एक शिकवणी वाढून वाढून किती वाढू शकते हे समजण्याचे भान ना या समाजाने दाखवले; ना या समाजाचे नेतृत्व करणार्‍यांत ते होते वा आहे

‘नीट’, ‘सीबीएसई’ परीक्षांतील हास्यास्पद गोंधळ आणि ‘स्टार्ट अप’ इंडियाचा एकेकाळचा नायक बैजू रवींद्रन यांच्या अटकेचा आदेश या आपल्याकडच्या एकाच सडक्या नाण्याच्या दोन बाजू. कसे; ते समजून घेण्याआधी बैजूच्या बाबत काय झाले त्याचा आढावा. विविध आर्थिक घोटाळे वा गैरव्यवहारांच्या आरोपाखाली सिंगापूरच्या न्यायालयाने बैजूच्या अटकेचा आदेश दिला. त्याआधी अमेरिकेतही त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद झाली. हे सर्व गुन्हे आर्थिक उद्योगांशी संबंधित असून वरवर पाहता ते जणू कोणा उठवळ विजय मल्ल्या वा तत्सम उद्योगपतीने केले असावेत असा समज निर्माण होऊ शकतो. हीच यातील मेख. देश घडवणार्‍या वा बिघडवणार्‍या शिक्षण या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे केवळ उद्योग म्हणून पाहिले की काय होऊ शकते याचा हा धडा. तो उद्योग नाही; असे नाही.

तो उद्योग आहेच. पण त्याचे नियमन आपल्याकडे ना उद्योग म्हणून केले जाते ना शैक्षणिक कार्य म्हणून. आपला विशेष भारतीय दांभिकपणा या शिक्षणाच्या उद्योगात सर्रास होतो; पण आव आणला जातो चारित्र्याचा आणि पावित्र्याचा. प्रत्यक्षात ना त्यात असते काही चारित्र्य ना पावित्र्य. यामुळे या देशातील शिक्षण नामे चरकात पिळून घेण्याखेरीज विद्यार्थी आणि पालक यांस पर्याय नाही. बैजूज जे करायचा ते साधे शिकवणी वर्ग. पण त्यात जणू उद्याच्या भारताचे भवितव्य दडले असावे असा त्याचा उदोउदो केला गेला. आता सगळेच तोंडावर आपटले. हे असे होणार याचे भाकित ‘लोकसत्ता’ने ‘बैजू बावरे’ या संपादकीयात तीन वर्षांपूर्वी (८ जून २०२३) वर्तवले होते. ते तंतोतंत खरे ठरले. त्याचे श्रेय संपादकीय शहाणपणापेक्षाही जनतेच्या मूर्खपणास अधिक. आता भारतीय व्यवस्थेत जे जे उदात्त अयोग्य होऊ शकते त्याचे प्रतीक बनलेल्या बैजूविषयी.

तो शिक्षक आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेला केरळातील एक शिक्षक. शिकवण्याच्या चटपटीत शैलीमुळे लोकप्रिय झाला. व्यवस्थापन विषयक समान प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शनामुळे त्याची ख्याती वाढली. त्यात आला करोना. त्या काळात समाज ऑनलाइनी उद्योगास चटावल्यामुळे बैजूचे फावले आणि त्याच्या शिकवण्या भौगोलिक मर्यादा ओलांडू लागल्या. त्याने शिकवणी वर्गाचा ‘उद्योग’ सुरू करण्यास, करोना काळ येण्यास आणि भारत ही नव्या उद्योगांचे (?) केंद्र कसे होत आहे हे दाखवण्याची गरज राज्यकर्त्यांत निर्माण होण्यास कर्मधर्मसंयोगाने एकच गाठ पडली. मुळात आपली सामाजिक आर्थिक समज अगदीच बेतासबात. आणि अलीकडे त्यातील एखाद्यास सत्ताधीशच वर चढवत असतील तर आपली अक्कल गहाण टाकण्यास समाजातील एक वर्ग टपूनच बसलेला. त्या वर्गाच्या प्रतिनिधींनी या साध्या शिकवणी वर्गास ‘स्टार्ट अप’ मानले आणि अनेकांनी त्यात गुंतवणूक केली. ‘नास्पर्स’, ‘टायगर ग्लोबल’, ‘सिल्व्हर लेक’, ‘बी कॅपिटल बॅरन फंड्स’, ‘यूबीएस ग्रुप’ आदी अनेक बहुराष्ट्रीय धनकोंनी शिक्षणाच्या वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्यासाठी ‘बैजू’त गुंतवणूक केली. हे नवे गुंतवणूकदार आणि मारुतीच्या बेंबीत बोट घातल्याने विंचूदंशाच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत ‘किती गार वाटते’ असे म्हणणारे एकाच जातकुळीतील.

आपण केलेली गुंतवणूक किती अमोल आहे याचा फुगा फुगवायचा आणि त्यातून ज्यात गुंतवणूक केली त्याचे मूल्यांकन वाढवायचे हा गुंतवणूकदारांचा उद्योग. या गुंतवणूकदारांनी या शिकवणी वर्गास ‘टेक कंपनी’ ठरवले आणि जागतिक पातळीवर नवे काही ‘खास भारतीय’ सादर करण्याची गरज असलेल्या राज्यकर्त्यांनी त्यास ‘स्टार्ट अप’ इंडियाचे ‘भव्य यश’ ठरवले. शिक्षणाचे असे उद्योगीकरण हा पैसे कमावण्याचा मार्ग असता तर हॉर्वर्ड, ऑक्सफर्ड, केंब्रिज, एमआयटी (अमेरिकेतील), प्रिन्स्टन आदी खर्‍या, शतकानुशतके सुरू असलेल्या प्रामाणिक ज्ञानयज्ञात जगातील शहाणे आर्थिक आणि बौद्धिक समिधा वाहते ना. पण इतकाही फरक करण्याचा विवेक आपल्या समाजाने दाखवला नाही. चांगल्या शिक्षण सोयींअभावी नाडल्या गेलेल्या मध्यमवर्गीयांच्या गरजांवर हात मारणारे अनेक भुरटे त्याचमुळे आपल्याकडे स्वत:स कुलगुरू अशी पवित्र उपाधी लावण्याचे औद्धत्य दाखवू शकतात आणि त्यांची पोरेबाळेही उपकुलगुरू वगैरे म्हणून मिरवतात. हे सर्व ज्या समाजात गोड मानून घेतले जाते त्या समाजात बैजूचे किरटे झाड वृक्ष म्हणून मिरवले गेले यात आश्चर्य ते काय? हा विवेक या बैजूनेही दाखवला नाही आणि अमेरिकेसारख्या महागड्या बाजारातून १२० कोटी डॉलर इतके कर्ज उचलले. सुरुवातीला या कर्जाचे फक्त व्याज भरण्याची सवलत त्यास दिली गेली खरी. पण बैजूचा बाजार नंतर इतका उठला की त्या व्याजाचे हप्तेही देता येईनासे झाले.

अर्थशास्त्राचा एक साधा नियम आहे. कोण किती काळात किती वाढू शकतो, हे या नियमाने ठरते. हा नियम कोणास चुकत नाही. बैजू हे विसरला. आपल्या फुग्यात हवा भरणार्‍यांच्या नादास लागून त्याने इतका विस्तार केला की त्यातून येणारा महसूल आणि त्यावर होणारा खर्च याचा काहीच ताळमेळ बसेना. असे झाले की अशा कंपनीतील कर्मचार्‍यांस एकच एक काम राहाते. महसूल वाढवणे. त्याचा इतका रेटा बैजूजच्या कर्मचार्‍यांवर वाढला की तो त्यांनाही सहन होईना. कर्मचारी टिकेनात, महसूल स्तब्ध आणि कर्जाच्या व्याजाचा वाढता डोंगर या खाली बैजू पिचत गेला. तरीही वेळ गेलेली नव्हती. शहाणपणा दाखवत त्याने दुरुस्तीचे उपाय केले असते तर पूर्णपणे नागवे होण्याची वेळ न येता अब्रू तरी झाकता आली असती. तेही नाही. परिणामी कर्ज परतफेड चुकत गेली.

ज्या गुंतवणूकदारांनी ‘उद्याचा उद्योग’ म्हणून बैजूस डोक्यावर घेतले त्यांनीच त्याच्या मूल्यांकनात एका झटक्यात ८० टक्क्यांनी कपात केली. मग नवीन पतपुरवठा देखील आटला. परिणामी एका २०२१ या करोनोत्तर वर्षात ‘बैजू’चा तोटा दर रोज सरासरी १२ कोटी रु. इतक्या जोमाने वाढत गेला. त्या वर्षात ‘बैजू’चा महसूल २४२८ कोटी रु. होता तर त्या तुलनेत कंपनीचा तोटा ४५०० कोटी रुपयांवर गेला. हा तसा विक्रमच. उलट अर्थी. दुसरे असे की आपण मुळात शिक्षक आहोत, व्यवसाय ज्ञान असलेले कोणी खासगी कंपनी अधिकारी नाही हे तरी या बैजूजने लक्षात घ्यायला हवे होते. एखादी कृती उत्तम येणे वेगळे आणि त्या कृतीचे रूपांतर उत्तम व्यवसायात करणे वेगळे. हे सर्वच क्षेत्रास लागू होते. एखादा खेळाडू अष्टपैलू आहे म्हणून तो उत्तम कप्तान होईलच असे नाही. वा एखादा उत्तम गायक हा तितकाच उत्तम गुरू असेलच असे नाही.

आपल्यातील कला, कसब आणि कारागिरी कौशल्य ओळखूनच प्रत्येकाचे वर्तन हवे. बैजूचे हे भान सुटले. त्यातून पुढे जे काही घडले ते घडले. तथापि त्यास व्यक्ती म्हणून बैजू जितका जबाबदार तितकाच या फुग्यात निष्कारण हवा भरणारा समाजही जबाबदार. एक शिकवणी वाढून वाढून किती वाढू शकते हे समजण्याचे भान ना या समाजाने दाखवले आणि ना या समाजाचे नेतृत्व करणार्‍यांत ते होते. वा आहे. या एका बैजूस लाखो बावरे मिळाले आणि हा अनर्थ घडला. तथापि या उदाहरणावरून आपण काही शिकू अशी अपेक्षा बाळगणे हे टोणग्याची आचळे शोधण्यासारखे ठरेल.