बिहारची गेल्या तीन दशकांतली राजकीय वाटचाल पाहाणार्‍यांस भारत भूषण याच्या ‘एन्काऊंटर’ने सत्येंद्र दुबे या तरुण अभियंत्याच्या हत्येचे स्मरण होणे स्वाभाविक…

भारत भूषण तिवारी हे नाव आणि ते धारण करणारी व्यक्ती तशी अपरिचित. आपल्या महाप्रचंड देशाच्या कानाकोपर्‍यात जे कोणी जमेल तसे सामाजिक, प्रशासकीय मुद्दे उपस्थित करत, व्यवस्थेशी लढा देत इतरांवरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करत असतात अशा हजारोंतील हा एक. बिहारमधील भोजपूर नजीकचे बिलौटी हे त्याचे गाव. तेच कार्यक्षेत्र. अलीकडे खेड्यात पायाभूत म्हणतात तशा काही सेवा नसतील, दारिद्र्य तेथील वातावरणात, रस्ते नसलेल्या खड्ड्यांत, रोगट आरोग्य व्यवस्थेत, कोरड्या नळांत, पानमसाले खाऊन पचापच थुंकणार्‍या तेथील चौपालांवर ठासून भरलेले असेल. पण तरीही अशा गावांत एक ‘सेवा’ हमखास असते. ती म्हणजे ‘वाय-फाय’. रिकाम्या हातांचे आणि त्याहून रिकाम्या डोक्यांचे ओझे वागवणार्‍या आणि त्याची जाणीव नसणार्‍या लाखो तरुणांसाठी हे ‘वाय-फाय’ हेच जगण्याचे प्रयोजन. या वाय-फायच्या आधारे समाजमाध्यमांतील उकिरडे फुंकणे हे आज अनेकांच्या दिनक्रमाचे मुख्य कर्तव्य आहे. तथापि असे उकिरडे फुंकणारे अन्य आणि भारत भूषण यांच्यात एक मूलभूत फरक होता. तो म्हणजे या समाजमाध्यमी साधनांद्वारे सरकारची निष्क्रियता, भ्रष्टाचार, मुख्य म्हणजे सामान्यांबाबत सरसकट दिसून येणारी सरकारी व्यवस्थेतील अनास्था तो उघड करत असे. आपल्या हालअपेष्टांस जबाबदार असणार्‍यांचे पितळ उघडे पाडत असे. आणि त्यातून स्थानिक प्रशासनाचा रोष ओढवून घेत असे. असा हा अगदी स्थानिक भारत भूषण बिहारमधील एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा का बनलेला आहे?

त्या परिसरात गेल्या वर्षी गंगेस मोठा पूर आला. पुराच्या पाण्याखाली गेलेल्या नागरिकांचे सरकारने बिलौटी गावी स्थलांतर केले. या विस्थापनाला वर्ष झाले असेल. स्वत:च्या समाजमाध्यमी खात्यातून या विस्थापितांच्या वास्तविक कहाण्यांचे प्रक्षेपण दररोज करणे हा भारत भूषणचा महत्त्वाचा उद्योग. यातील एकेकाच्या घरी जायचे, वास्तवाचे चित्रण करायचे, त्यांना काय आश्वासने दिली होती आणि प्रत्यक्षात स्थिती काय याची नोंद करायची आणि स्वत:च्या समाजमाध्यमी खात्याद्वारे हे वास्तव सर्वदूर पोहोचवायचे हे काम तो इमाने-इतबारे करत आला. यातील एकाच्याही जगण्यात भारत भूषण याचे कसलेही हितसंबंध नव्हते आणि त्यांचा काही उपसर्गही भारत भूषण यास नव्हता. तरीही तो हे काम निष्ठेने करत राहिला. तसेच; साधे रेशन कार्ड मिळवण्यातील भ्रष्टाचार, सरकारी अधिकार्‍यांची नागरिकांवरील अरेरावी, गावातील भीषण आरोग्य व्यवस्था, किमान स्थानिक सुविधांचा अभाव असे अनेक मुद्दे भारत भूषण याच्याकडून हाताळले जात. नियमितपणे प्रकाशित होणार्‍या त्याच्या या वृत्तांताची प्रतीक्षा अनेकांस असे. इतक्या दरिद्री, सर्वसुखांपासून वंचित अशा या प्रदेशात भारत भूषण याच्या समाजमाध्यमी खात्याचे दोन लाखांहून अधिक ‘अनुयायी’ होते आणि त्यात दिवसेंदिवस वाढ होत होती. आता या खात्याचे काय होणार, त्यांच्या अनुयायांस अन्य काही पर्याय मिळणार का आणि मुख्य म्हणजे स्थानिक प्रश्नांस वाचा फोडणारा असा अन्य कोणी भारत भूषण तयार होणार का, असा प्रश्न बिलौटीकरांना पडलेला आहे. तो भारत भूषण याच्या केविलवाण्या आईवडिलांनाही पडला. त्यांच्या तर हालास पारावार राहिलेला नाही. बिचारे, केविलवाणे म्हातारा-म्हातारी अन्य कोणाही घरात परत भारत भूषण तयार होऊ नये, असेच सांगत आहेत.
कारण भारत भूषणचे गेल्या आठवड्यात ‘एन्काउंटर’ झाले. भर दिवसा. पोलिसांनी बिलौटीतील त्याच्या पडक्या, खंगलेल्या घराला वेढा घातला. जम्मू-काश्मिरातील कोणा कथित दहशतवाद्याचे ते आश्रयस्थान भासावे असे ते चित्र. त्या परिस्थितीतही भारत भूषण डगमगला नाही. आपल्या घराला पडलेल्या पोलिसी वेढ्याचे तो ‘थेट प्रक्षेपण’ करत राहिला आणि त्याचे लक्षावधी ‘अनुयायी’ आपापल्या मोबाइलवर ते पाहात राहिले. आपल्या सामाजिक कामाचा रेटा भारत भूषण याने जरा जास्तच गांभीर्याने घेतला होता. त्याला स्थानिक गुंडपुंडांकडून धमक्याही येऊ लागल्या. त्यामुळे स्वत:च्या बचावाचे एक तरी साधन असावे म्हणून त्याने आपल्या अंगावरचा एकमेव दागिना मोडून त्या पैशातून गावठी पिस्तूल विकत घेतले. पोलिसांच्या वेढ्यास प्रत्युत्तर म्हणून तो ते पिस्तूल मिरवू लागला. त्याचेही थेट प्रक्षेपण करू लागला. या पिस्तूल-प्रदर्शनाच्या जोडीने त्याचे धावते समालोचन सुरू होते. स्थानिक अधिकार्‍यांचा नामोल्लेख करत त्यांच्याकडून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे कसे दुर्लक्ष होत आहे हे तो सांगत राहिला. आधीही हे तो म्हणत होताच. पण आता त्यास ‘धमक्या’ असे सरकारी अधिकारी संबोधू लागले. अमुक तारखेच्या आत हे काम झाले नाही तर मी मोर्चा घेऊन येईन, धरणे आंदोलन करेन अशा प्रकारच्या त्याच्या ‘धमक्या’. सरकारी अधिकारी त्याच्या या धमक्यांना ‘सरकारी कामांतील अडथळा’ ठरवू लागले. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करायला हवा अशी मागणी जोर धरू लागली. बिहारी परिभाषेत असा बंदोबस्त करण्यास ‘ठोक दो’ असे म्हणतात, हे तर सर्व भारत जाणतो. त्याप्रमाणे तशी तयारी झाली. पोलिसांस आपली कर्तव्यपरायणता दाखवण्याची संधी मिळाली. त्याप्रमाणे भारत भूषण याच्या घरास रात्रभर वेढा घातल्यानंतर पोलिसांनी त्यास सकाळी आपल्यासमवेत ‘थाने चलना है’ असे फर्मावले. त्यांच्या समवेत तो निघाला. तासाभराने पोलिसांचे प्रसिद्धिपत्रक प्रसृत झाले. ‘‘स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात भारत भूषण जबर जखमी झाला आणि इस्पितळाच्या वाटेवर त्याचे प्राणोत्क्रमण झाले.’’

बिहार निरीक्षकांस भारत भूषण याच्या ‘एन्काऊंटर’ने सत्येंद्र दुबे या तरुण अभियंत्याच्या हत्येचे स्मरण झाले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘सुवर्ण चतुष्कोन’ योजनेत रस्ते बांधणीच्या प्रकल्पात अभियंता म्हणून सत्येंद्र सहभागी होता. रस्ते उभारणी ही भ्रष्टाचाराची आद्यगंगा. राज्य कोणतेही असो. गुळगुळीत रस्त्यापेक्षा त्यातील पैशाच्या कंत्राटी सुळसुळाटात ज्यास रस आणि गती आहे असे राजकारणी जनहिताच्या नावाने पहिला प्रकल्प हाती घेतात तो रस्ते उभारणीचा. हा भ्रष्टाचार त्याहीवेळी होता आणि आता तर बोलण्याचीही सोय नाही. त्यावेळी सत्येंद्र दुबे या अभियंत्याने या भ्रष्टाचारास विरोध केला. प्रत्यक्ष खर्चापेक्षा कित्येक पट अधिक वाढवून सांगितला जाणारा प्रकल्प खर्च त्यास मान्य नव्हता. त्याच्या विरोधाने संबंधितांची चांगलीच अडचण झाली. सर्व तडजोडीचे प्रयत्न करून झाले. ते अयशस्वी ठरले. सत्येंद्र ‘तडजोडी’स तयार नव्हता. अखेर त्यास ‘ठोक डालो’ असा आदेश संबंधितांनी दिला आणि सत्येंद्रची हत्या झाली. ही २००३ सालची घटना. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने हे प्रकरण लावून धरल्याने तिचा बभ्रा झाला आणि त्याप्रकरणी चौकशी होऊन अलीकडे संबंधित आरोपींस शिक्षा झाली. हे प्रकरण घडले त्या वेळी बिहारचे मुख्यमंत्री होते लालू प्रसाद यादव.

त्यांच्या या भ्रष्टाचाराने देशभरातील समस्त मध्यमवर्गीय नैतिक संतप्त झाले आणि लालूंविरोधात संतापाची लाट उसळली. लालू देशभर बदनाम झाले त्यात मोठा वाटा सत्येंद्रच्या हत्येचा होता. आज बिहारचे मुख्यमंत्री आहेत त्यावेळी लालूंविरोधात भ्रष्टाचाराची राळ उडवून देणार्‍या भाजपचे सम्राट चौधरी. तेव्हाचे नैतिकतावादी आता मौनात आहेत. पण बिहारी सामान्य जन, राजकीय पक्ष यांनी भारत भूषणच्या सरकारी हत्येविरोधात आवाज उठवला असून तो रोष पाहून भाजपच्या सम्राटास दोषी पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करून न्यायालयीन चौकशीची घोषणा करावी लागली. तेव्हा सत्येंद्र. आता भारत भूषण. गेल्या २३ वर्षांत मग नक्की बदलले काय?