुखांनी भागवण्याची भूक असून त्यासाठी एकावरच लक्ष केंद्रित करून चालत नाही. सुझुकी यांच्या म्हणण्याचा हा अर्थ आहे. खुद्द सुझुकी आपल्या कंपनीमार्फत अनेक स्वतंत्र वा संमिश्र इंधनावर चालणाऱ्या वाहननिर्मितीस उत्तेजन देत असून याच मार्गाने अनेकांस जावे लागेल असे दिसते. खरे तर वाहननिर्मिती क्षेत्रात आपण जपानसारख्या एके काळच्या अग्रेसर देशास कधीच मागे टाकले आहे. गतसाली आपल्या देशांतर्गत आणि बाहेर ४२ लाख ५० हजार मोटारी विकल्या गेल्या. चीन आणि अमेरिका यांच्यापाठोपाठ त्यामुळे भारताच्या वाहनविषयक बाजारपेठेने तिसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारली आहे.

आणखी वाचा – Auto Expo 2023: टोयोटाने सादर केली हायड्रोजन कार; धुराऐवजी पाणी सोडणाऱ्या कारमध्ये ‘हे’ आहे खास

ही गती आगामी काळात अर्थातच वाढेल. अशा वेळी विजेवर चालणाऱ्या मोटारींवरच इतका भर देणे योग्य नाही. याचे कारण सद्य:स्थितीत आणि आगामी काळातही विजेवर चालणाऱ्या मोटारी या महागच असतील. त्यांच्या किमतीत सद्य:स्थितीत तरी घट होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे वातावरणीय प्रदूषण कमी करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या मोटारी हा प्रभावी मार्ग आहे, यात तितकेसे तथ्य नाही. प्रदूषण टाळण्यासाठी पेट्रोल/डिझेलऐवजी वीज वापरायची आणि ती वीज दुसरीकडे अत्यंत प्रदूषणकारी कोळसा जाळून तयार करायची असा हा आपला दुटप्पीपणा.
सुझुकी यांच्या वक्तव्यामुळे तो अधोरेखित होतो. भारत वाहननिर्मितीत जगात पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो, असे सांगतानाही सुझुकी यांनी अत्यंत सावधगिरीची भाषा वापरली आणि भारतास बरेच काही करावे लागेल असे सूचित केले. भारतात येऊन भारत किती महान आहे आणि अधिक महान होऊ घातला आहे हे सांगण्याच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अलीकडच्या स्पर्धेत सुझुकी यांची स्पष्टोक्ती खचितच शहाणी आणि सुखावणारी..