भाजपच्या मतांत झालेली लक्षणीय घट हा तीन भाजपशासित राज्यांतील पोटनिवडणूक निकालाचा समान धागा. त्यास पार्श्वभूमी आहे ती ‘जेन झी’च्या आंदोलनाची…

एक वा दोन पोटनिवडणुकांच्या निकालांतून आपल्यासारख्या गुंतागुंतीच्या आणि अवाढव्य राजकीय पटलावरील वार्‍याचा अंदाज बांधणे अयोग्य, हे मान्य. बर्‍याचदा पोटनिवडणुकांचे निकाल आणि त्यानंतरचे निवडणुकोत्तर चित्र यांत काही साम्य असेलच असे नाही, हेही मान्य. पोटनिवडणुकांतील मतदान हे स्थानिक आणि तात्कालिक मुद्द्यांवर होते; हे अमान्य करता येणार नाही. तरीही तीन राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुका निकालांत एक साधर्म्य दिसून येते. त्याकडे काणाडोळा करणे अवघड इतके ते स्पष्ट आहे. बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांतील तीन विधानसभा मतदारसंघांसाठी या निवडणुका झाल्या. यापैकी बिहार आणि मध्य प्रदेशात भाजपला पराभव सहन करावा लागला. गुजरातेत भाजपस विजय मिळाला. पण मताधिक्यात सणसणीत घट झाली. या निकालांचे विश्लेषण आवश्यक.

भाजपसाठी यातील सर्वात जिव्हारी लागेल तो बिहारातील पराभव. त्यामागील कारणे अनेक. ही पोटनिवडणूक बांकीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे नितीन नवीन यांच्या दिल्लीतील पदोन्नतीमुळे घ्यावी लागली. देशात भाजपचे सर्वात सुरक्षित असे जे काही मतदारसंघ असतील त्यातील एक हा बांकीपूर. इतका सुरक्षित की या मतदारसंघात भाजपच्या वतीने कुत्रे/ मांजर जरी उभे केले तरी जिंकेल असे वक्तव्य भाजपचे वाचाळ रविशंकर प्रसाद यांनी केले होते. अशा वक्तव्यांतून प्रसाद यांच्यासारख्याचा राजकीय पोकळपणा भले दिसत असेल; पण तरी त्यांनी असे विधान करण्यामागे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि अर्थातच राजकीय कारण आहे. ऐतिहासिक कारण म्हणजे १९९५ पासून हा मतदारसंघ फक्त आणि फक्त भाजपकडे आहे. आधी भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचे तीर्थरूप नवीन किशोर सिन्हा यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. घराणेशाहीस तीव्र विरोध असणार्‍या भाजपत पुढे हा मतदारसंघ वारसा हक्काने बाळ नितीन नवीन यांस मिळाला. तो त्यांनी सलग पाच वेळा जिंकून दाखवला. भाजपसाठी जे जे सोयीचे, आवश्यक ते ते सारे काही या मतदारसंघात आहे. उच्चवर्णीयांचे प्राधान्य, बिहारात भाजपानुकूल कायस्थांची लक्षणीय संख्या, शहरी तोंडवळा आणि चांगल्या पायाभूत सुविधा, महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था, बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि इतकेच काय भाजपचे राज्यस्तरीय मुख्यालयदेखील याच मतदारसंघात मोडते. आणि तरीही या इतक्या अतिसुरक्षित मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. या पराभवाच्या गांभीर्याची तुलनाच करायची झाल्यास ती गेल्या लोकसभा निवडणुकीत फैजाबाद- याच मतदारसंघात हिंदू राष्ट्रीय अस्मितेचे इत्यादी प्रतीक असलेली अयोध्या मोडते- मतदारसंघातील भाजपच्या पराजयाशी करता येईल. किंबहुना बांकीपुरातील पराभव हा भाजपसाठी अयोध्येपेक्षाही अधिक निराशाजनक असेल. कारण या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या मतदारसंघातील त्याच्या वॉर्डमध्येही भाजपस पुरेशी मते मिळाली नाहीत. राष्ट्रीय अध्यक्षाचा मतदारसंघ, राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे आणि तरीही प्रशांत किशोर यांच्याकडून भाजपस धूळ चारली गेली. बिहार राज्यात विधानसभा निवडणुकांस एक वर्षही झालेले नाही. त्या निवडणुकांत भाजपने दणदणीत विजय मिळवला होता आणि प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाहाती भोपळ्यापलीकडे काही लागले नव्हते. त्याच किशोर यांनी अवघ्या काही महिन्यांतच या मतदारसंघात भाजपचा धुव्वा उडवला. गेल्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार जवळपास ५८ हजारांच्या मताधिक्याने जिंकला होता. या निवडणुकीत प्रशांत यांस पडलेली मते भाजप उमेदवारापेक्षा किमान १९ हजारांनी अधिक आहेत. याचा अर्थ अवघ्या वर्षाच्या आत भाजपने आपली ७७ हजार मते गमावली. ही मतांची गळती त्याच मतदारसंघातील नेता राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर होत असेल तर ही वजाबाकी करून मतदार काही संदेश भाजपस देऊ इच्छितात असा त्याचा अर्थ.

त्याचेच प्रतिरूप मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीत पाहावयास मिळते. या राज्यातील दांतिया विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारास काँग्रेससमोर हार पत्करावी लागली. हा मतदारसंघ भाजपचा. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या राजेंद्र भारती यांनी भाजपचे नरोत्तम मिश्रा यांना पराभूत केले खरे; पण नंतर ते स्वत: अपात्र ठरवले गेले. त्यामुळे येथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. वास्तविक याही वेळी मिश्रा हे भाजपचे इच्छुक होते. ते माजी गृहमंत्री. राज्यातील भाजपचे वजनदार नेते. त्यांनी सलग तीन वेळा याच मतदारसंघातून विजय मिळवलेला. परंतु भारती यांनी त्यांची ही विजयमाला तोडली. त्यानंतरही पुन्हा निवडून येण्यासाठी ते इच्छुक होते. पण भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यामागे स्थानिक राजकारण असल्याचे सांगितले जाते. कारण काहीही असो. त्यांना उमेदवारी नाकारून भाजपने कोणा आशुतोष तिवारी यांस मैदानात उतरवले. त्यांच्या उमेदवारीबाबतही घोळ घातला गेला. त्या तुलनेत काँग्रेसने कधी नव्हे ते शिस्तबद्ध प्रचार करून घनश्याम सिंह यांच्यामागे स्थानिक नेतृत्व राहील याची खबरदारी घेतली. वास्तविक याच राज्यातून काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची उमेदवारी नाकारली गेली होती. निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयाने राजकारण तापले खरे; पण त्यातून काँग्रेस नेतृत्वाचा ढिसाळपणाच दिसला. त्यामुळे प्रचाराच्या सुरुवातीस काँग्रेसला तितकी आशा नव्हती. पराभूत होण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्यासारखे काँग्रेसचे वर्तन होते. तरीही त्या पक्षाने भाजपचा पराभव केला. बिहारप्रमाणे मध्य प्रदेशातही भाजपची सत्ता आहे. पण त्या पक्षास मतदारांनी दया दाखवली नाही. भाजपस त्यातल्या त्यात समाधान मिळेल ते गुजरात विधानसभा पोटनिवडणुकीत. त्या राज्यातील मंजलापूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपने राखला. पण त्या विजयाचे समाधान भाजपस मिळणे अवघड. पराजयापेक्षा विजय बरा हे जरी खरे असले तरी या निवडणुकीत मतांची झालेली धूप भाजप नेतृत्वाची झोप उडवेल यात शंका नाही. गेल्या निवडणुकीत भाजपने ही जागा सुमारे लाखाहून अधिक मतांच्या आधिक्याने खिशात टाकली होती. या वेळी भाजपचा विजय जेमतेम ३० हजार मतांचा आहे.

या तीनही निवडणुकांत असलेला समान धागा तो हा. भाजपच्या मतांत झालेली लक्षणीय घट. त्यास पार्श्वभूमी आहे ती अर्थातच ‘जंतर-मंतर’ येथील ‘जेन झी’च्या आंदोलनाची. या आंदोलनाच्या वेदीवर भाजपला आपले शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची आहुती द्यावी लागली. आपला हा मोहरा खर्ची घालणे भाजपच्या किती जिवावर आले होते ते देशाने पाहिले. भाजपचे विद्यमान नेतृत्व असे कोणास भीक घालत नाही. पण कालच्या पोरांनी या नेतृत्वास पूर्णत: नमवले. ही घटना अभूतपूर्व होती. त्यातून तरुण विद्यार्थी वर्ग त्या पक्षावर किती नाराज आहे त्याचे विदारक दर्शन झाले.

या तीन विधानसभा पोटनिवडणुका पार पडल्या त्या या पार्श्वभूमीवर. या तीनही ठिकाणी आपल्या स्थानास तडा जाणार नाही याची भाजप नेतृत्वाला ठाम खात्री होती. त्यातूनच ऐन वेळी उमेदवार बदलण्यापासून ते कुत्रे-मांजरही भाजपचा विजयी उमेदवार कसा होऊ शकतो अशा दर्पोक्तीपर्यंत भाजपची मजल गेली. ही मिजास मतदारांनी उतरवली. ‘आम्हास गृहीत धरू नका’, हा त्यामागील समान संदेश. तो देताना त्याच वेळी बिहारात एके काळी मुख्यमंत्रीपदाचे स्पर्धक मानले जाणार्‍या लालूपुत्र तेजस्वी यादवांसही मतदारांनी चार हात दूर राखले. भाजपप्रमाणे लालूंच्या ‘राजद’लाही या निवडणुकीत मतदारांनी पाणी पाजले. बांकीपूर येथे जे झाले तो साध्या पोटनिवडणुकीचा निकाल नाही. ती काय होऊ शकते याची चुणूक दाखवणारी भविष्याची चाहूल असू शकते. तीकडे दुर्लक्ष केले तर ‘ये तो सिर्फ ‘बांकी’ है…’ अशी हाक देण्याची संधी विरोधकांस मिळेल.